Thursday, 8 January 2015

कार्टून्स आणि कॉमिक्स

…  १९९२ साल . बोलता  बोलता  शेजारचा  नित्या  मला  म्हणाला ," काय  येत  तुमच्या  सुपर  कमांडो  ध्रुव  ला . आमचा  नागराज  विषारी  फुंकर  मारून  दोन  मिनिट  मध्ये  आडवा  करेल  त्याला ." मला  पण  चेव  चढला . मी  पण  नागराज  कसा  घाणेरडा  आहे  हे  सांगून  तिथल्या  तिथे  परतफेड  केली . शब्दाने  शब्द  वाढत  गेला . बोलचाल  बंद  झाली . राज  कॉमिक्स  चे  नागराज , परमाणु , डोगा  हे  कॉमिक्स  नायक  जाम  प्रसिद्ध  होते . पोरांनी  आपले  आपले  हिरो  निवडले  होते . कंपू  तयार  झाले  होते . दुसऱ्या  नायकाचा  चाहता  हा  शत्रू  पक्षातला  होता . नंतर  मी  गावातून  बाहेर  पडलो . नित्याशि  संबंध  संपला .  कॉमिक्स  शी  असणारा  संबंध  पण  संपला . नंतर काही  वर्षांनी  सुट्टी  घेऊन  घरी  आलो  होतो . मी  घरी  पेपर  वाचत  बसलो  होतो . आई  भाजी  निवडत  बसली  होती . बोलता  बोलता  माझ्या  मित्रांचा  विषय  निघाला . आईने  नितीन  बद्दल  सांगितलं  ,"अरे  तो  नितीन  आहे  ना  कुलकर्णी  बाईचा . त्याला  काहीतरी  रोग  झाला  रे . पायातली  ताकत  च  गेली . व्हील  चेयर  वर  खुरडत  फिराव  लागत  बिचार्याला . किती  हुशार  मुलगा होता आणि  काय  झाल  बिचार्याच ."  मला  एकदम  कसतरीच  झाल . न  राहवून  कपडे  चढवले . बाजूच्या  कॉलनी  मधल्या  त्याच्या  घरी  घरी  त्याला  भेटायला  गेलो . त्याची  आई  बाहेर  देवासमोर  दिवा  लावून  बसली  होती .

 "काकू  नितीन  आहे ?"

"हो  आहे  कि . उदगीरकर  न  रे  तू ? बर्याच  वर्षांनी  आलास . नितीन  मधल्या  खोलीत  आहे . भेटून  घे . चांगल  वाटेल  त्याला . आताशा  फारस  कोणी  येत  नाही . "


मी  खोलीत  गेलो . नित्या  पलंगावर  आडवा  पडून  वाचत  होता . जवळ  गेल्यावर  कळल .  त्याच्या  हातात पण    सुपर  कमांडो  ध्रुव च  पुस्तक  होत . आजुबाजू  ला  पण  कॉमिक्स  पडली  होती . 
"आता  नीट  वाचल्यावर  आणि  या  वयात  कळतंय . सुपर  कमांडो  ध्रुव च  भारी  होता ." नित्या  हसत  हसत  बोलला . मला  काही  बोलवेच  ना . गळ्यात  काहीतरी  अडकल्यासारख  झाल  होत . 

………  मी  आणि  बाबा  दोघेही  Tom & Jerry  चे  चाहते . आम्ही  दोघेही  एकत्रच  ते  कार्टून  बघायचो . आणि  मग  सगळ  घर  हसण्या  ने  भरून  जायचं . बाबा  Tom  च्या  बाजूने  तर  मी jerry  च्या  बाजूचा .  नेहमी  शेवटी  jerry  च  जिंकायचा . मग  बाबा  माझ्या  पाठीवर  बुक्का  मारून  म्हणायचे , " अगली  बार ." पण  ती  अगली  बारी  कधीच  नाही  आली . एकदा  मी  उसासून  बाबाना  म्हणालो , " का  तुम्ही  नेहमी  हारणाऱ्या  Tom  ची  बाजू  घेता ?" एकदम  हसणार्या  बाबांच्या  चेहऱ्यावर  गांभीर्य  आल , "ते  तुला  अजून  काही  वर्षांनी  कळेल ." आता  मी  तिशीत आहे . अजून  पण  वेळ  मिळेल  तस  टोम &जेरी  बघतो . बाबा  त्यावेळेस  काय  म्हणाले  होते  ते  आता  कळत  आहे . हा  साला  जेरीच  खोड  काढतो  टोम  ची . आणि  आकाराने  मोठा  असून  पण  भाबडा  Tom  नेहमी  जेरी  कडून  मार  खातो . साला  जेरी  च  दुष्ट  आहे . गेल्या  काही  वर्षात  मार  खाणार्या सगळ्यांबद्दल  सहानुभूती  वाटत  आहे . स्वतःसकट . 

……  ज्यादिवशी  नांदेड  वरून  काका  आणि  आजोबा  येणार  असत  त्यादिवशी  मी  एकदम  खुश  असे . येताना  ते  माझ्यासाठी  खूप  कॉमिक्स  घेऊन  येत . एकदा  असेच  ते  आले  तेंव्हा  त्यांच्या  हातात  कॉमिक्स  नव्हते . माझा  चेहरा  उतरला . "अरे  पुढच्या  वर्षी  दहावी  न  तुझी . आता  तु  मोठा  झालास . आता  कसले  कॉमिक्स  वाचतोस . " मामा  ने  बहुतेक  माझ्या  मनातले  भाव  वाचले  असावेत . 
मी  मोठा  झाल्याच  माझ्या  अगोदर  इतराना  कळल  होत . मोठ  झाल्यावर  कॉमिक्स  वाचता  येत  नसतील तर  काय  करायचं  मोठ  होऊन . मी  कमवायला  लागल्यावर  घर भरून  कॉमिक्स  घेईल  असा  बेत  मी  आखला  होता .  मी  बघितलेलं  भविष्य  काळासाठीच  ते  पाहिलं  स्वप्न  होत . स्वतःच  अस  काहीतरी . त्यादिवशी  ते  तुटल . आणि  हि  तर  फ़क़्त  सुरुवातच  होती . 

……… नौकरी  ला  लागल्यावर  पहिले  भाड्याने  flat  घेतला . आता  कुणासोबत  आपली  स्पेस  शेयर  करायची  गरज  नव्हती . एक  टीवी  पण  घेतला . डिश  टीवी  वाल्याच्या  दुकानात  गेलो . तो  मला  वेगवेगळे  packages  समजावून  द्यायला  लागला . पण  कामाच  तो  काही  बोलेना . शेवटी  न  राहवून  मीच  बोललो , "मुझे  कार्टून  चानाल्स भी  चाहिये . मुझे  कार्टून  देखना  अच्छा  लगता  है ."  त्या  माणसाच्या  चेहऱ्यावर  आलेले  सहानुभूतीचे  भाव  अजून पण  डोळ्यासमोरून  जात  नाहीत .  

कार्टून्स  आणि  कॉमिक्स  ने  प्रचंड  आनंदाचे  क्षण  दिले  आहेत  त्या  सर्व  क्षणांसाठी हा  लेखन  प्रपंच . आणि  ह्या  गोष्टी  वाचणे  आणि  पाहणे  हा  'पोरवडा ' आहे  अश्या  समाजाबद्दल  प्रचंड  सहानुभूती . ते  काय  मिस  करत  आहेत  हे  त्यांचे  त्यांनाच  कळत  नाहीये . 

No comments:

Post a Comment