Saturday, 24 December 2016

गरवारे कॉलेजच्या समोर असलेल्या  'बिपीन स्नॅक्स सेंटर ' वर जगातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट साबुदाणा खिचडी मिळते . त्याच्या बाजूलाच दोन टपऱ्या ओलांडून तिसरी टपरी म्हणजे 'प्रभाकर बेकरी '. एक छोटी टपरी , त्यात एका काचपेटीत काही पॅटिस  आणि काही बरण्यांमध्ये नानकटाई आणि बिस्कीट भरून ठेवलेली . हल्ली बेकरी म्हंटल की डोळ्यासमोर जी चकचकीत स्मार्ट इंटेरियर येतं त्यातलं काहीही 'प्रभाकर बेकरी ' मध्ये नव्हतं . तिथं गल्ल्यावर एक चष्मीश , पोट सुटलेला आणि डोळ्यांमध्ये आगाऊपणाची छटा असणारा एक मध्यमवयीन माणूस बसलेला असायचा . बेकरीचं नाव त्यानं मुलावरून ठेवलं होत की वडिलांच्या नावावरून ठेवलं होत देव जाणे . पण आम्ही त्यालाच प्रभाकर मामा असे संबोधून बोलायचो . विशेष म्हणजे मामाने पण त्याला कधी आक्षेप घेतला नाही . त्याने आम्हाला पण कधीच आमची नाव विचारली नाहीत हे खास . गरवारे हॉस्टेलला असताना आम्ही दिवसभर प्रभाकर बेकरी वर पडून असायचो . त्याच्या दुकानात एक छोटा पोर्टेबल टीव्ही होता . तिथे आम्ही भारत -झिम्बॉम्ब्वे कसोटी सामना सारखे महान खेळ तासंतास बघायचो . एक अंडाबन खाऊन तासनतास तिथे आम्ही बसू शकायचो मामाशी चकाट्या पिटत . कारण तिथं आम्ही सोडून दुसरं कुणी यायचंच नाही . अंडाबन हा पदार्थ खास मामाचं invention  आहे असं मामा अभिमानानं सांगायचं . अंडाबन म्हणजे पाव मध्यभागी चिरून त्यात उकडलेल्या अंड्याच्या चकत्या टाकायच्या आणि पावावर लोणी फासायचं . प्रभाकर मामा अतिशय आळशी आणि महत्वाकांक्षेचा अभाव असणारा इसम होता . वर्षानुवर्षे तो आम्हाला ,मी लवकरच चिकन पॅटिस ठेवणार आहे असं  सांगायचा . पण चिकन पॅटिस कधी त्याच्या बेकरीत आलेच नाहीत . त्याच्या बेकरीच्या बाजूलाच एक कंडोम व्हेंडिंग मशीन होत . तिथं येणाऱ्या लोकांकडे बघून अभद्र कॉमेंट्स मारणं हा मामाचा आवडता छंद होता . वर 'अरे तुम्ही कधी दिसणार रे त्या मशिनमधून कंडोम काढताना .' असे टोमणे मारून आमच्या तोंडातल्या नानकटाईची चव कडू करायचा ते वेगळंच . नंतर आमचे संबंध एवढे जिव्हाळ्याचे बनले की नेहमी फकाट  असणारे आम्ही त्याच्याकडूनच पैसे घेऊन बाहेर बारमधल्या पार्ट्या करू लागलो . आमचं नाव गाव काही माहित नसताना शांतपणे गल्ल्यात हात टाकून आम्ही मागू तेवढे पैसे तो आम्हाला द्यायचा . आम्हाला कॉलेजमधून प्रेझेंटी कमी का आली या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलेल्या अर्जावर सह्या पण द्यायचा . त्यामुळे आम्हाला त्याच्या बद्दल आपुलकीच आपुलकी होती . त्याला पण आमच्याबद्द्दल असावी . एके दिवशी अंडा बन खाऊन झाल्यावर पैसे घ्यायचं त्यानं नाकारलं . मुलाला मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्याची नौकरी मिळाली अशी खुशखबर त्याने दिली . मामाच्या वैयक्तिक आयुष्याशी आलेला हा आमचा पहिला आणि शेवटचा संबंध . मला खिशात चुरगळलेल्या नोटा ठेवायची सवय होती . त्यावरून मामा मला कायम झापायचा . 'अशा नोटा ठेवत जाऊ नकोस नाहीतर पैसा खिशात टिकणार नाही ' अशी वॉर्निंग द्यायचा . वॉर्निंग कसली , प्रॉफेसीच ती . नंतर हॉस्टेल मधून बाहेर पडल्यावर प्रभाकर बेकरीशी संबंध कमी कमी होत गेला . मध्ये काही काळ तर संपलाच . कर्वे रस्त्यावरून जाताना हटकून त्या बेकरीकडे नजर जायची . बहुतेक वेळा बंदच असायची . एकदा रोडवरून संध्याकाळी जात असताना बेकरी उघडी दिसली . बाईक थांबवली आणि बेकरीत गेलो . मामा आता म्हातारा झाल्यासारखा दिसत होता .मिणमिणत्या दिव्यात तो बराच थकल्यासारखा दिसला . मी काही ओळख दिली नाही . कशी देणार ? माझं नाव कधी त्याला माहित नव्हतंच . अंडा बन खात असताना मामा चष्म्यातून रोखून बघत होता . मी पैसे देण्यासाठी खिशात हात घातला आणि पैसे बाहेर काढले . "अजून पण चुरगळलेल्या नोटाच देतोस  का तू ?" मामाने विचारलं . आणि जाणवलं की आपण मामाला विसरलो असलो तरी मामा आपल्याला विसरला नाहीये . मग मामाशी बऱ्याच गप्पा मारल्या . आता रेग्युलर येत जाईल असं आश्वासन पण दिलं . पुढच्यावेळेस आलास की खास खिमा पॅटिस खिलवतो असं मामाने पण आश्वासन दिलं . मामा कधीच खिमा पॅटिस ठेवणार नाही हे मला माहित होत . मी रेग्युलर येणार नाही हे बहुदा मामाला माहित नसावं . कुठल्याच अपेक्षा नाहीत ,राग लोभ नाहीत असं एखाद नातं असू शकत हे प्रभाकर मामामुळे मला कळलं . अशा नात्यांची ओढ तेंव्हा पासूनचीच . आता बेकरी बंदच झाली आहे . मामाच्या तब्येतीबद्दल मध्यंतरी काही वावड्या कानावर पडल्या होत्या . आता त्या भागात क्वचितच जाण होत . बेकरी बंदच असते . एकमेकांबद्दल नाव -गाव काहीही माहित नसताना असं सुंदर नातं तयार होऊ शकत हे थोर आहे . 

Thursday, 17 March 2016

जिगरवाला मन्सूर

झाडून सगळ्यांनीच महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे, असा एक संकेत रूढ होत चालला आहे. म्हणजे, सगळ्यांनीच सहा आकडी पगार कमावला पाहिजे. सगळ्यांनीच उत्साहीपणे सण वगैरे साजरे केले पाहिजेत. सगळ्यांनीच विकेंडला मॉल आणि मल्टिप्लेक्सला गर्दी केली पाहिजे. सगळ्यांनीच मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणात राहून स्वतःची जबरी प्रगती करून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे, मी महत्त्वाकांक्षी आहे, हे सिद्ध करण्यासाठी एका न संपणाऱ्या रेसमध्ये ऊर फुटोस्तर पळलं पाहिजे. जो माणूस यातलं काहीही करायचं नाकारून आपल्या अटींवर आयुष्य जगतो, त्याला हे सगळे महत्त्वाकांक्षी लोक एक लेबल लावतात, ‘पलायनवादी’! अशा लोकांना सहसा नात्यांमधल्या कार्यक्रमात फारसं महत्त्व मिळत नाही, मित्रांच्या गेट-टुगेदरमध्ये यांना गृहीत धरतात, आणि यांची बायको यांना आजूबाजूच्या महत्त्वाकांक्षी लोकांची उदाहरण देते. पण काही लोक हा ‘पलायनवाद’ असा काही निभावतात की वाटतं, वा! क्या बात है. असाच एक माणूस म्हणजे, मन्सूर खान. कोण हा मन्सूर खान? आपलं एेन भरात असणारं फिल्म इंडस्ट्रीमधलं करिअर सोडून, महानगरीय जीवनशैली सोडून एका खेड्यात राहायला गेलेला माणूस म्हणजे, मन्सूर खान...
आमीर खानचा भाऊ किंवा नासीर हुसेनसारख्या दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शकाचा मुलगा इतकीच मन्सूर खानची ओळख कधीच नव्हती. फिल्मी परिवारातून असला तरी मन्सूर हा नेहमीच स्वयंप्रकाशित तारा होता. विलक्षण मनस्वी, उन्मेषी, प्रसंगी कठोर, पॉम्पस. पेशाने दिग्दर्शक असणाऱ्या या माणसाने, इनमिन चार चित्रपट दिग्दर्शित केले. प्रत्येक चित्रपटाला भरपूर वेळ द्यायचा, ही याची पद्धत. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून आमीर खान नामक धुमकेतू अवतरला. आमीरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भक्कम बेस मिळवून देणारा हा चित्रपट मन्सूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर त्याने केलेला ‘जो जीता वो ही सिकंदर’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात वाढलेल्या प्रत्येकाच्या नॉस्टॅल्जियाचा अविभाज्य हिस्सा आहे. पण हा लेख मन्सूरच्या चित्रपटक्षेत्रातल्या योगदानाबद्दल नाही. ते बहुतेकांना माहीत आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर मन्सूरने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई सोडून तो अजून दुसऱ्या कुठल्याही महानगरात शिफ्ट झाला नाही. त्याने निवड केली, तामीळनाडूमधल्या कुनुर या निसर्गरम्य जागेची. मुंबई सोडण्याचा निर्णय घेण्याअगोदरच त्याने बॉलीवूडमधलं जोरात चाललेलं करिअर संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा ‘जोश’ (शाहरुख खान व ऐश्वर्या राय अभिनित) आपटला असला तरी मन्सूर हा एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे, याबद्दल कुणाचं दुमत नव्हतं. शिवाय आमीरसारखा सुपरस्टार बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मग हा टोकाचा निर्णय मन्सूरने का घेतला?
मन्सूर हा जात्याच बुद्धिमान आणि विचारी माणूस. चित्रपटक्षेत्रात तो फक्त घराण्याचं नाव राखण्यासाठी आला होता. पण त्याच्यातल्या निसर्गप्रेमी माणसाला महत्त्वाकांक्षेच्या लालसेपायी निष्ठुर होत चाललेली मुंबई कधीच भावली नव्हती. आपण एका निरर्थक ‘रॅट रेस’चा भाग आपली इच्छा नसताना बनलो आहोत, ही जाणीव त्याला पोखरून काढत होती. मुख्य म्हणजे, वेगवान, कोंदट, शहरी जगण्याचा त्याला कंटाळा आला होता. शूटिंगसाठी तो काही वेळा कुनुरला गेला होता. त्याला ती जागा खूप आवडली होती. शिवाय तिथे त्यांचे एक पिढीजात घर होते. पण या बाबतीत बायकोला आणि दोन मुलांना कसे कन्व्हिन्स करावे, असा प्रश्न होता. तब्बल एक वर्ष मन्सूरने त्यांची मनधरणी केली. शेवटी, घरचे लोक तयार झाले. मन्सूर त्याच्या बायकोपोरांसकट कुनुरला स्थलांतरित झाला. पण हा निर्णय राबवणं तितकंसं सोपं नव्हतं. एक पूर्ण वाढलेलं झाड उपटून ते दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा हा प्रकार होता. अनेक समस्या होत्या. विशेषतः आर्थिक समस्या. मुंबईमधली आपली प्रॉपर्टी विकून मन्सूरने जमिनीचा एक तुकडा कुनुरमध्ये विकत घेतला. तिथे त्याने शेती आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. पण त्यातून एक चांगलं आर्थिक उत्पन्न सुरू व्हायला काही वेळ लागला. दरम्यान मन्सूर आणि परिवाराला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण ते ठामपणे सगळ्यांना तोंड देत उभे राहिले. दरम्यान मन्सूरने साबण कसा बनवावा, ब्रेड कसा बनवावा, वगैरे आवश्यक गोष्टी शिकून घेतल्या. हल्ली बहुतेक गोष्टी ते घरीच तयार करतात. आज मन्सूर स्वतःच्या अटीवर एक अतिशय सुंदर आयुष्य जगत आहे.
मन्सूरने आपल्या या अनुभवावर चांगलं लिखाण केलं आहे. सध्या त्याच्या ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकाला मोठी मागणी आहे. २००८च्या जागतिक मंदीनंतर जगासमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न आणि त्याचा तुमच्या-आमच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर मन्सूरने ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत लिहिलं आहे. भूगर्भातल्या तेलाचे वेगाने संपणारे साठे आणि कमजोर होत चाललेली आपली बँकिंग सिस्टम यामुळे अख्ख्या मनुष्यजातीसमोर लवकरच गंभीर असे जीवनमरणाचे प्रश्न उभे ठाकणार आहेत, अशी त्याची मांडणी आहे. यावर त्याच्या मते एकच सोल्युशन आहे ते म्हणजे, आपल्या भौतिक गरजा कमी करून माणसाने निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जावे आणि निसर्ग संवर्धन करावे. आपल्या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेला मन्सूर सध्या वेगवेगळ्या आयआयएम संस्था, याहूसारख्या कॉर्पोरेट संस्था, सिम्बायोसिस सारख्या शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी लेक्चर देतो. कुणीतरी मध्यंतरी त्याला विचारलं, ‘पुढचा चित्रपट कधी बनवणार?’ त्या वेळेस हसत हसत त्यानं उत्तर दिलं, ‘कधीच नाही.’
देशातल्या अनेक चळवळींना मन्सूर सक्रिय पाठिंबा देतो. मध्यंतरी आमीर खानने नर्मदा आंदोलनाला जो सक्रिय पाठिंबा दिला होता, त्यामागे मन्सूरच्या या विचाराचा प्रभाव होता. त्या बदल्यात भाजप समर्थकांनी आमीरच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे खेळ गुजरातमध्ये बंद पाडले होते. असो.
नाना पाटेकरसारखा अवलिया कलावंत याच वाटेवरून चालतो आहे. सध्या नाना पुण्याजवळ एका फार्म हाउसवर शहरी गजबजाटापासून दूर एक शांत आयुष्य जगतो आहे. पण नाना आणि मन्सूरमधला मुख्य फरक हा की, नाना अजूनही अभिनयात सक्रिय आहे. मात्र मन्सूरने शो बिझिनेसमधून पूर्ण निवृत्ती घेतली आहे. या दोघांनाही वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही हा निर्णय का घेतलात, या अर्थाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर नाना आणि मन्सूर यांनी त्याला दिलेली उत्तर उद‌्बोधक आहेत. नानाचं उत्तर होतं की, ‘शहरांमध्ये मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येणं बंद झालं होतं.’ मन्सूरच उत्तर होतं, ‘कारण मला रात्री शांत निवांत झोपायचं होतं.’ नियती पण काय एक एक काष्ठ जमवते नाही?

Friday, 4 March 2016

गोष्ट एका अरभाट 'बिझनेस मॉडेलची '

                      

                                                   
१९९३ साल. देशात उदारीकरणाच वार वाहत   होत . मनमोहन सिंग आणि नरसिंह राव  ही जोडगोळी देशाला विदेशात गहाण ठेवत आहेत असा आरोप विरोधक उच्चरवात करत होते. बाहेरच्या उद्योगांसाठी  आपले दरवाजे उघडले तर आपल्या लोकांच काय होईल असा प्रश्न विचारण्यात येत होता .देश कात टाकत होता .  नवीन आणि जुने असा संघर्ष सर्व क्षेत्रात चालू होता .  या संघर्षाच  चित्रपट सृष्टीमधलं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अभिनेता मिथुन चक्रवर्ती होता .  त्यावेळी व्यवसायिक आघाडीवर त्याच काही फारसं बर चालू नव्हत . नवीन दमाची 'खान ' मंडळी तोपर्यंत बस्तान बसवू लागली होती . मिथुनचे चित्रपट एका मागून एक आपटत होते . अडगळीला पडलेल्या   मिथुनने आपले बस्तान रम्य हिलस्टेशन असणाऱ्या 'उटी ' ला हलवलं . तिथे त्याने आपले लक्झरी हॉटेल सुरु केलं . त्याचं हॉटेलमध्ये बसून मिथुनने एक अचाट 'बिझनेस मॉडेल ' तयार केलं . आपल्याला चित्रपटात घेऊ इच्छिणार्या निर्मात्यांना त्याने काही अटी टाकल्या . त्यातली सगळ्यात मोठी अट म्हणजे चित्रपटाच शुटींग उटीमध्येच होईल . शुटींगसाठी येणार मोठ युनिट मिथुनच्या मालकीच्या हॉटेलमध्ये उतरेल. त्याबदल्यात मिथुन निर्मात्यांना सलग बल्क डेट्स देईल . प्री -प्रोडक्शन , शुटींग आणि पोस्ट प्रोडक्शन हे निर्मितीचे विविध टप्पे पार करून सिनेमा तीन ते चार महिन्यात हातावेगळा करायचा . या वेगामुळे निर्मात्याच बजेट मर्यादित राहिल हा त्यामागचा मुख्य उद्देश . बजेट कमी असल तर परतावा सहज मिळेल अस त्यामागचं गणित . छोटी शहर आणि ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा तयार केलेला असल्याने तिथून सहज नफा कमावता येईल हे चाणाक्ष निर्मात्यांना माहित होत . " बाकीचे स्टार्स चित्रपट सुरु करण्याची डेट देतात . मी चित्रपट पूर्ण कधी होईल याची डेट देतो ." अस मिथुन एका मुलाखतीमध्ये आत्मप्रौढीने बोलला होता . ते अगदीच खोट नव्हत . कारकीर्दीच्या उतरणीला लागलेला मिथुन आणि छोटे निर्माते यांच्यासाठी ही 'विन विन सिच्युएशन ' होती . मिथुनच्या करियरला नवसंजीवनी मिळाली . इतकच नव्हे तर  १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्ष तो  देशामधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता होता . कमी बजेट मध्ये बनलेल्या या सिनेमांनी 'बी आणि सी क्लास सेंटर ' वर चांगलाच धंदा केला . सिंगल स्क्रीन थियेटरच नव्हे तर ओपन थियेटर आणि विडिओ पार्लरमध्ये पण हे चित्रपट चांगले चालले .

या चित्रपटाचा दर्जा काय होता हे अर्थातच सांगायची गरज नाही . या चित्रपटाना कुठल्याही वैश्विक जाणीवा नव्हत्या . चित्रपट माध्यमांची सामाजिक जबाबदारी वैगेरे शब्द्बम्बाळ गोष्टींशी त्यांचा दुरान्वये संबंध नव्हता . आपल्या प्रेक्षकाला काय पाहिजे ते द्यायचं आणि नफा कमवायचा या निव्वळ व्यवसायिक उद्देशातून हे सिनेमे बनत होते . यातल्या बहुतेक चित्रपटात मिथुन एक तर प्रामाणिक सरकारी अधिकारी असे किंवा श्रमजीवी वर्गातला (मिथुनचा मोठा चाहतावर्ग यातलाच आहे ) असे . सर्व पात्र काळ्या आणि पांढऱ्या रंगात असत . नायिका बहुतेक आखीव, रेखीव आणि भरीव अशी दाक्षिणात्य अभिनेत्री असे . काळी कृत्य करणाऱ्या खलनायकाचा एकदा नायकाने एकहाती निपात केला की चित्रपटाच सुप वाजत असे आणि प्रेक्षक पैसे  वसूल झाले या कृतार्थ भावनेने बाहेर पडत असे .

या काळात अनेक दिग्दर्शकांसोबत मिथुनने काम केले पण त्याची जोडी जमली ती टी एल वी प्रसादशी . या दिग्दर्शकासोबत १९९५ ते २००२ या काळात मिथुनने तब्बल सव्वीस चित्रपटात काम केल आहे . कुठल्याही नटाने एकाच दिग्दर्शकासोबत सलग इतकं काम केल्याचं अस उदाहरण विरळाच . टी एल वी प्रसादचा असा दावा आहे की   याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे . "मी जेंव्हा एका सिनेमाचं शुटींग करत असतो तेंव्हाच पुढचा सिनेमा लिहित असतो आणि तिसऱ्या सिनेमाच्या संगीतासाठी काम करत असतो .' हे टी एल वी प्रसादच विधान त्यावेळेस प्रसिद्ध झालं होत .

शरद जोशींनी सांगितलेला 'इंडिया ' आणि 'भारत ' हा भेद आपल्याकडे सगळ्याच क्षेत्रात दिसून येतो . सिनेमामध्येपण आणि चित्रपट प्रेक्षकांमध्ये पण . प्रेक्षकांमध्ये 'मल्टीप्लेक्स प्रेक्षक ' आणि 'सिंगल स्क्रीन ' प्रेक्षक असे दोन प्रकार आहेत असे ट्रेड पंडित आणि चित्रपट निर्माते मानतात . आपला 'पोटेन्शियल ' प्रेक्षक यापैकी  कुठला आहे हे लक्षात घेऊन निर्माते मार्केटिंगची रणनीती आखतात . पण समीक्षक , प्रसारमाध्यम , पुरस्कार सोहळे , आणि अगदी ज्याचं पूर्ण लोकशाहीकरण झालं आहे अस मानलं जात त्या सोशल मिडीयावर पण सिंगल स्क्रीनमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाचा जो सिनेमा आहे त्याला अनुल्लेखाने मारले जात . कसा असतो हा 'सिंगल स्क्रीन सिनेमा '? तर त्याचं एक ठरलेलं 'टेम्पलेट' आहे . अतिशय मर्यादित बजेट , काही अपवाद वगळता अनोळखी अभिनेते , सुमार संगीत , भडक अंगप्रदर्शन , बटबटीत संवाद , नायकाच्या बहिणीवर बलात्कार करणारा आणि एक टुकार तकिया कलाम तोंडात घोळवणारा खलनायक हे घटक एकत्र केले की हे   'टेम्पलेट' तयार होत . काही लोक याला 'बी ग्रेड ' सिनेमा पण म्हणतात . सिनेमा म्हणून याचा दर्जा काय यावर विवाद असू शकतात पण जो सिनेमा वर्षानुवर्ष करोडो लोकांच मनोरंजन करत आहे त्याचं व्यवस्थित नोंद  व्हायला नको ? हा लेख अशाच एका मिथुनयुगाची नोंद घ्यायचा प्रयत्न आहे जो , 'लगान ' मधला सुत्रधार म्हणतो त्याप्रमाणे 'इतिहास के पन्नो मे कही खो गया .'

Sunday, 31 January 2016

प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे


सध्या टेलीविजनवर साऊथ डब चित्रपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात . त्यातला एक चित्रपट पाहण्यात आला . एक स्थानिक 'तेलुगु ' डॉन (नागार्जुन ) एका पाकिस्तानी डॉनचे तिथे बस्तान मांडण्याचा बेत कसा उधळून लावतो अस काहिस कथानक होत . काही दिवसांनी मला त्या चित्रपटाची 'तेलुगु ' प्रत बघण्याची संधी मिळाली . मूळ 'तेलुगु ' सिनेमा बघितल्यावर मला धक्का बसला . कारण डब वर्जन मध्ये पाकिस्तानमधून आलेला खलनायक मूळ तेलुगु सिनेमात मुंबईवरून आलेला दाखवला होता . हे थोड धक्कादायक होत .


भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणाऱ्या अजस्त्र  देशात  एक भारतीय राष्ट्रवाद आहेच पण प्रत्येक राज्याचा एक प्रादेशिक राष्ट्रवाद पण अस्तित्वात आहे . जस की 'तमिळ राष्ट्रवाद ' , 'पंजाबी राष्ट्रवाद ', मराठी राष्ट्रवाद , काश्मिरी राष्ट्रवाद ई . द्रमुक -अण्णा द्रमुक , शिवसेना -मनसे , अकाली दल  हे आक्रमक पक्ष या प्रादेशिक राष्ट्रवादाच्या वृक्षाला लागलेलीच फळ आहेत . अनेकदा त्यांचा प्रादेशिक राष्ट्रवाद हा राजकीय अपरिहार्यतेमुळे भारतीय राष्ट्रवादाला वरचढ ठरतो . अनेकदा हे प्रादेशिक पक्ष केंद्रीय राष्ट्रीय धोरणांपासून फटकून वेगळ्या धोरणाला पाठींबा देताना दिसतात . सिनेमा हा मनोरंजनाच साधन तर आहेचं पण प्रपोगंडाच पण एक महत्वाचं साधन आहे त्यामुळे प्रादेशिक सिनेमामधून पण आक्रमक प्रादेशिक राष्ट्रवादाचा उघड पुरस्कार होताना दिसतो . 
स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपले वेगळेपण उर्वरित किंवा उत्तर भारतापासून वेगळे ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असो दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका ठेवली आहे. सिनेमा क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट 'मद्रास कॅफे ' च्या प्रदर्शनाला तामिळनाडू मध्ये जोरदार विरोध झाला होता . कारण त्यामध्ये प्रभाकरन या तमिळ ईलम साठी लढा देणाऱ्या नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होत . राजीव गांधी यांची निर्घुण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरन बद्दल देशात संतापाची भावना असली तरी तामिळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे हे एक उघड गुपित आहे . अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्ष पण प्रो -प्रभाकरन होता . मागच्याच वर्षी श्रीलंकन सेनेने निर्घुणपणे ज्याची हत्या केली होती त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामिळनाडूमध्ये चित्रपट आला होता . 2014 मध्ये पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांच उदात्तीकरण करणाऱ्या   'कौम दे हिरे ' या चित्रपटावरून मोठ वादळ उठल होत . भिंद्रनवाले आणि खलिस्तान चळवळीबद्दल ममत्व बाळगणारा एक मोठा वर्ग आजही पंजाबमध्ये आहे .कधी कधी हे प्रादेशिक राष्ट्रवाद एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकतात . महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बनलेल्या 'मराठा टायगर्स ' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून चालू असलेला वाद हे याचे उदाहरण . या सिनेमाच्या निमित्ताने कन्नड अस्मिता आणि मराठी अस्मिता यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे .

दाक्षिणात्य चित्रपटांचा बारकाईने अभ्यास केला तर काही तथ्य समोर येतात . एकूणच तेलुगु , तमिळ ,मल्याळम फिल्म्समध्ये सध्या उत्तर भारतीय आणि मराठी खलनायकांची चलती आहे . आशिष विद्यार्थी , महेश मांजरेकर , राहुल देव , मुकेश ऋषी , प्रदीप रावत , सोनु सूद अशी अशी ही ' खलनायकांची लांबलचक यादी आहे .या यादीत सर्वात नवीन नाव म्हणजे अक्षय कुमार. रजनीकांतच्या पुढच्या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका बजावणार आहे .  उंचीने कमी असणारा, फारसा शारीरिकदृष्ट्या  फिट नसणारा मिशाळ दाक्षिणात्य नायक जेंव्हा आपल्यापेक्षा धिप्पाड 'उपऱ्या ' खलनायकाला आपटून आपटून मारतो तेंव्हा दाक्षिणात्य प्रेक्षक जबरदस्त खुश होतो . बऱ्याचदा  राष्ट्रवादाचा मार्ग हा पुरुषी मनोवृत्तीतून जातो . दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सध्या उत्तर भारतीय आणि पंजाबी नायिकांचा बोलबाला आहे . राकुल प्रीत सिंग ,  तमन्ना , हंसिका मोटवानी , काजल अगरवाल या नट्या सध्या खुप लोकप्रिय आहेत . राकट रावडी दाक्षिणात्य नायक जेंव्हा हाय क्लास -इंग्रजी झाडणाऱ्या नायिकेला धडा शिकवून नायिकेला त्याच्या  प्रेमात पडायला मजबूर करतो तेंव्हा प्रादेशिक राष्ट्रवादाच्या पुरुषी अहमला सुखावण्याचा तो प्रकार असतो .

हाच कित्ता बॉलीवूड चित्रपटपण गिरवताना दिसतात . बॉलीवूड मुंबईमध्ये असलं तरी त्यांच्या सिनेमामधून मुख्यतः पंजाबी आणि हिंदी संस्कृतीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो . पंजाबी संस्कृतीचा बॉलीवूड सिनेमामधून अजीर्ण होईपर्यंत भडीमार केला जातो . पंजाबी ठेक्याची गाणी , पंजाबी शब्दरचना असणारी गाणी , भांगडा नृत्य , पंजाबी विवाह सोहळे यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव भारतीय समाज जीवनावर पडताना दिसतो . अगदी महाराष्ट्रात पण आपल्या आजूबाजूला होणारे विवाहसोहळे  पाहिले तरी याची चुणूक दिसेल . विख्यात पत्रकार आणि समीक्षिका अनुपमा चोप्राने याच  'बॉलीवूडचं पंजाबीकरण ' अस सार्थ नामकरण केल आहे . ह्या बॉलीवूड सिनेमांनी बिगर हिंदी लोकांची हास्यास्पद 'स्टेरियोटाइप्स ' तयार केली आहेत . यांच्या सिनेमामधली  दाक्षिणात्य पात्र लुंगी नेसणारी , केसाळ , ओंगळ आणि विचित्र हिंदी उच्चार असणारी असतात . ख्रिश्चन पात्र 'हे मॅन ' अस पालुपद प्रत्येक वाक्यमागे लावून बोलत असतात. गुजराती पात्र कंजूष दाखवलेली असतात . कामवाली बाई हमखास मराठी असते . शिवाय ज्याच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो अस एखाद देशभक्त मुस्लिम पात्र हटकून हजर असतच . थोडक्यात सांगायचं तर 'हिंदी बेल्ट ' मधून आलेले लेखक -दिग्दर्शक उर्वरित भारतीय लोकांकडे कसे पाहतात हे हिंदी चित्रपटामधून कळत .

मराठी सिनेमामधून पण आक्रमक 'मराठी राष्ट्रवादाचा ' पुरस्कार होताना दिसतो . 'मी शिवाजीराजे भोसले  बोलतोय '  या चित्रपटामध्ये मराठी भूमिपुत्राविरुद्ध गुजराती -मारवाडी बिल्डरकडून होणाऱ्या अन्याय दाखवण्यात आला होता . 'गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा ' ही फिलॉसोफी या चित्रपटात मांडली होती .'कॅरी ऑन मराठा ' या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या प्रेमकथेत मराठी नायक कन्नड नायिकेच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या प्रेमाला आडवे जाणाऱ्या सर्व कन्नड खलनायकांना ठोकून काढतो . अवधूत गुप्तेच्या 'जय महाराष्ट्र ढाबा ,भटिंडा ' चित्रपटात नायक पंजाबमध्ये मराठी ढाबा उघडतो आणि पंजाबी नायिकेच्या प्रेमात पण पडतो .

भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि अंगावर येणारी विविधता असणाऱ्या देशात कुठलाही माणूस अनेक 'आयडेनटिटिज ' घेऊन वावरत असतो . त्याची 'आयडेनटिटि' भारतीय म्हणून तर असतेच पण ती एखाद्या भाषासमुहाची , जातीची , धर्माची आणि राज्याची पण असते . अनेक देशाच्या लोकांना 'आयडेनटिटि क्रायसिस ' ची समस्या भेडसावत असताना आपल्याकडे मात्र इतक्या साऱ्या आयडेनटिटिज घेऊन भारतीय नागरिक लिलया वावरतो . समाजाचा आरसा म्हणून घेणाऱ्या चित्रपट माध्यमात याच प्रतिबिंब पडणे स्वाभाविकच आहे . त्यामुळे जोपर्यंत देशात हि विविधता आहे तोपर्यंत चित्रपटामधून पण प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे वाजत राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे . हे चांगल का वाईट हे ज्याचं त्यान ठरवावं .

Tuesday, 26 January 2016

बॉलीवूडचे ‘बोलट’

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल. असाच एक ‘तो', काही वर्षांपूर्वी मुंबईमधल्या आमदार निवासात मुक्काम ठोकायचा प्रसंग आलेला तेव्हा माझ्या बाजूला सतरंजीवर अंगाचं मुटकुळं करून झोपला होता. त्याने ‘सत्या'मध्ये होम मिनिस्टरचा रोल केला होता. मी त्याला ओळखलं आणि त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आपल्याला पण ओळखणारे लोक आहेत, हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं शिल्लक होतं. "एमएलए साबके पीए को कभी कभार शूटिंग दिखाने ले जाता हूँ, तो रात को सोने का प्रबंध हो जाता है।’ शुद्ध तुपातल्या हिंदीमध्ये त्याने मला सांगितलं होतं. ‘आगे क्या?’ या माझ्या प्रश्नावर स्वस्त सिगारेटचा झुरका घेत तो शून्यात बघत बसला होता...
एखाद-दुसऱ्या प्रसंगांपुरते हजेरी लावून जाणारे अभिनेते, हा बॉलीवूडमधला अतिशय दुर्लक्षित विषय आहे. व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असणाऱ्या देशात हे तसं स्वाभाविकच. हे लोक नव्वदच्या दशकातल्या सिनेमांमध्ये खूपदा दिसतात. या लोकांना आयुष्यात एकदाही मुख्य भूमिका मिळत नाही. हे लोक बहुधा मुख्य खलनायकाचे ‘साइड किक' असतात. काही बिनमहत्त्वाचे संवाद, जमलं तर बलात्काराचा एखादा प्रयत्न, तीन-चार विकट हास्य आणि यांचा पडद्यावरचा खेळ खतम!
अभिनयाला उपजीविका बनवण्याचा निर्णय घेताना यांच्या डोक्यात नेमकं काय होतं, याचं कुतूहल मला नेहमी वाटतं. लोक यांना फक्त चेहऱ्याने ओळखतात, नावाने नाही! एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असू शकते? खलनायक किंवा पडद्याला व्यापून दशांगुळे उरलेल्या नायकांच्या वटवृक्षात ही रोपटी कायमची खुरटून गेलेली असतात...
या संदर्भात, सर्वात प्रथम आठवतो तो महावीर शाह. काही लोकांच्या चेहऱ्यावरच खलनायक असं लिहिलेलं असतं. महावीर शाह त्यांच्यापैकी एक होता. त्याने चुकून एकदा सलमान खानच्या ‘जुडवा' चित्रपटामध्ये एका सज्जन पोलिस ऑफिसरची भूमिका केली होती, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत (म्हणजे पडद्यावर त्याची हत्या होईपर्यंत) हा कधी ‘कलटी' मारतो, याची भीती वाटत होती. मध्ये अझीझ मिर्झा आणि शाहरुख खानच्या चित्रपटांचं पेव फुटलं होतं, त्यात हा हमखास असायचा. हा २०००मध्ये एका अपघातात मेला. काही वर्तमानपत्रांनी चौथ्या-पाचव्या पानावर ही बातमी छापली. महावीर शाह या दुर्लक्षित अभिनेत्याची प्रसारमाध्यमांनी घेतलेली ही पहिली आणि शेवटची दखल.
शोले’मध्ये मॅकमोहनचा दुसरा संवाद कुठला, ते सांगा? असा क्रूर विनोद मध्यंतरी फिरत होता. क्रूर या अर्थाने की, आयुष्यातली चाळीस वर्षं फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवून पण या माणसाचा ‘शोले' तर जाऊच दे, इतर कुठल्याही चित्रपटामधला दुसरा संवाद पण कुणाला माहीत नाही. (खरं तर ‘शोले'मध्येच ‘चल बे जंगा, चीडी की रानी है’ असा संवाद इतर डाकूंसोबत पत्ते खेळताना तो बोलतो). आपला चित्रपटामधला रोल खूप लहान आहे, म्हणून स्वतः मॅकमोहनने आयुष्यात कधीच ‘शोले’ बघितला नाही. क्रिकेटर बनण्यासाठी मुंबईला आलेला मॅकमोहन कायम चित्रपटात दुय्यम-तिय्यम भूमिका बजावत राहिला. तो गेला तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला इनमिन दहा लोक होते...
या यादीत महिला कलाकार पण आहेत. सगळ्यात पहिलं आठवतं, ते नाव मनोरमाचं. हिचं खरं नाव एरिन इसाक डॅनियल. ही मूळची लाहोरची. हिरोइन बनण्यासाठी मुंबईला आली. हिचा अवतार बघून हिला कोण मुख्य अभिनेत्रीचं काम देणार? मग हिने मिळतील त्या फुटकळ भूमिका करायला सुरुवात केली. पण हिचा अभिनयाचा सेन्स उत्तम होता. ‘सीता और गीता’मधल्या हेमामालिनीच्या खाष्ट काकूच्या भूमिकेत हिने मस्त रंग भरले. ‘नया दिन, नयी रात’मधली हिची छोटी, पण छान भूमिका चित्रपट रसिक लक्षात ठेवतील. सुंदर आणि सडपातळ नसल्याचा फटका हिला बसला आणि आयुष्यभर ‘फुल फ्लेज’ म्हणावी, अशी एक पण भूमिका हिला मिळाली नाही.
रझ्झाक खान म्हटल्यावर प्रेक्षक "कोण हा?' असे विचारतील. दुर्दैवाने लोक याला ‘गुंडा’ चित्रपटातल्या त्याच्या ‘लकी चिकना’ या विचित्र नावाच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखतात. अक्षय कुमारच्या ‘मोहरा’मध्ये त्याने एका उपखलनायकाची आणि त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव सिरियस भूमिका केली होती. गोविंदाच्या नव्वदच्या दशकामधल्या चित्रपटात हा हमखास हजर असायचा. पण सध्या चित्रपटांमध्ये त्याच्यासारख्या अतरंगी नटाला स्पेसच राहिलेली नाही...
बॉब क्रिस्टो. ‘विदेशी स्मगलर’चा बॉलिवूडी चेहरा. पडद्यावर सगळ्यात जास्त मार खाणारा इसम म्हणून याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’मध्ये नोंद होऊ शकते. सिडनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असणारा हा उंचापुरा माणूस, झिनत अमानच्या प्रेमापोटी (अर्थातच एकतर्फी) मुंबईला आला आणि इथलाच झाला. ‘स्मगलर’च्या भूमिकेत टाईपकास्ट झाल्यामुळे याला ठरावीक लांबीच्या आणि वकुबाच्या भूमिका मिळत गेल्या. ‘मिस्टर इंडिया'मधली याची भूमिका त्यातल्या त्यात गाजली. मिस्टर इंडिया याला हनुमानाच्या मूर्तीने मारतो, तेव्हा त्यात आता ‘धार्मिक राष्ट्रवाद' शोधणारं पब्लिक टाळ्या पिटायचं.
कांती शाहचा ‘It's so bad, that it's good’ सिंड्रोममुळे प्रेक्षकप्रिय असलेला ‘गुंडा’ चित्रपट म्हणजे या ‘साइड किक’चे जागतिक संमेलन होते. लंबू आटाच्या भूमिकेमधला इशरत अली, इबु हटेलाच्या भूमिकेमधला हरीश पटेल, इन्स्पेक्टर काळेच्या भूमिकेमधला राणा जंग बहादूर, काला शेट्टीच्या भूमिकेमधला रामी रेड्डी, बचुभाई भिगोनाच्या भूमिकेतले दीपक शिर्के, लकी चिकनाच्या भूमिकेमधला रझ्झाक खान अशी उपखलनायकांची मांदियाळी या चित्रपटात उसळली होती.
अजूनही कित्येक नावं आहेत. तेज सप्रु, महेश आनंद, राणा जंगबहादूर, पिंचू कपूर, पद्मा खन्ना किती नावं घ्यावीत. हल्ली खलनायकाचे ‘साइड किक' ही गोष्ट आपल्या चित्रपटामधून नामशेष होत आहे. कारण मुळात ‘खलनायक’ ही संस्थाच नामशेष होत चालली आहे. ती का नामशेष होत आहे, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. मागच्या पाच वर्षांतला एक प्रभावी खलनायक सांगा म्हटलं तर कुठलं नाव आठवतं? एखादा प्रकाश राज सोडला तर दुसरं नावं आठवणार नाही. मग मुळात खलनायकच नसेल तर त्याचे ‘साइड किक' कुठून दिसणार?
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली'मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट ही एक व्यक्तिरेखा होती. पुलंच्या शब्दांत... जनू ‘बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे ‘बोलट', अशी एक विष्णूदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे; परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता... हे ‘साइड किक' अभिनेते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी धड नोंद पण घेतली गेली नाही. बॉलीवूड म्हणजे सुपरस्टार्स, हिरो-हिरोईनची लफडी, करोडोंची आकडेमोड नाही तर अनेक तुटलेल्या आणि कधीच पूर्ण न झालेल्या शेकडो स्वप्नांची कब्रस्तान पण आहे. आपल्या मर्यादित वकुबाने बॉलीवूडला पुरेपूर योगदान देणाऱ्या आणि कधीच श्रेय न मिळालेल्या अभिनेत्यांना एका चित्रपट चाहत्याचा मानाचा मुजरा.

Sunday, 3 January 2016

भारतीय सिनेमाचं 'दलित' ऑडिट

कलाकाराला जात , धर्म आणि देश नसावा आणि त्यांचे मूल्यमापन या निकषांच्या पलिकडे जाऊन त्याच्या कलाकृतीच्या आधाराने व्हावे असा एक संकेत आहे . गेल्या काही दिवसात आपण एक देश आणि समाज म्हणून हा संकेत वारंवार पायदळी तुडवत आहोत . आपण हे सिद्ध केले आहे की कलाकाराला जात
( कट्यार … फक्त पुणेकर आणि भावे आडनाव असणारे लोकच बनवू शकतात हे विधान), धर्म (मंगेशकर भगिनी आणि आमिर खान यांच्या एकाच अर्थाने केलेल्या विधानाला मिळालेला टोकाचा वेगवेगळा प्रतिसाद ) आणि देश (गुलाम अली प्रकरण ) पण असतो हे आपण एक समाज म्हणून सिद्ध केले आहे . जात हे भारताचे न बदलणारे वास्तव आहे ,हे गृहित धरून भारतीय सिनेमाचे सामाजीक विश्लेषण होण्याची नितांत गरज आहे . विशेषतः शतकानुशतक समानतेची संधी नाकारल्या गेलेल्या वर्गाचं भारतीय सिनेमाच्या प्रदीर्घ इतिहासात किती योगदान आहे ? स्वातंत्र्योत्तर भारतात दलित वर्गाला भारतीय सिनेमात आपलं कर्तुत्व दाखवण्याच्या समान संधी मिळाल्या का ? खान त्रयी ही भारताच्या 'सेक्युलर 'पणाचा पुरावा आहे अस आपण जेंव्हा म्हणतो तर आपल्याकडे आतापर्यंत किती दलित स्टार्स किंवा सुपरस्टार्स झाले ? दुर्दैवाने यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तर नकारात्मक आहेत .

खर तर भारतीय सिनेमासृष्टी (बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीज ) या अतिशय सेक्युलर मानल्या जातात . आपल्याकडे इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळणारे 'discrimination ' इथे बरेच कमी आहे . तुमच्या अंगात गुणवत्ता असेल तर तुम्हाला तुमचं नाण इथ खणखणीत वाजवून दाखवता येत . अर्थातच भरपुर संघर्ष केल्यावर . भारतात आढळणाऱ्या धार्मिक आणि जातीय विषमतेचा बॉलीवूडने अनेक सिनेमामधून भरपूर विरोध पण केला आहे . पण इतक्या उदारमतवादी मानल्या गेलेल्या फिल्मइंडस्ट्रीच्या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये किती दलित व्यक्तिरेखा मध्यमवर्ती पात्र होत्या याचा शोध घ्यायला गेलो तर पदरी निराशा पडते . प्रकाश झाच्या 'आरक्षण ' सिनेमामध्ये सैफ अली खानने साकारलेला दलित प्राध्यापक किंवा विधु विनोद चोप्राच्या 'एकलव्य ' सिनेमामध्ये संजय दत्तने साकारलेला दलित पोलिस अधिकारी किंवा देविका राणी आणि अशोक कुमारचा 'अछूत कन्या ' हा चित्रपट असे काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे अपवाद आहेत . विशाल भारद्वाजने 'ओंकारा ' मध्ये उत्तर भारतामधल्या जातींचे 'अंडरकरंट' प्रभावीपणे दाखवले होते . शेखर कपुरच्या अंगावर शहारे आणणाऱ्या 'बॅण्डिट क्वीन ' चा पण उल्लेख करावा लागेल . आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेस ' आणि 'लगान ' मध्ये दलित पात्र होती . अनुराग कश्यपच्या 'गुलाल ' आणि 'वासेपूर ' चित्रपटद्वयीत जातीचे संदर्भ परिणामकारकतेने येतात . भारतीय मेनस्ट्रीम सिनेमापेक्षा याबाबतीत भारतीय 'आर्टहाउस' सिनेमाची कामगिरी बरीच उजवी आहे . आपल्या चित्रपटामधून विविध सामाजीक विषय हाताळणाऱ्या श्याम बेनेगल आणि इतर मंडळीनी जात वास्तव दाखवणारे अनेक चित्रपट बनवले . पण या 'आर्टहाउस' सिनेमाला बऱ्याच आर्थिक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर मर्यादा (जसे की सिनेमाचे वितरण) आहेत .

हे झालं पडद्यावरच्या दलित पात्रांबद्दल . भारतीय सिनेमावर किती दलित कलाकारांनी छाप सोडली आहे याचा आढावा घ्यायला गेलो तरी हाच नकारात्मक सुर पुन्हा आढळतो . खर तर ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधला खराखुरा 'पहिला यशस्वी दिग्दर्शक ' मानलं जात असे कांजीभाई राठोड हे गृहस्थ दलित होते . एकोणीशे वीस आणि तीसच्या दशकात या दिग्दर्शकाने 'काला नाग ' (आपल्याकडचा पहिला क्राईम थ्रिलर ), 'भक्त विदुर ' असे यशस्वी चित्रपट दिले होते . पण पुढे मात्र यशस्वी दलित दिग्दर्शक फारसे दिसत नाही . कलाकारांच्या बाबतीत बघायला गेलं तर अकाली गेलेली आघाडीची अभिनेत्री दिव्या भारती , जॉनी लिवर , आपल्या मराठीमधली प्रतिभावान अभिनेत्री उषा जाधव , सीमा विश्वास, राखी सावंत असे काही कलाकार आहेत . अजय देवगण ज्या विश्वकर्मा जातीचा आहे ती काही राज्यांमध्ये SC तर काही राज्यांमध्ये OBC श्रेणीत येते . दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीत काही लोकप्रिय दलित कलाकार आहेत . पण हा सगळा नसला तरी इतर क्षेत्रात असलेल्या उपस्थितीचा अनुशेष चित्रपटसंगीत क्षेत्रात भरून निघताना दिसतो . यात सोनु निगम , इलया राजा , दलेर मेहेंदी , मिका , सुखविंदर सिंग , हंस राज हंस ,आपल्याकडचे आनंद शिंदे -मिलिंद शिंदे , कैलाश खेर असे अनेक गायक -संगीतकार दलित समाजामधून आलेले आहेत . यात अजून एक नाव आहे ते म्हणजे संवेदनशील कलाकार आणि एकाहून एक अप्रतिम गाणी लिहिणारा गीतलेखक शैलेंद्र . शैलेंद्रची ओळख फक्त अप्रतिम गीतकार एवढीच नाही . 'तिसरी कसम ' सारखा अतिशय सुंदर चित्रपट त्याने निर्माता म्हणून बनवला होता . शब्दात रमणाऱ्या या माणसाला निर्मितीची आणि किचकट चित्रपट वितरणाची आर्थिक गणित काही जमली नाहीत आणि त्याला दिवाळखोरीचा सामना करावा लागला . सिनेमा क्षेत्रात ठसा उमटवणारी ही गिनीचुनी नाव भारतीय सिनेमा हा सर्वसमावेशक आहे या गृहितकावर प्रश्नचिन्ह उमटवतात . अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामध्ये अनेक बाबतीत मुस्लिम समाज आणि दलित समाज यांच्यात साम्यस्थळ आढळतात . पण चित्रपटक्षेत्राचा विचार केला तर मुस्लिम समाज दलित समाजापेक्षा मैलोगणती पुढे असल्याचं आढळून येत .

भारतीय सिनेमामध्ये असणाऱ्या दलित अनुशेषाची कारणमीमांसा करायला गेलो तर काही ठळक कारण समोर येतात . भारतीय सिनेमा हा बऱ्याचदा नेहमी 'उत्सवी ' मोड मध्ये असतो . चोप्रा , जोहर , बडजात्या आणि या त्रिकुटाला आंधळेपणाने कॉपी करणारे इतर निर्माता -दिग्दर्शक हे त्यांच्या चित्रपटात ढीगभर सुख आणि चिमुटभर दुख दाखवत असतात . रखरखीत सामाजिक वास्तवाला भिडण्याची त्यांची एकतर बौद्धिक कुवत नाही किंवा हिम्मत नाही . दुर्दैवाने 'सेफ बेट ' खेळणाऱ्या या निर्माता -दिग्दर्शकांच्या फिल्म्स आपल्याकडे जास्त चालतात . दलित पात्र किंवा समस्या या त्यांच्या परीघावर पण नाहीत . अजून एक कारण सांगायचे तर सुरुवातीच्या काळात बनणारे बहुतेक चित्रपट हे पौराणिक विषयांवरील चित्रपट होते . आपल्याकडच्या पौराणिक कथांमध्ये दलित पात्र आढळत नाहीत . आढळली तर ती पण राक्षस वैगेरेच्या रुपात . त्यामुळे सुरुवातीच्या काळातच दलित पात्र डावलली गेली . सिनेमा उत्क्रांतीच्या या महत्वाच्या टप्प्यात डावलल्या गेल्याने पुढे त्यांना पुनरागमन करायला जमले नसावे . अजून एक म्हणजे आपल्याकडच्या पुर्वीच्या आणि आताच्या आघाडीच्या निर्माता दिग्दर्शकांच्या यादीवर एक नजर फिरवली लगेच त्यावर असणारा मराठी ,पंजाबी आणि उत्तर भारतीय उच्चवर्णीय पगडा लगेच लक्षात येतो . पैसा भगवान है असे मानणाऱ्या आणि सर्वाधिक ताकत बाळगून असणाऱ्या या निर्माता दिग्दर्शकांना दलित आणि त्यांच्या समस्यांशी देणेघेणे नसणे हे त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आहे .

भारतात दलित सुपरस्टार का तयार होत नाहीत हा प्रश्न मात्र चक्रावून टाकणारा आहे . या प्रश्नाचा एकूणच खोलात जाऊन अभ्यास होण्याची गरज आहे . 'कोलावरी डी' गाण्यामुळे आणि 'रांझना ' सारख्या लोकप्रिय चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धनुष हा अभिनेता दलित आहे . रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानने झोकात चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते . कंगना राणावत सारखी तोलामोलाची अभिनेत्री त्याची पहिल्या चित्रपटात सहकलाकार होती . पण तो चित्रपट चालला नाही . वडिल एवढे मोठे राजकारणी असून पण चिरागला दुसरा चित्रपट कधीच मिळाला नाही . आता तर तो पुर्ण वेळ राजकारणीच झाला आहे . पासवान यांना मोदींच्या कंपूत आणण्यामागे त्याचा मोठा हातभार होता असे म्हणतात .मराठी पुरत बोल्याच झाल तर राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या उषा जाधव यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीला त्यांच्या वकुबाच्या किती भुमिका मिळाल्या ? हा प्रश्न आहे . तिच्या पण जेंव्हा इतर प्रतिभावान दलित अभिनेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर नाव पण सापडत नाहीत . दलित समाजामधून आलेले संघर्षरत अभिनेते नंतर कुठे गायब होतात यावर संशोधन होण्याची गरज आहे .

महात्मा गांधीसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर एक अतिशय बिग बजेट सिनेमा बनला . देशी विदेशी प्रेक्षकांनी त्या सिनेमाला डोक्यावर उचलून धरले . ऑस्करसकट अनेक ठिकाणी त्या चित्रपटाला नामांकन मिळाली . काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्वावर चित्रपट बनला . तुलनेने अतिशय कमी बजेटमध्ये . ह्या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसी ने केली . तिथल्या लाल फितीच्या कारभारामुळे आणि बाबुशाहीमुळे चित्रपटाच्या वितरणामध्ये अक्षम्य चुका झाल्या आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अनियमितता आली . दलित जनतेची तिकीट खिडकीवर झुंबड उडाली . परभणीला मी स्वतः ती गर्दी बघितली आहे . पण बाकी लोकांना हा चित्रपट कधी आला व कधी गेला हे कळल पण नाही . ज्यांना कळल त्यांनी एक कंटाळवाणा अनुत्साही प्रतिसाद दिला . या उदाहरणामध्ये मला वाटत वर उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची अलिखित उत्तर मिळून जातील . चित्रपट हा आपल्या समाजाचा आरसा असेल तर आपला आरसा अनेक ठिकाणी तडे गेलेला आहे इतकंच .

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-amol-udgirkar-rasik-article-in-marathi-5212258-NOR.html

Wednesday, 23 December 2015

संकटकालिन खिडक्या...'दिव्य मराठी ' च्या दिवाळी अंकात आलेलं 'भारतीय बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री ' या विषयावरचा माझा लेख. पहिले एकदा पोस्ट केला होता नंतर पुन्हा डिलीट केला . आता पुन्हा टाकत आहे
डद्यावर चित्रपट सुरू आहे, पण प्रेक्षकांना काही देणंघेणं दिसत नाहीये... थिएटरमध्ये गच्च काळोख भरून राहिला आहे... कुणी ओळखीचा माणूस प्रेक्षकांमध्ये असला तर त्याने आपल्याला ओळखू नये, यासाठी तो अंधार महत्त्वाचा भूमिका बजावतो आहे... थोडक्यात, अंधारामुळे तोंड लपवून फिरण्याची गरज नाहीये. सोबतीला एक अगम्य कुबट वास. पडदा पण फाटलेला... हजर असलेले प्रेक्षक कोपऱ्याच्या ‘सीटा’ पकडून आहेत... त्यात आपल्या शारीरिक गरजांचे काय करावं, हे न समजून तिथे आलेले काही टीनएजर्स, कचरा वेचणारे लोक आणि तत्सम खालच्या आर्थिक वर्गातून आलेले लोक यांचाच मुख्यत्वे प्रेक्षकांमध्ये समावेश आहे... स्त्रियांचं प्रमाण एकदम नगण्य. एखादं दुसरी भडक मेकअप केलेली बाई हजर आहे, तीसुद्धा एखाद्या फाटक्या व्यक्तीसोबत... त्या जोडीला चित्रपट बघण्यापेक्षा त्या गच्च काळोखात इतर गोष्टी करण्यातच जास्त रस आहे... इतक्यात पडद्यावर एखादा ‘तसला’ सीन सुरू होतो आणि एकटे एकटे आलेलं पब्लिक सरसावून बसतं... तो सीन संपतो आणि त्या पब्लिकचा रस संपतो. मध्यंतरापर्यंतच अर्धं थिएटर रिकामं होतं. ती भडक मेकअप केलेली बाई आणि तो फाटका माणूस अजून तग धरून असतात. चित्रपट संपायच्या अगोदर ते पण निघून जातात... शो संपतो... आक्रसलेलं थिएटर पुन्हा त्याच नवीन खेळासाठी सज्ज होतं...
हे चित्र कुठलाही ‘कच्ची कली’, ‘डाकू हसीनाबाई’ किंवा ‘रेशमा की जवानी’ नामक चित्रपट दाखवणाऱ्या जीर्ण शीर्ण चित्रपटगृहात दिसतं. कुठल्याही चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये असणाऱ्या दृश्याच्या एकदम उलट. शेतकरी नेते शरद जोशींनी मांडलेल्या ‘इंडिया आणि भारत’ थिअरीसाठी एक दृश्यात्मक परिमाण निवडायचे असेल तर वर वर्णन केलेले सिंगल स्क्रीन थिएटर आणि मल्टिप्लेक्स यांच्याइतकं समर्पक उदाहरण सापडणार नाही. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची पण एक विशिष्ट उतरंड आहे. या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी आहेत ते ‘बी ग्रेड चित्रपट’ दाखवणारे चित्रपट. जगभरात ‘बी ग्रेड’ चित्रपट म्हणजे, अतिशय कमी पैशात बनलेले, आशय-विषय सामान्य असलेले चित्रपट. पण आपल्याकडे या व्याख्येत अजून एक महत्त्वाचा घटक समाविष्ट होतो, तो म्हणजे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतो म्हणून मुळातच नसलेल्या कथेत टाकलेला, ‘सेक्शुअल कंटेंट’. या प्रकारच्या चित्रपटांना कुठल्याही प्रकारच्या वैश्विक जाणिवा नसतात. गेला बाजार चित्रपट माध्यमाची सामाजिक बांधिलकी वगैरे शब्दबंबाळ विषयांशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना आवडेल, ते देण्याचं असिधाराव्रत पाळत बी ग्रेड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक कार्यरत असतात.

बी ग्रेड चित्रपटांचा इतिहास

भारताला बी ग्रेड सिनेमांचा फार जुना इतिहास आहे. बी. आर. इशारा, आय. एस. जोहर, विनोद तलवार वगैरेे मंडळी यात आघाडीवर होती. पण त्या वेळची बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री आणि आताची बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री यात जमीन- अस्मानाचा फरक आहे. त्या काळातल्या बी ग्रेड चित्रपटांची निर्मितिमूल्ये जरी कमी दर्जाची असली तरी चित्रपटाला कथानक असायचं. चित्रपटातून कधी तरी एखादा ‘सोशल मेसेज’ देण्याचाही संबंधितांचा प्रयत्न असायचा. यात मोठा बदल झाला, तो १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रात के अंधेरे मे’ चित्रपटानंतर. त्या काळाचा विचार करता, त्या चित्रपटामध्ये बराचसा ‘इरॉटिका मसाला’ भरला होता. चित्रपट बऱ्यापैकी चालला. त्या चित्रपटाने थोड्या गुंतवणुकीत जास्त गल्ला गोळा करण्याची आकांक्षा असणाऱ्या अनेक लोकांना संधीची नवी कवाडं उघडून दिली. लैंगिक जाणिवांबद्दल अतिशय भंपक असलेल्या भारतीय समाजात लैंगिक उपासमार होणारे असंख्य लोक असणार आणि आपण त्यांना हवे ते मोठ्या पडद्यावर दाखवायचे, हे त्यामागचे सूत्र होते. नंतर या क्षेत्रात रामसे बंधूंचं आगमन झालं आणि या खेळाचे नियमच बदलून गेले.
एफ. यू. रामसे हे कराचीमधले मोठे प्रस्थ. फाळणीनंतर आपले चंबुगबाळं आवरून रामसे आपली सात मुलं आणि मोठा जामानिमा घेऊन मुंबईला आले. उत्तम बिझनेसमन असणाऱ्या रामसे परिवाराने मुंबईत चांगला जम बसवला. रामसे यांना चित्रपटांचा मोठा शौक होता. त्यांनी ‘शहीद ए आझम भगतसिंग’, ‘रुस्तुम सोहराब’सारख्या मोठ्या बजेटची चित्रपट निर्मिती केली; पण दैवाचे फासे फिरले. हे चित्रपट पडले. दिवाळखोरीची वेळ आली. कर्जाचा डोंगर उभा राहिला. यातून मार्ग कसा काढायचा? रामसेनी प्रोड्यूस केलेल्या ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ चित्रपटात एक प्रसंग होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारे पृथ्वीराज कपूर एक भीतिदायक मुखवटा घालून चोरी करतात आणि मुमताज या अभिनेत्रीला घाबरवतात, असा तो प्रसंग त्या चित्रपटात होता. या ‘भयानक’ प्रसंगातून रामसेंना प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान मिळवून बसलेला आणि नंतर ‘कल्ट’ झालेल्या ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली. केवळ पंधरा लोकांच्या ‘क्रू’ने हा चित्रपट अवघ्या एका महिन्यात हातावेगळा केला. तिकीट खिडकीवर चित्रपट धो धो चालला आणि बी ग्रेड फिल्म्समधले ‘रामसे युग’ सुरू झाले. नंतर रामसे बंधूंनी ‘दरवाजा’सारखे तब्बल ३० लो बजेट भयपट प्रोड्यूस केले. ‘रामसे’ आडनावाचा ब्रँड या प्रकारच्या चित्रपटांशी एवढा जोडला गेला, की काही वेगळं करू पाहणाऱ्या रामसे कुटुंबाच्या पुढच्या पिढीला त्याचंच ओझं होऊ लागलं. या स्वतःच तयार केल्या गेलेल्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटी केशू रामसे या धाकट्या पातीने स्वतःच्या आडनावाला चक्क रजा दिली आणि फक्त केशू या नावाने ‘खिलाडी’ अक्षयकुमारसारखे बडे स्टार घेऊन ए ग्रेडची चित्रपटनिर्मिती सुरू केली.
तत्कालीन बी ग्रेड चित्रपट निर्मात्यांपैकी अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे जोगिंदर. ६५ वर्षांचा जोगिंदर २००९ मध्ये आपल्या जुहूमधील घरात मरण पावला, तेव्हा वर्तमानपत्रांत आतल्या पानावर त्याच्या मृत्यूची सिंगल कॉलम बातमी आली होती. पण एकेकाळी या जोगिंदरने सातत्याने बी ग्रेड हिट चित्रपट दिले होते. जोगिंदर हा एकाच वेळेस निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संकलक आणि अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडायचा. तो ‘रंगा खुश’ या आपल्या पडद्यावर साकारलेल्या चरित्र भूमिकेच्या नावाने पण ओळखला जायचा. ‘Its so bad that it’s good’ या सिंड्रोमची रेलचेल त्याच्या चित्रपटात होती. ‘प्यासा शैतान’, ‘रंगा खुश’, ‘बिंदिया और बंदुक’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. रद्दड कथा, उन्मुक्त अंगप्रदर्शन, दर पाच मिनिटाला येणारी गाणी ही जोगिंदरच्या चित्रपटांची काही व्यवच्छेदक लक्षणं. त्याच्या ‘प्यासा शैतान’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत चक्क कमल हसन होता. मूड ऑफ असेल तर यूट्यूबवर जाऊन जोगिंदरच्या चित्रपटांच्या क्लिप पाहा. हसून हसून तबियत खुश होऊन जाईल. विशेषतः जोगिंदरच्या लोटा डान्सची क्लिप तर अफलातून विनोदी या श्रेणीतली आहे.
बी. आर. इशारा हे या प्रभावळीमधले अजून एक मोठं नाव. भारतीय चित्रपटामध्ये सेक्स आणि अतिशय बोल्ड संवाद आणण्याचं श्रेय बी. आर. इशारांचे. पु .ल . देशपांडे यांच्या भाषेत भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ने मराठी सारस्वतांना डुलक्या घेताना पकडले, अगदी त्याचप्रमाणे पोरकट आणि सपक प्रेमकथांच्या विळख्यात अडकलेल्या बॉलीवूडला बी. आर. इशारा यांच्या ‘चेतना’ चित्रपटाने गदागदा हलवून झोपेतून उठवले. ‘चेतना’ चित्रपटाच्या पोस्टरवर शरीराचं प्रदर्शन करणारी रेहाना म्हणजे, मोठा बॉम्बगोळा होता. बी. आर. इशारांचे चित्रपट कमी बजेटचेे आणि बोल्ड कंटेंटवाले असले तरी त्या चित्रपटाना किमान कथानक असायचं. सामाजिक संदेश असायचा. समाजात असणाऱ्या सेक्सविषयक दुहेरी मापदंडांवर कोरडे ओढलेले असायचे.

कांती शहा नावाचं कल्ट

रामसे बंधू जर बी ग्रेड फिल्मचा भूतकाळ असतील, तर कांती शहा हा वर्तमानकाळ आहे. अनेक लोक त्याला ‘बी ग्रेड फिल्म्सचा करण जोहर’ म्हणूनही हिणवतात. कांती शहाने तब्बल ९० चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. अनेक प्रेक्षकांना कांती शहा माहीत आहे, तो त्याच्या कल्ट क्लासिक ‘गुंडा’ या फिल्ममुळे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स व अतिशय वाईट तांत्रिक बाजू असते, तेव्हा ‘गुंडा’सारखा चित्रपट तयार होतो.आज IMBD सारख्या वेबसाइटवर ‘गुंडा’च मानांकन रणबीरच्या ‘रॉकस्टार’, विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’, आणि चक्क ‘शोले’पेक्षा पण जास्त आहे. खरं तर ‘गुंडा’चा दिग्दर्शक हीच कांती शहाची ओळख करून देणे म्हणजे, त्याच्यावर अन्याय होईल. ‘डाकू मुन्नीबाई’, ‘गरम’, ‘कांती शहा के अंगूर’, ‘लोहा’, ‘शीला की जवानी’ या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. विक्रमादित्य मोटवानीच्या गाजलेल्या ‘उडान’ या चित्रपटात, ‘कांती शहा के अंगूर’ या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होतो. ‘उडान’मधला टीनएजर नायक आणि त्याच्या मित्रांच्या लैंगिक जाणिवांचा, तो चित्रपट एक अविभाज्य हिस्सा असतो .
छोट्या आणि सेमी-अर्बन भागात कांती शहाच्या चित्रपटांना आजही लाखोंचा चाहता वर्ग आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. कांती शहाला तुम्ही यशस्वी मानत असाल, तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. ही कांती शहाची बायको. पण ती कांती शहाच्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही, तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर पण भरपूर ‘योगदान’ दिले आहे. कांती शहाच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे.
कांती शहाने त्याच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत धर्मेंद्र, मिथुन, गोविंदा, मनीषा कोईराला अशा ‘ए ग्रेड’ अभिनेत्यांसोबत पण काम केलं आहे. अर्थात,‘बी ग्रेड’ चित्रपटात काम करणारे मोठे अभिनेते हा स्वतंत्र लेखाचा विषय. राजेश खन्नाने आपल्या पडत्या काळात ‘वफा’ नावाचा एक तद्दन ‘बी ग्रेड’ चित्रपट केला होता. त्यात त्याने केलेले काही सीन्स पाहून त्याच्या चाहत्यांवर वीज पडेल. तीच गोष्ट उर्वशी ढोलकिया या ‘बिग बॉस’च्या विजेतीची. या प्रकारच्या चित्रपटात काम करणाऱ्या आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्री सपना, पूनम दास गुप्ता, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा या आहेत.H

दाक्षिणात्य स्कूल

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपले वेगळेपण उर्वरित किंवा उत्तर भारतापासून वेगळे ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असो दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. सिनेमा क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. दाक्षिणात्य प्रादेशिक ‘बी ग्रेड’ चित्रपट (तेलुगू, मल्याळम, तामिळ) हे आपल्या उत्तर भारतीय जातभाईपेक्षा अधिक धीट, अधिक बोल्ड असतात. त्याच्या या बोल्ड कंटेटमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून ते देशभरात बघितले जातात. रेशमा, शकीला, देवी या अशा चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रींना देशभर मोठी लोकप्रियता आहे.

बी ग्रेड ची ‘सोशिओलॉजी’

चित्रपट बघायला येणाऱ्या दर्शकांची एक सोशिओलॉजी असते. सलमान खानच्या चित्रपटात टाळ्या-शिट्ट्यांचा गजर चालू असतो. त्यातून त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग कुठल्या वयोगटातला आहे, कुठल्या सामाजिक वर्गातून आला आहे, याचा अंदाज बांधता येतो. हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे, व्हाइट कॉलर, बहुधा उच्चवर्गातून आलेला, असा एक ‘स्टिरिओटाइप’ आहे. अर्थातच, हे काही आखीव नियम नाहीत, तर ढोबळमानाने मांडलेले अंदाज आहेत.
बी ग्रेड फिल्म आणि या फिल्म्स ज्या चित्रपटगृहात लागतात, त्या थिएटरची पण स्वतःची ‘सोशिओलॉजी आहे. साधारणपणे या प्रकारच्या चित्रपटांना येणारा प्रेक्षक, हा समाजाच्या खालच्या आर्थिक स्तरातला. शारीरिक श्रम करून जगणारा असतो. स्वस्तात दोन घडी विरंगुळा म्हणून तो इथे येतो. मल्टिप्लेक्स आणि मोठे चकचकीत मॉल, इथे त्याला कागदोपत्री नसली तरी अघोषित प्रवेशबंदी असते. हे घाणेरडे, मळके कपडे घातलेले लोक आणि त्यांची शेंबडी चिल्लीपिल्ली ही मल्टिप्लेक्स आणि मॉलच्या व्यवस्थापनाला आपल्या अधिकारक्षेत्रात नको असतात. कितीही कटू असलं, तरी हे आपलं आजच सामाजिक वास्तव आहे. निशिकांत कामतच्या ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटात या विषयावर सुंदर भाष्य केले आहे. या प्रेक्षकाला बी ग्रेड फिल्म्स दाखवणाऱ्या चित्रपटगृहात राजरोस जाता येतं. कुठेही पाय पसरून बसता येतं. या चित्रपटांच्या प्रेक्षकांत टीनएजर्सचा अधिक भरणा असतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, असतातं. मध्येच एखादं समलैंगिक जोडपं येतं. समाजात ज्या गोष्टी राजरोस करायला परवानगी नाही त्या करण्याची परवानगी हा चित्रपटातला कुबट काळोख देतो. एकप्रकारे ही चित्रपटगृहे आपल्या समाजव्यवस्थेच्या ‘संकटकालीन खिडक्या’ असतात. आपल्या समाजाबद्दल आणि त्याच्या संस्कारीपणाबद्दल ज्यांच्या भ्रामक कल्पना आहेत, त्यांना या परिसरात फिरवून आणावे. त्यांची संस्कारीपणाची पुटं गळून पडतील. समाजातला मध्यमवर्ग या थिएटरकडे लांबूनच पाहत असतो. मनात प्रचंड औत्सुक्य असलं, तरी चेहऱ्यावर तुच्छता दाखवायचं कसब यांना साधलेलं असतं. हे लोक कधी इकडे फिरकत नाहीत. चुकून कुणी फिरकलाच, तर कुणी पाहिलं, तर लोक काय म्हणतील या टिपिकल मध्यमवर्गीय गंडाने तोंड लपवत फिरतात...

माध्यमबदल

बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा एकुणच पॉर्न पाहण्याच्या किंवा अनुभवण्याच्या माध्यमांमध्ये होणारे बदल पाहणे रोचक आहे . कारण यात एक देश म्हणुन आपण कसे बदलत गेलो आहोत याच प्रतिबिंब त्या प्रवासात पडल आहे . किंवा ज्याला म्हणुन भारताच्या सामाजिक बदलांचा अभ्यास करायचा आहे त्याने याचा पण अभ्यास करणे आवश्यक आहे . १९९० च्या सुमारास आपल्या दरवाजावर आर्थिक उदारीकरण उभं ठाकल . त्यावेळेस तारुण्यात पदार्पण करत असलेल्या पिढीला पडद्यावर दोन फुलांचं एकमेकांना मिळण किंवा भुंगा फुलावर बसण या मेनस्ट्रीम फिल्म्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या भंपक सांकेतिक दृश्यांना पाहणे यापलिकडे जास्त वाव नव्हता . मग मित्रांच्या टोळीमध्ये डेबोनायर चे जुने अंक बघणे किंवा बस स्थानकावर मिळणारे पिवळे साहित्य मिळवून ते वाचणे याला पर्याय नसायचा . जास्त हिम्मत असणाऱ्या आणि खिशात थोडे पैसे असणाऱ्यांसाठी थियेटरमध्ये मॉर्निंग शो ला असणारे इंग्रजी चित्रपट हे पण चोरून मारून बघणे हा एक पर्याय असायचा . २००० सालानंतर सर्वच बदलांचा वेग प्रचंड वाढला . तंत्रज्ञान पण बदलले . आता जमाना सीडी आणि फ्लॉपीचा होता . चोरून बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा पॉर्न सिनेमाच्या सीडी विकत घेणे आणि आपल्या कम्प्युटर वर बघणे ही गोष्ट त्या काळात सामान्य होती . अर्थशास्त्रात एक संरचनात्मक बेकारी नावाचा प्रकार आहे . तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला अर्थशास्त्रात संरचनात्मक बेकारी म्हणतात . तर तंत्रज्ञानात झालेल्या बदलाचा फटका या केसमध्ये बस स्थानकावर पिवळे साहित्य विकणारे विक्रेते आणि हिट आणि हॉट चित्रपटांच्या मॉर्निंग शो ला बसला . नंतर वाजपेयी सरकारच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट क्रांती होऊन या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या . अनेक देशी विदेशी पॉर्न साईट्स भारतात लोकांना उपलब्ध झाल्या . मात्र त्याचा फटका आता सीडी विक्रेत्यांना बसला . रस्त्यावर बसुन ढिगाने सीडी विकणारे विक्रेते गायब झाले . २०१० च्या सुमारास स्मार्ट फोन चा उदय झाला . वाय फायची सुविधा झाली . आता बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा पॉर्न एका क्लिक वर मिळायला लागलं . टोरेन्ट वरून या फिल्म्स डाऊनलोड करण्याचा पर्याय पण आता उपलब्ध झाला . २०१४ च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने काळाची चक्र माग फिरवली . 'Moral Nanny' बनण्याचा प्रयत्न करत या सरकारने तब्बल ८५७ पॉर्न साईट्सवर बंदी आणली आहे .या निर्णयाविरुद्ध अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या . पण आपण पॉर्न पाहतो ही गोष्ट पण चारचौघात कबुल करण्याची हिंमत नसणाऱ्या समाजात याला फारसा उघड विरोध होईल असे वाटत नाही . आता बस स्थानकावर पिवळ साहित्य विकणारे विक्रेते पुन्हा अवतरतील. बेकायदेशीर सीडीचा व्यवसाय जोरात चालु होईल . कारण पॉर्न पाहणे ही अशी वृत्ती आहे जिला मोदीच काय पण अस्तित्वात असेल तर परमेश्वर पण थांबवु शकत नाही . हेच आपल्या समाजाच वास्तव आहे .

अंधकारमय भविष्यकाळ

पण, काळ बदलत आहे. चित्रपटसृष्टीची गणितं पण बदलत चालली आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीपाठोपाठ आलेल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीने सर्व समीकरणं बदलून टाकली आहेत. त्याचा फटका ‘बी ग्रेड’ फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे. कोट्यवधी रुपयांचं बजेट असणारे मल्टिप्लेक्स आणि हे जीर्णशीर्ण सिंगल स्क्रीन थिएटर्स हा लढाच खूप विषम शक्तींमधला लढा आहे. खूपसा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातला लढा. डिजिटल क्रांतीच्या या काळात बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला निभाव लागणं अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या दशकापर्यंत ही इंडस्ट्री व्यावसायिकदृष्टया नामशेषही झाली असेल. १९९२ पासून सुुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे देशावर अनेक चांगले आणि काही वाईट परिणाम झाले. परिणामापैकी एक म्हणजे, तंत्रज्ञानात भोवंडून टाकणाऱ्या गतीने होणारे बदल. दूरसंचार क्षेत्रात तर अभूतपूर्व बदल झाले. विशेषतः २००० सालानंतर या क्षेत्रात अनेक बदल होऊन हे क्षेत्र पीपल फ्रेंडली बनले. बहुतेक लोकांच्या हाती मोबाइल खेळू लागले. त्यामध्ये इंटरनेटची सोय होती. याचाही जीवघेणा फटका बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला बसला. यापूर्वी असे चित्रपट किंवा त्यातले विशिष्ट ‘प्रसंग’ बघायला लोकांना थिएटरमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ पार्लरकडे जावं लागत असे. आता हे सगळं मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बी ग्रेड फिल्म बघण्याचा प्रेक्षकांचा ओघ आटू लागला आहे.

या सगळ्याला भारतीय लोकांच्या वर्णगंडाचा एक पैलू आहे. भारतीय पुरुषाच्या मनाला असणार गोऱ्या कातडीचं आकर्षण हे आपल्या वर्णवादी समाजाचं एक उघड गुपित आहे. भारतात आता वेगवेळ्या पोर्न साइट्स उपलब्ध आहेत. गोरी कातडी आणि गोऱ्या स्त्रिया यांचं आकर्षण असणारा भारतीय पुरुष आता भारतीय बी ग्रेड चित्रपटातल्या भारतीय अभिनेत्रींना पाहण्यास फारसा उत्सुक नाही. सनी लियोनसारखी पोर्न चित्रपटात काम केलेली अभिनेत्री भारतात येते, आणि लगेच बॉलीवूडमध्ये जम बसवते ही एका रात्रीत घडणारी घटना नाही. त्या अगोदर झालेल्या मोबाइल क्रांतीने तिला अगोदरच घराघरात पोहोचवले होते. उडत्या पक्षाची पिसं मोजणाऱ्या बॉलीवूड निर्मात्यांनी तिच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवून गल्ला भरण्यासाठी फक्त तिला जमीन मिळवून दिली. २००० सालानंतर झालेल्या दूरसंपर्क क्रांतीला लागलेलं सनी लियोन हे एक फळ आहे.
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर’ उर्फ बोलट ही व्यक्तिरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत... ‘जनू ‘बोलट’ होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते, तो नट आणि बाकीचे ‘बोलट’, अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता, कोण जाणे, परंतु जनू हा त्या कोटीचा बळी होता...’ हे बी ग्रेड चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम त्यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी नोंद घेतली गेली नाही. खुद्द बॉलीवूडने यांच्याकडे एखादी सावत्र आई आपल्या मुलाकडे करेल, तसे दुर्लक्ष केले. मागच्याच वर्षी अशीम अहलुवालिया या दिग्दर्शकाने भारतीय बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीचे पडद्यामागचे भेदक वास्तव दाखवणारा ‘मिस लवली’ नावाचा नितांतसुंदर चित्रपट तयार केला. सुजाण प्रेक्षकांनी तो नक्की पाहावा. पण हा अपवाद म्हणजे, नियम सिद्ध करणारा अपवाद. बी ग्रेड चित्रपट हे माझ्यासारख्या छोट्या शहरातून आलेल्या लाखो लोकांच्या अनुभवविश्वाचा अविभाज्य हिस्सा. हा विषय तसा ‘टॅबू’ म्हणून गणला गेला असल्याने चार लोकांत या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही, म्हणून या विषयाचं गांभीर्य कमी होत नाही की वास्तव लपत नाही.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिल्या मानाच्या प्रभावळीत या चित्रपटांना जागा नसेल; पण सर्वात शेवटच्या रांगेत तरी हजारी मनसबदार म्हणून एक मानाचे पान त्याच्यासाठी नक्कीच राखून ठेवलेलं असेल.