Saturday, 7 March 2015

बदमाशियां-कलरलेस,ओडरलेस आणि फ्लेवरलेस चित्रपट


एका नवोदित दिग्दर्शकाने 'द गॉडफादर' या गाजलेल्या कल्ट चित्रपटाचा दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाकडे  चांगला चित्रपट कसा बनवावा यावर सल्ला मागितला . "चांगला चित्रपट बनवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात ." कोप्पोला म्हणाला ,"एक म्हणजे चांगली बांधीव स्क्रिप्ट . दुसर म्हणजे असा निर्माता ज्याचा तुझ्यावर विश्वास आहे . आणि तिसर म्हणजे त्रास न देणारे अभिनेते ."आणि थोडा पॉज घेऊन कोप्पोला पुढे म्हणाला,"कुणाला सांगू नकोस पण मी जेंव्हा 'द गॉडफादर' बनवत होतो तेंव्हा यापैकी एकही गोष्ट माझ्याकडे नव्हती रे . " सतत बदल होणारी पटकथा ,निर्मात्यासोबत नेहमी होणारी वादावादी  आणि कलाकारांमध्ये होणारी धुसफूस यावर मात करून कोप्पोलाने एक अजरामर चित्रपट दिला . 'बदमाशियां' चा दिग्दर्शक अमित खन्ना तितका सुदैवी नाही . त्याने एक वाईट पटकथा ,इतक्या वाईट पटकथेत करोडो रुपये गुंतवणारे निर्माते ,आणि ठोकळेपणात स्पर्धा लावणारे अभिनेते घेऊन तितकाच वाईट चित्रपट बनवला आहे .

चित्रपटाची कथा 'देअर इज समथिंग अबाऊट मेरी ', 'रनअवे ब्राइड ' आणि इतर अनेक हॉलीवूड चित्रपटाकडून उधार उसनवार करून तयार केली आहे . एक श्रीमंत पोरांना गंडा घालणारी आणि कमिटमेंटफोबिक  मुलगी एका साध्याभोळ्या मुलाला (तो बहुतेक नायक असावा ) फसवून फरार होते . मग तो मुलगा आपल्या डिटेक्टिव मित्राला(त्यातल्या त्यात बरा अभिनय ) तिचा माग काढायला सांगतो . पण तो डिटेक्टिव मित्रच त्या मुलीच्या प्रेमात पडतो . मग अचानक या प्रेमत्रिकोणात एका डॉनची (भडक आणि पकाऊ ) एंट्री होते . त्यातून काय काय गडबड गोंधळ उडतो त्याची कथा म्हणजे 'बदमाशियां'.

चित्रपटात एकाच वेळेस पाच उपकथानक पुढ सरकत असतात . ह्यामुळे कथेत जी गुंतागुंत तयार होते ती इतकी नीरस आहे की प्रेक्षक आपला उरलासुरला रस हरवून बसतो . एकापाठोपाठ एक येणारी नीरस गाणी प्रेक्षकांसाठी अजूनच कंटाळा सोबत घेऊन येतात.संवादाच्या आघाडीवरपण आनंदीआनंद आहे . चित्रपटातले एक पात्र सतत 'मां की आईज 'असा तकिया कलाम सतत उच्चारत असतं .डॉनच्या तोंडी दिलेली हरियाणवी बोली अतिशय कृत्रिम वाटते. चित्रपटात एकही ओळखीचा चेहरा नाही . अपवाद फक्त मागच्या वर्षी आलेल्या आणि अनेक फिल्म फेस्टिवल गाजवणाऱ्या 'फिल्मीस्तान ' या चित्रपटामध्ये छाप पाडणाऱ्या शरिब हाश्मीचा. पण दुर्दैवाने या चांगल्या अभिनेत्याने पण डॉनच्या भूमिकेत पाटया टाकण्याच काम केल आहे . एका चांगल्या अभिनेत्याला एका चांगल्या दिग्दर्शकाची जोड  आवश्यक असते हा पुन्हा पुन्हा सिध्द झालेला नियम इथे पुन्हा एकदा सिद्ध होतो . 

सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे  जोरदार वारे चालू आहे. त्यामुळे मोठ्या स्टार्सचे आणि मोठ्या निर्मात्यांचे चित्रपट सध्या रिलीज होत नाहीयेत . या 'विंडो 'चा फायदा घेऊन अनेक छोट्या बजेट च्या चित्रपट निर्मात्यांनी 'चान्स पे डान्स 'करत या काळात आपले चित्रपट प्रदर्शित केले . मोठ्या चित्रपटांची स्पर्धा नसल्याने आपला चित्रपट चालून जाईल अशी या निर्मात्यांची अपेक्षा असावी . पण चित्रपट चालण्यासाठी यापेक्षाही जास्त अस काही असाव लागत हे त्यांना कधी कळेल ? शाळेत रसायनशास्त्राच्या सरांनी एका वायुच वर्णन कलरलेस,ओडरलेस आणि फ्लेवरलेस अस केल होत . बदमाशियां हा एक असाच कलरलेस,ओडरलेस आणि फ्लेवरलेस चित्रपट आहे. 

अपेक्षा पूर्ण करणारा किंग्जमॅन-द सीक्रेट सर्विस

कॉमिक बुक सिरीज वरून चित्रपट तयार करण्याच्या ट्रेंडने हॉलीवूडमध्ये चांगलेच बाळसे धरले आहे .स्पायडर मॅन,सुपर मॅन,एक्स मॅन सिरीज अशा कितीतरी चित्रपटांचे यश हे डोळ्यात भरणारे आहे .या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या किंग्जमॅन-द सीक्रेट सर्विस या कॉमिक बुक आधारित चित्रपटाचा दिग्दर्शक वॉन याचा तर असे चित्रपट दिग्दर्शित करण्यात हातखंडा आहे . त्याने दिग्दर्शित केलेल्या पाच चित्रपटांपैकी तीन चित्रपट हे ग्राफिक नॉवेल वर आधारित आहेत .जग धोक्यात आहे आणि स्पाय नायक आपला जीव धोक्यात घालून ते वाचवतो हे यापूर्वीच्या अनेक स्पाय चित्रपटात वापरलेलं मध्यवर्ती सूत्र किंग्जमॅन-द सीक्रेट सर्विस मध्ये पण वापरलं आहे . वेगाने धावणाऱ्या चकचकीत गाड्या ,सुंदर ललना ,विक्षिप्त आणि काहीतरी शारीरिक व्यंग्न असणारा खलनायक असा सगळा नेहमीचाच दारुगोळा चित्रपटात ठासून भरला आहे. तरीपण हा चित्रपट कंटाळवाणा होत नाही . याच मुख्य कारण म्हणजे हा चित्रपट काही बाबतीत आपल वेगळेपण दाखवतो . ह्या चित्रपटाचा नायक जो आहे तो  रस्त्यावर टवाळक्या करत फिरणारा दिशाहीन उनाड टीन एजर आहे . एक उनाड मुलगा ते एक खतरनाक स्पाय हा जो त्याचा कायापालट जो पडद्यावर दाखवला आहे तो प्रभावित करणारा आहे .दुसर म्हणजे या चित्रपटातला जो खलनायक आहे त्याच स्वतःच अस एक विशिष्ट तत्वज्ञान आहे . आपण जी काही वाईट काम करत आहोत ती पृथ्वीला वाचवण्यासाठी करत आहोत असा त्याचा दावा आहे . त्यासाठी तो जो युक्तिवाद करतो तो चक्क काही अंशी प्रेक्षकांना पण पटण्यासारखा आहे . 

ब्रिटनमध्ये एक बिन सरकारी ,उच्चस्तरीय गुप्तहेर संस्था किंग्जमॅन-द सीक्रेट सर्विस कार्यरत आहे . जगासमोर न येता कार्यरत राहून जगाला संकटाच्या खाईतून बाहेर काढण्याच काम ही संघटना करत असते.आता पण  व्हॅलेंटाइन (सैम्युअल जॅक्सन)  हा तोतर बोलणारा पण अब्जाधीश पर्यावरणप्रेमी उद्योगपती  आधुनिक तंत्रज्ञान वापरून जगाची जास्तीत जास्त लोकसंख्या संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्याकडून या प्रयत्नात एकदा किंग्जमॅनच्या माणसाची हत्या होते . किंग्जमॅनचा  कणा असणारा हार्ट (कॉलीन फर्थ) मग व्हॅलेंटाइनच्या  मागे लागतो. त्यासाठी तो रस्त्यावर उनाडक्या करत फिरणाऱ्या एग्जी ला  (एगर्टन )ला संघटनेत भरती करून घेतो . या निर्णयामागे हार्टच्या भूतकाळातली अशी एक घटना आहे ज्याबद्दल त्याला अपराधीपणाची भावना आहे .पण एग्जी ला या संघटनेत प्रवेश मिळण्यापूर्वी अनेक अग्निपरीक्षा द्याव्या लागणार आहेत . अनेक प्रतिस्पर्धी पण आहेत . एग्जी च्या प्रशिक्षणाचा काळ हा पडद्यावर अतिशय मनोरंजक पध्दतीने उतरला आहे . चित्रपटात थोडया अंतराने धक्का तंत्राचा यथोचित वापर केला आहे . प्रेक्षकाला विचार करायला वेळच मिळत नाही . एग्जी आणि हार्ट ह्यांची एकमेकातली भावनिक  गुंतवणूक पण तरलतेने मांडली आहे .  व्हॅलेंटाइन आपल्या दैनदिन आयुष्यात आपण जे तंत्रज्ञान वापरतो त्याचा वापर जग नष्ट करण्याचा बेत आखताना कसा करतो हे बघून प्रेक्षकाला धक्का बसतो . सगळी किंग्जमॅन संघटना व्हॅलेंटाइनला  कशी रोखते याभोवती  हा चित्रपट फिरतो . चित्रपटाचा शेवट काय असणार हे प्रेक्षकांना असे चित्रपट सुरु होण्याच्या अगोदर माहित असत . तरीपण हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतो हे या चित्रपटाच यश आहे. 

चित्रपटात अंगावर येणारा हिंसाचार आणि रक्तपात आहे . खलनायक व्हॅलेंटाइन एका चर्च मध्ये भीषण हत्याकांड घडवतो तो सीन एकाचवेळेस रोमांचकारी आणि काही प्रमाणात  किळस आणणारा आहे .मायकेल केन ,कॉलीन फर्थ असे दिग्गज मौजूद असताना त्याच दडपण न घेता एगर्टन ने मध्यमवर्ति अंडरडॉग स्पाय ची भूमिका छान पार पाडली आहे. टेलरच्या दुकानात असणार गुप्तहेर संघटनेच कार्यालय  ही गिमिक मस्त दाखवली आहे . बाकी जेम्स बॉन्ड या व्यक्तिरेखेचे संदर्भ चित्रपटात कधी गंभीरपणे तर कधी रेवडी उडवताना अप्रत्यक्षपणे अनेक वेळा वापरले आहेत . हे जेम्स बॉन्ड च्या निर्मात्यांचे यश म्हणावे का ?

भारतात कॉमिक्स संस्कृती अमेरिकेएवढी नसली तरी  शहरांमध्ये बऱ्यापैकी रुजली आहे .चाचा चौधरी,नागराज ,सुपर कमांडो ध्रुव अशी पात्र केवळ लहान मुलांमध्येच नाही तर तरुणाई मध्ये पण लोकप्रिय आहेत . कुठल्याच निर्मात्याला या भारतीय कॉमिक्सवर चित्रपट का काढावासा वाटू नये हा संशोधनाचा विषय आहे .मध्यंतरी अनुराग कश्यप डोगा या भारतीय कॉमिक्स पात्रावर चित्रपट काढणार अशी घोषणा झाली होती पण त्याचे पुढे काय झाले हे एक ते जेम्स बॉन्डच जाणो . 

शंभरातील सत्तरांची कहाणी

'दम लगा के हैशा' चित्रपट बनवताना आणि प्रदर्शित करताना यशराज फिल्म्सने यापूर्वी कधीही न केलेले काही प्रयोग केले आहेत. नेहमी यशराजचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जे प्रमोशनल ब्लीत्झक्रिग राबवल जात ते हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राबवल गेल नाही.चित्रपटाच प्रमोशन प्रदर्शनाच्या केवळ तीन आठवडे अगोदर सुरु झालं . दुसर म्हणजे आदित्य चोप्रांचं नाव प्रस्तुतकर्ता म्हणून असलं तरी निर्माता म्हणून यशराजचाच दुसरा दिग्दर्शक मनीष शर्माच नाव श्रेयनामावलीत आहे .यशराज आता आपले पंख विस्तारत आहे याचा हा संकेत .तिसर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे  नायक आणि नायिकेच्या व्यक्तिरेखेचेचे अनेक साचे जे यशराजच्याच यापूर्वीच्या सिनेमांमुळे तयार झाले आहेत ते या सिनेमात  दिग्दर्शक शरत कटारिया याने मोडले आहेत.म्हणजे इथला नायक चक दे च्या कबीर खान प्रमाणे किंवा धूम  सिरीज मधल्या हिरो प्रमाणे लार्जर दॅन लाईफ नाही ,तर  घडी घडी अश्रू गाळणारा , दहावी नापास आणि कधी  कधी तापट वडिलांच्या हाताने चपलेचा मार खाणारा आहे . इथली नायिका ही शिफोनची साडी घालून  स्वित्झर्लंडच्या बर्फात नाचणारी कुणी शेलाटी सुंदरी नाही तर चक्क ८५ किलो वजनाची आणि गोलगरगरीत   आहे .  

दम लगा के हैशाच कथानक नव्वदच्या दशकात घडतं .हे दशक सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी ओळखल जात.चित्रपटाच्या कथानकासाठी हा काळ दिग्दर्शकाने खुबीने निवडला आहे .जागतिकीकरण  दाराशी येउन ठेपल आहे . दूरदर्शन जाऊन नुकतच केबल टीवीच आगमन झाल आहे. टेपची जागा आता सीडी प्लेयर घ्यायला लागले आहेत .हे बदल नुसतेच समाजजीवनात होत नाहीयेत तर ते  प्रेम (आयुषमान खुराणा) आणि संध्या (भूमी  पेडणेकर ) यांच्या पण आयुष्यात घडत आहेत .नायकाला आपल्या  आयुष्यात  हा बदल  नकोय . त्याचे तापट वडील (संजय  मिश्रा ) मुलाच्या आवडीनिवडीपेक्षा परिवाराचे आर्थिक हितसंबंध लक्षात  घेऊन जोर जबरदस्ती करून जाडजूड नायिकेशी त्याच लग्न जुळवतात . वडिलांना विरोध करण्याची धमक  नसल्याने नायक  मनाविरुद्ध लग्न केल तरी बायकोपासून उखडून राहायला लागतो .बिचारी नायिका आपल्या  परीने नायकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते पण त्या मोबदल्यात तिला फ़क़्त अपमान आणि मानहानी मिळते .एका दिवशी या धुसफुसीचा स्फोट होतो आणि पाळी घटस्फोटापर्यंत येते . दरम्यानच्या  काळात म्युझिक सीडीचे आगमन झाल्यामुळे नायकाच्या परिवाराचा ध्वनिफितीचा पारंपारिक धंदा  बसण्याच्या मार्गावर आहे . नायकाचा प्रतिस्पर्धी कम मित्र कम शेजारी जो आपल्या सुंदर बायकोवरून  नायकाला सतत टोमणे मारत असतो तोच हा सीडीचा धंदा चालू करत आहे .एकदा अशीच बोलाचाली होते आणि तो मित्र नायकाला त्यांच्या शहरात होणारी  पारंपारिक दम लगा के हैशा शर्यत जिंकून दाखवण्याचे  आव्हान देतो . नायक शर्यत जिंकला तर आपला धंदा बंद करू  अस आमिष पण नायकाला आणि त्याच्या  परिवाराला दाखवतो  (इथे लगान मधला उद्दाम  ब्रिटीश अधिकारी भुवनला क्रिकेट सामन्याचे आवाहन देतो तो  प्रसंग प्रकर्षाने आठवतो ). दम लगा के हैशा म्हणजे आपल्या बायकोला पाठीवर घेऊन अडथळ्यांची शर्यत  धावण्याची स्पर्धा . आता नायकांच वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य पणाला लागल आहे आणि त्याच्या  बायकोची मदत घेतल्याशिवाय तो यातून बाहेर पडू शकणार नाही हे उघड आहे . दरम्यान कोर्ट असा निकाल  देत की सहा महिने या दोघांनी एकत्र रहाव मगच कोर्ट घटस्फोट मंजूर करण्याबद्दल निर्णय घेईल . जुलुमाचा  रामराम म्हणून दोघेही पुन्हा एकत्र राहायला लागतात . नायक दम लगा के हैशा शर्यत जिंकतो का ? नायक  आणि नायिका घटस्फोट घेतात की एकत्र येतात ? नेहमी शर्यत जिंकणच महत्वाच असत का कधी कधी  फ़क़्त भाग घेण महत्वाच असत ? या प्रश्नांची सुंदरपणे उलगडलेली उत्तर पडद्यावर पाहण्यात मजा येते . 

हा चित्रपट दोन प्रकारच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला आहे . पहिला म्हणजे अरेंज मॅरेज झालेला  वर्ग जो की उघडच आपल्या देशात बहुसंख्य आहे . आपल्याला मनाप्रमाणे जोडीदार मिळाला नाही अशी  ठुसठुस कुठेतरी त्यांच्या मनात असते .लग्नानंतर एक खोली शेयर करणाऱ्या 'त्या' अनोळखी माणसासोबत  जुळवून घेण्यात त्यांचा बराच वेळ खर्च झालेला असतो . त्याला या चित्रपटातल्या नायक आणि नायिकेत  आपल प्रतिबिंब दिसु शकत . दुसरा प्रकार म्हणजे नॉस्टाल्जियामध्ये रमायला आवडणारे लोकं  . ज्यांच्या  जन्माचा आणि जडणघडणीचा काळ नव्वदच्या दशकातला आहे त्यांच्यासाठी या चित्रपटात नॉस्टाल्जियाची  बहार आहे . कुमार शानूचा आवाज , झुकवल्याशिवाय चालू  न होणारी बजाज स्कूटर ,चुन्याचा गिलावा दिलेल्या आणि पोपडे उडालेल्या घराच्या भिंती, ती अतिप्राचीन फोनची डबडी आणि कितीतरी  .अतिशय  झपाट्याने भोवंडून टाकणारे बदल पाहिलेल्या आणि त्यामुळे पंचविशी आणि तिशीतच नॉस्टाल्जिया आलेल्या  पिढीला हा चित्रपट या संदर्भामुळे नक्की आवडेल. 

चित्रपटभर नर्म विनोदाची पखरण आहे . नायकाच्या वडिलांचे चुरचुरीत संवाद जाम मजा आणतात . मध्यंतरानंतर चित्रपट थोडा गंभीर वळण घेतो . पण तोपर्यंत प्रेक्षकाला मानसिकदृष्ट्या जोडून घेण्यात  चित्रपटाने यश मिळवले असते .  

आयुषमान खुराणाने  भारीभरक्कम भूमी पेडणेकरच ओझ चित्रपटात वाहून नेल आहेच पण आपल्या संयत  संवेदनशील अभिनयाने चित्रपटपण आपल्या खांद्यावर वाहून नेला आहे . नायिकेच्या रोलमध्ये असणाऱ्या  भूमी पेडणेकरचा हा पहिला चित्रपट आहे आणि तिला अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नाही हे पटतच नाही (यापूर्वी ती यशराजमध्येच विपणन शाखेत काम करायची). आपल्या  पराभूत पण मनाने नितळ नवऱ्याबद्दल  तिला जे प्रेम वाटत ते तिन अतिशय अप्रतिमपणे दाखवल आहे . 'आंखो देखी'  मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या  संजय मिश्राने इथे पण आपल्या भूमिकेच चिज केल आहे .सर्वच सहाय्यक कलाकारांनी आपली काम चोख  बजावली आहेत . अजून एक महत्वाच म्हणजे या चित्रपटातून  संगीतदिग्दर्शक अनु मलिक आणि गायक  कुमार सानूच पुनरागमन झाल आहे . सानू तर काहीकाळ पडद्यावर दर्शनपण देऊन जातो . मनु  आनंद  या  गुणवान छायाचित्रकाराने नव्वदच्या दशकातल उत्तर भारतीय शहर अप्रतिमपणे टिपलं आहे .चित्रपट  उत्तरार्धात थोडा संथ वाटतो .चित्रपटाची लांबी किंचित कमी असती तर चित्रपट अजून परिणामकारक झाला  असता.दिग्दर्शक शरत कटारिया हा पूर्वी सातत्याने वेगळे चित्रपट देणाऱ्या रजित कपूर (आंखो  देखी,मिथ्या)  चा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा.त्याची छाप त्याच्या कामावर दिसते . गेल्या काही वर्षात आलेला यशराजचा हा सर्वोत्तम चित्रपट आहे .दावत- ऐ -इश्क ,किल दिल ,बेवकुफिया या आपटलेल्या  चित्रपटानंतर यशराज 'दम लगा के हैशा' मुळे पुन्हा रुळावर येईल असे वाटते .आपल्या जोडीदाराबरोबर  (अरेंज मॅरेजवाले असाल तर दुधात साखर )जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की हा चित्रपट पहा .