Sunday, 5 October 2014

माझ ब्राम्हण असण

सर्व  प्रथम  एक  गोष्ट  स्पष्ट  करतो .  ब्राम्हण  म्हणून  जन्माला  आल्याचा  मला  काही  अभिमान  वैगेरे  वाटत  नाही  आणि  लाज  तर  मुळीच  वाटत  नाही . पुढे  जे  लिखाणात  येणार  आहे  ते  संपूर्ण पणे  माझ्या  अनुभवांवर  आधारित  आहे  आणि  त्याला  माझ्या  वैयक्तिक  Sample  Survey  चा  आधार  आहे . म्हणजे  मी  केलेली  विधान  चूक  पण  असू  शकतात .  यात  कुठलेही  सरसकट  करण  नाहीये .  कुठल्या  एका  वाक्याने  किंवा शब्दांनी  तसा  गैरसमज  झाल्यास  ती  माझ्या  लिखाणाची  मर्यादा  :
 
    जेंव्हा  तुमच  बालपण  मुंबई - पुण्याबाहेर  आणि  सांस्कृतिक  - शैक्षणिक  राजधानी  वैगेरे  वैगेरे  च्या  बाहेर  जात  तेंव्हा  'जात ' आणि  इतर  रखरखीत  'वास्तव ' फार  लहान  वयात  कळायला  लागतात .  जात  वैगेरे  कस  कळायला  लागल ? तर  लहान असताना  आम्ही   भाड्याच्या  घरात  राहायचो . घरमालकीण  बाई  एकदम  धार्मिक  - सोवळ्यातल्या  वैगेरे  वैगेरे . मैदानापासून  माझ  घर  जवळ   असल्याने  खेळण  झाल्यावर  माझे  मित्र  पाणी  प्यायला  माझ्याकडे  यायचे .   आमच्या  घर मालकीण  बाई  त्यांच्यावर  फार  बारीक  नजर  ठेवून  असत . त्या  प्रत्येक मित्राला  direct  आडनाव  विचारीत  (नाव  नाही ) . मित्रांनी   आडनाव सांगितलं  कि  त्यांच्या   चेहऱ्यावर  काही  विशिष्ट  भाव  येत  किंवा  येत  नसत .  मग  मला  बाजूला  घेत  त्या  मला  सांगत ," अरे  कुणासोबत  हि  राहतोस  का  रे ? आपल्या  ब्राम्हण  पोराना  काय  धाड  भरली  आहे  का ?"  त्यांनी  बहुदा  माझ्या  आईकडे  पण  माझी  तक्रार  केली  होती  पण  आईने  त्यांच्याकडे  लक्ष  दिले  नाही आणि  नंतर  आम्ही  ते  घरच  बदलल .   नंतर  सर्व  ब्राम्हण  मुलांप्रमाणे  मी  पण  शाखेत  वैगेरे  जायचो . तिथे  शाखेवरचे  गुरुजी  गांधीजी  बद्दल  कधी  टिंगल  पूर्वक  तर  कधी  विखारी  पणे  बोलायचे .  तिथे  फारसे  ब्राह्मणेत्तर  मुल  नसायची .

नंतर   बर्यापैकी  हुशार  विद्यार्थी  असताना  पण  मी  अकरावीला  कला  शाखा  निवडली . एवढ्या  मोठ्या  वर्गात    दोघेच  ब्राम्हण . मी  आणि अजून  एक  मुलगी . एव्हाना  कुलकर्णी , देशपांडे , आणि  आडनावाच्या  शेवटी  'कर ' लागणाऱ्या  लोकांसोबतच  राहिलो  होतो . डाके , अंभोरे , नलदे  हि  आडनाव  पण  जगात  अस्तित्वात  आहेत  असा  शोध  मला  लागला . बहुजन  समाजाशी  कॉलेज  च्या  निम्मिताने  आलेला  हा पहिला  संपर्क . एकदा  इतिहासाच्या  देशमुख  सरांनी  पंढरपूर  आणि तिथले  बडवे  यांच्यावर   वर्गात  काही  जहाल  विनोदी  comments  केल्या  आणि  अख्खा  वर्ग  जोरजोरात  खिदळयला  लागला . माझ्या  मागच्या पोराने  'च्यायला  हि  बामन  अशीच ' अशी  हसता  हसता  दिलेली  प्रतिक्रिया  मला  पण  ऐकू  आली . आपली  जात बाकीच्या  समाजात  फार  काही  लोकप्रिय  नाही  अशी  खुण  गाठ  मी  मनाशी  बांधली .

बारावी  नंतर  पुण्यात  एका  धार्मिक (का  सांस्कृतिक ?)   संघटनेचा  प्रभाव  असणार्या  कॉलेज मध्ये  प्रवेश  घेतला . तिथल्या  वसतिगृहातच  राहत  होतो . तिथे  अनेक  बारापगड  जातीची  मुल  राहत . होस्टेल  च्या  शेवटच्या  वर्षाला  असणार्या  मुलांपैकी  एकाला  'Best  Hostelite ' चा  पुरस्कार  दिला  जाई . या  पुरस्कारासाठी   काही  कारणाने  ब्राम्हण मुल  च  (काही  मोजके  अपवाद  वगळता ) पात्र  ठरत . इतर  जातीची  मुल  त्यामुळे  वसतिगृह  व्यवस्थापनावर  खार  खाउन  असत .  एकदा  याच  मोठ्या  धार्मिक -सांस्कृतिक  संघटनेचा  एक  कार्यक्रम  कॉलेज  मध्ये  होता . त्या  कार्यक्रमात  एका  ख्रिश्चन  विद्यार्थ्याने  टिळा  लावून  घेण्यास  नकार  दिला  तेंव्हा  होस्टेल  मधल्या  चित्पावन  पोरांनी  त्याला  (त्याच्या  पाठीमागे ) खूप  शिव्या  दिल्या  होत्या . हि  चित्पावन  पोर  माझ्यासारख्या  घाटावरून  आलेल्या  ला  पण  खिजगणतीत
धरत  नसत . त्यामुळे  चित्पावन  लोक  म्हणजे  आपल्यापेक्षा  भारी  हा  तेंव्हा  पासून  आलेला  गंड  डोक्यातून अजून  पण  पूर्ण  पणे  गेलेला  नाही . एकदा  मी  आणि  माझा  बहुजन  समाजातला  मित्र  एका  पेठेत  रणरणत्या  उन्हात अशाच  एका  महान  धार्मिक  आणि  सांस्कृतिक  कार्यक्रमाच्या  पत्रिका  वाटत  असताना  आलेला  अनुभव  तर  उच्च  श्रेणीतला  होता . आम्ही  लेले , नेने , देशपांडे  यांचे  दरवाजे  पत्रिका  देण्यासाठी  वाजवायचो . मग  माझा  बहुजन  साथीदार  आपल  नाव  सांगून  आम्ही  कुठून  व  कशासाठी  आलो  आहोत  हे  सांगून  पत्रिका  द्यायचा . मे  च  उन  होत  पण  कोणी  आम्हाला उपचार  म्हणून  पाणी  पण  नाही  विचारलं . वैतागून  माझा  मित्र  मला  म्हणाला , 'आता  तू  दरवाजा  वाजव  आणि  माहिती  दे .'
पुढच्या  ठिकाणी  मी  हा  सोपस्कार  केला . दरवाजा  वाजवला  आणि  नाव  सांगितलं . आणि  अहो  आश्चर्यम . पुढच्या  अनेक  घरी  आम्हाला  पाणी  आणि  काही  ठिकाणी  तर  लिंबू  शरबत  पण  घेण्याचा  आग्रह  झाला ." नावात आणि  त्यातल्या  त्यात आडनावात  बराच  काही  असत  रे ." खिन्न  पणे  हसून  त्या  मित्राने  शालजोडीतला  दिला .  आडनावा  वरून  आपल्या  समाज  व्यवस्थेत  किती  मनांवर  चरे  उमटले  असतील  याची  अजून  गिणती  व्हायची  आहे .

एक  अनुभव  तर  खासच . एकदा  मी  ट्रेन  ने  औरंगाबाद  ला  जात  होतो .  तर  एका  आजोबाना  मी  त्यांची अडचण   ओळखून  सामान  वैगेरे  चढवायला  मदत  केली . बाजूला  जागा  पण  मिळवून  दिली . मग  आम्ही  बर्यापैकी  गप्पा  पण  मारल्या .त्यांनी  स्वतहा  बद्दल  सांगितलं .  त्यांनी  काय  करतोस  असे  विचारले . त्यावेळेस  मी  काहीच करत  नसल्याने  तोंडात  येईल  ते  उत्तर  देत  असे . मी  त्याना  काही  तरी  द्यायचे  म्हणून  उत्तर  दिल ,"मी  मिलिंद  कॉलेज  मध्ये  शिकतो ." आजोबांचा  नूर  एकदम  पालटला .  आजोबा  एकदम  बोलायचे  थांबलेच . ट्रेन  औरंगाबादला  पोहोंचल्यावर ''बराय  . बाझारात  भेट  होईल  च  कधीतरी ." म्हणून  आजोबांनी  कलटि  मारली .  दलित  असणे  म्हणजे  काय  असू  शकते   याची  बारीकशी  चुणूक  मला  त्या  दिवशी  मिळाली  .


 हा  घाबरून  राहणारा , समाजाच्या  इतर  घटकांपासून  गंड  ग्रस्त  असणारा ,  पटकन  सरसकट  करण  करणारा  ब्राम्हण  समाज  बघणे  वेदनादायक  आहे . त्याना  कायम  एक  शत्रू  लागतो . कधी  तो  बहुजन  समाज  असतो , कधी  मुस्लिम  तर  कधी  यु पी  चा  भैय्या .  इथे  ब्राम्हण  समाज  म्हणजे  आय  टी  मध्ये  नौकरी  करणारा  आणि  देशाबाहेर  राहणारा  समाज  असे  अजून  एक  generalization नाही  केले  तर  अजूनच  चांगल .  ब्राम्हण  असण्याचे  सर्व  फायदे  ओरपून  घेतल्यावर  आता  त्यातून  निर्माण  होणारया  ऐतिहासिक  ओझ्यांपासून  (जाती  व्यवस्था  निर्मिती , दलितांवर  अत्याचार )  आता  दूर  जाता  येईल  का ? कारण  अल्पसंख्य  समाजाला  (त्यांची  आक्रमण , सक्तीची  धर्मांतर ) हा  अधिकार  देशाच्या  अनेक  समस्याना  जबाबदार  धरताना  त्यांनी  कधीच  नाकारला आहे   .


मी  ब्राम्हण  आहे  म्हणजे  मला  वपु  काळे  आणि  देशपांडे  आवडलेच  पाहिजेत , कुठेतरी  कसलेतरी  मंदिर बांधण्याच्या   मोहिमेला  माझा  पाठींबा  असलाच  पाहिजे , एका  विशिष्ट  धार्मिक  (सांस्कृतिक ?) संघटने  बद्दल मला  प्रेम  वाटलेच  पाहिजे , एका  जहाल  वैगेरे  नेत्याला  मी  मुठी  वळवून  पाठींबा  दिलाच  पाहिजे  आणि  आरक्षण  व  अल्पसंख्यक  लोकांबद्दल  माझी  अति  जहाल  मत  असावीत  अशा  real  आणि  virtual  आयुष्यात असणाऱ्या  अपेक्षांचं  काय  करायचं  हा  खरा  प्रश्न  आहे . जाता  जाता - हा  भेद  आंतर  जालावर  पण  पाळला  जातो  का ?  इथले  कंपू  आणि  होणारे  कट्टे  यात  जमलेल्या  लोकांमध्ये  एका  विशिष्ट  जातीच्या  लोकांच  प्रमाण  जास्त  असत  का ?  हा  खवचट  पणा  नाही  तर  genuine प्रश्न  आहे .   कुठल्या  जाणकाराच  यावरच   Social  Analysis  वाचायला   मला  आवडेल .


1 comment: