Sunday, 12 July 2015

ही इज बॅक

संस्कृती , भाषा  यांचे  अडथळे पार  करून  जागतीक स्तरावर प्रसिद्ध  असण्याच भाग्य किती अभिनेत्यांना मिळत? चार्ली चॅप्लिन,  लिओनार्डो डी कॅप्रियो अशी काही नाव चटकन आठवतात .याच प्रभावळीत अजून एक नाव आहे ते म्हणजे  अरनॉल्ड श्वार्झनेगरच . लौकिकार्थाने अरनॉल्ड श्वार्झनेगर फारसा चांगला अभिनेता नाही . त्याच्या वाचिक  आणि कायिक अभिनयाला प्रचंड मर्यादा आहेत . त्याचा स्वतःचा असा जो  जागतिक  चाहता वर्ग आहे त्याला हे चांगलेच माहित आहे ; पण सगळ्यात महत्वाच म्हणजे स्वतः अरनॉल्ड श्वार्झनेगरला  पण आपल्या या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे . त्याच्या दीर्घ कारकिर्दीत त्याने अभिनयाला वाव असणाऱ्या भूमिका केल्याच नाहीत .  पण आपल्याशी 'लॉयल' असणाऱ्या प्रेक्षकांना जे हवे ते भरपुर दिले . तुफान हाणामाऱ्या असणारे आणि कथानक मागच्या सीटवर असणारे चित्रपट ही त्याची खासियत .  समीक्षकांनी लाथाडले तरी मायबाप  प्रेक्षकांनी अरनॉल्डला भरपुर प्रेम दिले .   तो प्रेक्षक जपानमधला असो  , अमेरिकेमधला असो वा परभणीसारख्या एखाद्या लहान भारतीय शहरामधला असो . इतक्या विविध प्रकारच्या सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रेक्षकापर्यंत पोहोंचण्याच भाग्य फार कमी अभिनेत्यांना मिळत . म्हणजे   अरनॉल्ड श्वार्झनेगर कधीच  गोल्डन ग्लोब किंवा ऑस्करच्या शर्यतीत नसेल किंवा समीक्षकांकडून त्याला कधी वाह वाह पण मिळत नसेल पण त्याचा प्रेक्षक वर्ग जगभर विखुरला आहे आणि गल्लाबारीवर त्याचे चित्रपट बऱ्यापैकी पैसे मिळवतात हे त्याच्या कडव्या टीकाकारांना पण मान्य कराव लागेल . अशा या अरनॉल्ड श्वार्झनेगरचा  नवीन चित्रपट 'टर्मिनेटर जेनेसिस' या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.

'टर्मिनेटर' चित्रपटमालिका म्हंटल की आज वयाच्या  तिशीत  असणारे बरेच लोक 'नोस्ताल्जीया' मध्ये हरवुन जातात .  जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'टर्मिनेटर - जजमेंट डे ' या साय-फाय पटाने लोकांवर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. त्या चित्रपटातली ती प्रसिद्ध 'सिग्नेचर ट्युन , 'अरनॉल्ड' च फडकत शरीरसौष्ठव , 'आय विल बी बॅक ' हा तुफान गाजलेला संवाद आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स यामुळे हा चित्रपट खूप गाजला . नंतर मात्र या चित्रपटमालिकेतले पुढचे दोन चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत . त्यामुळे आता या चित्रपटमालिकेचे दिवस भरले आहेत असे वाटत असतानाच या चित्रपटमालिकेतला पुढचा चित्रपट 'टर्मिनेटर जेनेसिस' दाखल झाला आहे . या चित्रपटाचे यश उतरणीला लागलेल्या या चित्रपटमालिकेला 'नवसंजीवनी ' देऊ शकत . आपल्यावर असलेल्या या प्रचंड जबाबदारीची जाणीव दिग्दर्शक अ‍ॅलन टेलर याला होती . त्याने एक चांगला आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चित्रपट बनवुन जबाबदारीला न्याय दिला आहे .

चित्रपटाची कहाणी २०२९ सालात सुरु होते . चित्रपटमालिकेत  यापुर्वी दाखवल्याप्रमाणे माणुस आणि स्कायनेट नावाच्या  'आर्टीफ़िशियल इन्टलीजंस' मध्ये चालु असलेल्या  रक्तरंजित युद्धाचा लंबक सध्या  जॉन कॉनरच्या  (जेसन क्लार्क) नेतृत्वाखाली लढणाऱ्या मानवी फौजेकडे झुकला आहे . 'स्कायनेट' चा पराभव आता काही काळाचाच प्रश्न आहे असे दिसत असतानाच स्कायनेट एक शेवटची कुटील चाल खेळते . पाशवी शक्ती असणारा एक रोबो  टाइम मशीनने १९८२ या सालात स्कायनेट पाठवते . सारा कॉनर (एमिलिया क्लार्क) या जॉन कॉनरच्या आईला  ठार मारण्याची जबाबदारी या रोबोला दिलेली असते . जॉन कॉनरच्या आईलाच त्याच्या जन्माअगोदर ठार मारलं तर त्याचा जन्मच होणार नाही आणि पर्यायाने आपले पुढचे सगळे पराभव टळतील असा   'स्कायनेट' चा हिशेब असतो . आपल्या आईचा या रोबोपासून बचाव करण्यासाठी जॉन कॉनर आपला जवळचा साथीदार काईली रीस (जे कोर्टनी) याला १९८२ या सालात पाठवतो . काईली रीस जेंव्हा त्या काळात पोहोंचतो तेंव्हा सारा कॉनरच  रक्षण   'गार्डियन   ' (अरनॉल्ड श्वार्झनेगर) नावाचा एक रोबो करत आहे हे  पाहून त्याला धक्का बसतो . थोड्या वादावादीनंतर  असे ठरते की आपणच स्कायनेट चा जन्मापुर्वीच विध्वंस करावा जेणेकरून मानवजातीचा भविष्यकाळातील संघर्ष टळेल . त्यासाठी  काईली रीस, सारा कॉनर  आणि गार्डियन पुन्हा टाइम मशीनने २०१७ सालात जातात . हि त्रयी आपल्या मिशन मध्ये यशस्वी होते का ? मानवजातीचा संहार टळतो का या प्रश्नाची उत्तर 'टर्मिनेटर जेनेसिस' हा चित्रपट पाहताना मिळतात .

मागच्या दोन भागांपेक्षा हा भाग खुपच रंगतदार आहे . घटना इतक्या वेगाने घडतात की पटकथा पडद्यावर रेंगाळत आहे असे एकदाही वाटत नाही . मात्र दोन गोष्टी अशा आहेत ज्या नवीन प्रेक्षकांना खटकू शकतात . सर्वप्रथम म्हणजे चित्रपटमालिकेतल्या या भागाची मजा लुटायची असेल तर तुम्ही पहिले दोन भाग पाहिले  असणे आवश्यक आहे . नाहीतर या चित्रपटातले अनेक संदर्भ डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे . दुसर म्हणजे कालप्रवासाचे अनेक किचकट संदर्भ इथे आहेत . चित्रपटातली पात्र कालप्रवास करून वेगवेगळ्या कालखंडात जातात . त्यामुळे त्यांचे वयाचे संदर्भ बदलत जातात . उदाहरणार्थ एका प्रसंगात  जॉन कॉनर आणि त्याची आई सारा कॉनर एकमेकासमोर येतात तेंव्हा जॉन कॉनर वयाने आपल्या आईपेक्षा खुप मोठा दिसत असतो . हे असे का होते हे जाणून घेण्यासाठी इथे घडणाऱ्या विविध 'टाईमलाइन' लक्षात ठेवाव्या लागतात आणि  यात सर्वसामान्य प्रेक्षक गोंधळुन जाण्याची शक्यता वाढते . मात्र एकदा हे दोन अडथळे पार केले तर हा चित्रपट खुपच मनोरंजक आहे . चित्रपटाच्या सुरुवातीला स्कायनेट पृथ्वीवर अणुहल्ला करून लाखो मनुष्यांना ठार मारते हा प्रसंग अंगावर येणारा वाटतो . थ्री डी तंत्रज्ञानात हा चित्रपट अजुनच मनोरंजक वाटतो .

भावना म्हणजे काय हे माहित नसणाऱ्या निर्विकार 'रोबोट ' च्या भुमिकेत शिरण्यासाठी अर्थातच   अरनॉल्डला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही . आपल्या एकोळी 'पंचेस ' व्यवस्थित मारत त्याने भुमिका छान बजावली आहे . चित्रपटात  सर्वोत्कृष्ट भुमिका बजावली आहे ती एमिलिया क्लार्कने . भुमिकेच्या विविध भावछटा आणि जबरी  अॅक्शन सीन्स तिने सारख्याच तडफेने केले आहेत . काईली रीसच्या भुमिकेत जे कोर्टनीने  तोलामोलाची साथ दिली आहे . चित्रपटाचे खरे नायक म्हणजे पडद्यामागचे थ्री डी तंत्रज्ञ आणि ग्राफिक्स बनवणारे लोक आहेत . चित्रपट कुठेही न रेंगाळता सतत प्रवाही वाटतो यासाठी संकलक रॉजर बार्टोनला पैकीच्या पैकी गुण .

“No good movie is too long and no bad movie is short enough.” ख्यातनाम समीक्षक रॉजर एबर्ट याने चांगल्या आणि वाईट चित्रपटातली सीमारेषा या वाक्यात स्पष्ट केली आहे . 'टर्मिनेटर जेनेसिस' नक्कीच या वाक्याच्या सुरुवातीला आलेला चांगल्या चित्रपटाचा निकष पुर्ण करतो असे म्हणावे लागेल .

http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=737&boxid=7747250&ed_date=2015-07-05&ed_code=820009&ed_page=6No comments:

Post a Comment