Saturday, 11 July 2015

परिचित वळणांची परीकथा

आपल्या सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर परीकथा आवडत असतात. ती पूर्ण पांढऱ्या आणि काळ्या
रंगातली पात्र , नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय होतो असे अधोरेखित करणारा भाबडा शेवट आणि  कथेमध्ये सगळीकडे डोकावणारा एक निष्पापपणा . अर्थातच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा भाबडेपणा आपण कुठेतरी हरवून  बसतो.असे असले तरी आजी आजोबांनी सांगितलेल्या या परीकथा शेवटपर्यंत आपल्याला सोबत करतात .परीकथांमध्ये पण काही कथा अजून खास . सिंड्रेलाची कथा  ही अशीच मनाच्या कप्प्यातली खास कथा . विदेशात कुठेतरी घडलेली ही कथा शेकडो मिल दूर राहणाऱ्या अनेक भारतीयांच्या भावविश्वाचा अविभाज्य हिस्सा आहे  यातच  सगळ आल . कारण सिंड्रेलाच्या कथेला एक वैश्विक अपिल आहे . ते अपिल सगळी सीमारेषांची आणि भाषांची बंधन  तोडत .

जेंव्हा  'डिस्नी ' सारख निर्मितीगृह  सिंड्रेलासारखी अजरामर परीकथा प्रेक्षकांसाठी  घेऊन येत तेंव्हा  अपेक्षा नक्कीच आकाशाला भिडलेल्या असतात . सिंड्रेला ची कथा आतापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी पडद्यावर आणली आहे . रोमिओ  ज्युलिएट  ही  शेक्सपिअर ची अजरामर कलाकृती काय किंवा सिंड्रेला काय अनेक भाषांमध्ये किंवा देशांमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या धडपड्या दिग्दर्शकांना  ह्या कथांवर चित्रपट बनवण्याचा मोह आवरलेला नाही . आता पडद्यावर आलेला सिंड्रेला हा चित्रपट याच पठडीतला . 

जस अनेक वाचकांना माहित आहे की सिंड्रेला ही एका अनाथ  निष्पाप सुंदर मुलीची कथा  आहे . चित्रपटात सिंड्रेला (लिली जेम्स ) ही आपल्या प्रिय वडिलांच्या मृत्युनंतर आपली  दुष्ट सावत्र  आई (केट ब्लोन्चेत ) आणि तिचा द्वेष करणाऱ्या दोन सावत्र बहिणींसोबत राहत असते . तिला  तिच्या सख्ख्या आईने मृत्युपूर्वी नेहमी  चमत्कारांवर विश्वास  ठेव असा उपदेश केलेला असतो . सावत्र आईचा जाच सहन करून पण सिंड्रेला तिचा हा उपदेश लक्षात ठेवून हसतमुखपणे राहत असते . एका  दिवशी योगायोगानेच  तिची भेट राजकुमार कीटसोबत (रिचर्ड  मडन ) होते . तिच्या दयाळू स्वभावामुळे राजकुमार प्रथमदर्शनीच तिच्याकडे आकर्षित होतो . पण आपली राजकुमार ही ओळख तो सिंड्रेलापासून लपवून ठेवतो . राजकुमाराचे वडिल मृत्युशय्येवर असतात आणि डोळे मिटण्यापूर्वी राजकुमाराचे दोनाचे चार झाल्याचे त्यांना बघायचे आहेत . मग राजकुमाराच्या स्वयंवराचा घाट घातला जातो . सिंड्रेलाला पण स्वयंवराला जायची इच्छा असते . पण  तिची सावत्र आई  घरकामाचा बहाणा करून तिला घरीच थांबवते आणि स्वतः आपल्या मुलीना घेऊन स्वयंवराला जाते . दुखी सिंड्रेला आसव गाळत असताना एका दयाळू परीचा कथेत प्रवेश होतो . ती  सिंड्रेलाचा एका राजकुमारीप्रमाणे कायापालट करते आणि तिला स्वयंवराला पाठवते . पण एका ठराविक वेळेत वापस यायच अशी परीची पूर्व अट असते . अन्यथा तिचे रुपांतर पुन्हा पूर्वीच्या कळकट सिंड्रेलामध्ये होणार असते . कायापालट झालेली सुंदर सिंड्रेला स्वयंवराच्या ठिकाणी राजकुमारासकट सगळ्यांचे लक्ष वेधून घेते . राजकुमारासोबत नृत्य करत असताना तिला एकदम परीने दिलेली वेळ टळून जात असल्याच लक्षात येत .   नृत्य मध्येच सोडून ती घाई गडबडीने तिथून निघून जाते . मागे फ़क़्त एक काचेचा बूट ठेवून . त्या बुटाचा मागोवा घेत राजकुमार सिंड्रेलाचा पाठलाग करायला लागतो . मग कथा परिचित वळण घेत पुढे जात राहते . आणि अर्थातच शेवटी कुठल्याही परीकथेचा अविभाज्य हिस्सा असणारा सुखांत शेवट  . 

पहिले सांगितल्याप्रमाणे कथा हि बहुतेक प्रेक्षकांना माहित आहेच . आणि या चित्रपटाची अनेक  वर्जन्स येउन गेल्यामुळे कथेत काही नाविन्य नाही . पुढे काय होणार हे जाणकार प्रेक्षकाला अगोदरच माहित असते . त्यामुळे पडद्यावर ही कथा बांधून ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने काही वेगळे करणे अपेक्षित होते . पण  दिग्दर्शक केनेथ  ब्राघन  हे शिवधनुष्य उचलण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे . तीच कथा तीच अपेक्षित वळण घेत पुढे जात  राहते आणि प्रेक्षक बोर होत राहतो . सर्व अभिनेत्यांनी आपल्या भूमिका चोखं पार पाडल्या असल्या तरी कथेत काही नाविन्यपूर्ण प्रयोग नसल्याने त्यांचे प्रयत्न वाया जातात . सिंड्रेला ही परीकथा फक्त मुलांसाठी आहे असा एक प्रचलित समज आहे . पण फार कमी लोकांना माहित असेल की मानसशास्त्राचा जनक आणि मनाशी निगडीत अनेक सिद्धांत मांडून जगाला हादरे देणाऱ्या सिग्मंड फ्राईडने आपल्या अनेक अभ्यासाचे संदर्भ सिंड्रेला आणि इतर परीकथांमधून घेतले आहेत .फ्राईडच्या  मते सिंड्रेलाचा अभ्यास करताना  तिच्यापेक्षा  कमी सुंदर असणाऱ्या आणि त्यामुळे एक गंड असलेल्या बहिणींची पण एक जी बाजू आहे तिचा अभ्यास करणे आवश्यक आहे . फ्राईडचा  पूर्ण काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगात रंगवलेल्या पात्रांना पण विरोध होता . दिग्दर्शक ब्राघनने सिग्मंड फ्राईडचे हे मत वाचले असते तर कदाचित हा सिंड्रेला चित्रपट पण अजून चांगला बनला असता .

http://216.15.199.42/mimarathi/story.aspx?id=359&boxid=134256843&ed_date=2015-3-22&ed_code=820009&ed_page=10No comments:

Post a Comment