Sunday, 12 July 2015

रोलर कोस्टर राईडविजय तेंडुलकर यांना मानवी मनोव्यापाराबद्दल जबरदस्त कुतुहल होत . त्यांच्या मते मानव हा सगळ्यात हिंस्त्र प्राणी असून; हिंसा करण हि त्याची मुलभूत प्रवृत्ती आहे . आणि हिंसा हि कधीच फक्त शारीरिक असू शकत नाही . किंबहुना ती मानसिकपण असू शकते . त्यांचा 'अर्धसत्य ' सारखा चित्रपट असो वा 'गिधाड ' सारख माईलस्टोन नाटक असो त्यात त्यांच्या या आवडत्या थियरीला त्यांनी पुरेपूर अभिव्यक्ती दिली आहे . तेंडुलकर किती काळाच्या पुढे होते हे जाणण्यासाठी रोजच वर्तमानपत्र वाचल तरी ते पुरेस ठरेल . शेकडो मैल दुर असणाऱ्या हॉलिवुडमध्ये जॉर्ज मिलर नावाचा एक महान दिग्दर्शक तेंडुलकरांची हिच थियरी आपल्या चित्रपटातुन सतत मांडतो तेंव्हा मानवी विचार हे देशांच्या सीमा वैगेरे बंधन जुमानत नाहीत हेच सत्य पुन्हा एकदा अधोरेखीत होत .
दिग्दर्शक जॉर्ज मिलरच्या एका एकांड्या शिलेदारा भोवती फिरणाऱ्या ‘मॅड मॅक्स' चित्रपट मालिकेला एक 'कल्ट ' चा दर्जा मिळाला होता . मेल गिब्सन सारख्या दिग्गज अभिनेत्याने या व्यक्तिरेखेवर एक अमीट ठसा उमटवला होता . या चित्रपट मालिकेतला शेवटचा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला होता . बहुतेक चित्रपट रसिकांना हाच या गाजलेल्या चित्रपट मालिकेचा शेवट आहे असे वाटले होते . मात्र तब्बल ३० वर्षानंतर दिग्दर्शक जॉर्ज मिलरने या चित्रपटमालिकेचे पुनुरुज्जीवन केल आहे . या आठवड्यात प्रदर्शित झालेला या चित्रपट मालिकेतला ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ हा चित्रपट बिल्कुल निराश करत नाही . याउलट धमाल मनोरंजन करतो . यावेळेस टॉम हार्डीने मेल गिब्सनची जागा घेतली आहे आणि त्याला साथ आहे ती 'फ्युरोशिया' च्या भूमिकेत चार्लीज थेरॉनसारख्या तोलामोलाच्या अभिनेत्रीची .
चित्रपटाची कथा भविष्यकाळात घडते . पहिले पेट्रोलवरून आणि नंतर पाण्यावरून झालेल्या युद्धानी पृथ्वीच रुपांतर अशा मरुभूमीत झाल आहे की जिथे पाणी हि सगळ्यात बहुमुल्य संपत्ती आहे . घोटभर पाण्यासाठी लोक एकमेकांच्या नरडीचा पण घोट घ्यायला तयार आहेत . अशा या निष्ठुर मरुभूमीत 'जो ' (ह्युग कीज ) नावाचा क्रुर सरदार पाण्याच्या स्त्रोतांचा कब्जा करून बसला आहे . त्यामुळे त्याला देवाचा दर्जा प्राप्त झाला आहे . त्याच्या कडव्या अनुयायांची अशी श्रद्धा आहे की 'जो ' अजरामर आहे . या निष्ठेने आंधळ्या झालेल्या आणि आपल्या नेत्यासाठी प्राण द्यायला पण तयार असलेल्या अनुयायांनी मॅक्सला (टॉम हार्डी) कैद करून ठेवले आहे . 'फ्युरोशिया' (चार्लीज थेरॉन) हि 'जो 'चा उजवा हात असते . मात्र तिची सद्सदविवेकबुद्धी जागृत असते . वयोवृध्द पण क्रुर 'जो' त्याच्या तरुण बायकांचे जे हाल करत असतो ते तिला बघवत नाहीत . ती या बायकांची सुटका करण्याचा धाडसी बेत आखते . पण हा बेत प्रत्यक्षात उतरवताना 'जो ' ला याची खबरबात लागते . आणि सुरु होतो एक जीवघेणा पाठलाग . काही घटना अशा घडतात की मॅक्स पण या सगळ्या घटनाचक्रात इच्छा नसून पण ओढला जातो . आपल्या बायकोला आणि मुलीला आपण मृत्युपासून वाचवू न शकल्याच शल्य उरी बाळगून असलेला मॅक्स 'फ्युरोशिया' ची साथ देण्याचा निर्णय घेतो आणि सुरु होतो एक महासंग्राम . तुल्यबळ नसणाऱ्या दोन पक्षांमधला संघर्ष . 'आहे रे ' आणि 'नाही रे ' वर्गातला संघर्ष .
चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच पाठलागाला प्रारंभ होतो . हा पाठलाग सतत दोन तास चालू असतो . पण प्रेक्षकाला विचार करायला पण उसंत मिळत नाही इतका वेगवान घटनाक्रम चित्रपटाचा आहे . चित्रपटातल्या एका प्रसंगाचा खास उल्लेख करावा लागेल . धुळीच्या वादळात जो आणि त्याच्या अनुयायांनी केलेला मॅक्स आणि फ्युरोशिया चा पाठलाग हा चित्रपटाचा अत्युच्च बिंदु म्हणता येईल .
पण ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ हा फक्त गाड्यांचे 'चेस सीन्स ' किंवा नेत्रदीपक 'विजुअल इफेक्ट्स' दाखवणारा अजून एक चित्रपट नाही . या चित्रपटात काही वैचारिक संदर्भ आहेत .हे संदर्भ या चित्रपटाला 'अवेंजर्स' सारख्या चित्रपटांच्या पुढे नेतात . पूर्ण चित्रपटाला 'स्त्रीवादाच ' एक भरजरी अस्तर आहे . स्त्रियांचं व्यवस्थेकडून होणार सततच शोषण आणि स्त्रियांनी त्याविरुध्द केलेलं बंड ह्या चित्रपटाच्या मध्यवर्ती आहे . 'फ्युरोशिया' हे लढाऊ स्त्रीच पात्र मॅक्सएवढच महत्वाच आहे . किंबहुना हा चित्रपट जितका मॅक्सचा आहे तितकाच फ्युरोशियाचा पण आहे . नेत्याच्या सगळ्या दोषांकडे डोळेझाक करून त्याच्यासाठी सर्वस्व देण्यासाठी आसुसलेल्या अनुयायांच प्रभावी चित्रण चित्रपटात दाखवल आहे . हे चित्रण इतक चांगल आहे की प्रेक्षकांना त्यांचा राग येण्याऐवजी त्यांच्याबद्दल अनुकंपा जाणवायला लागते . या सगळ्यांचा परिपाक म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या 'ऑस्कर पुरस्कारांसाठी ' या चित्रपटाची दावेदारी आतापासूनच मान्य करण्यात आली आहे .
टॉम हार्डीने साकारलेल्या मॅक्सला अक्षरशः मोजके संवाद आहेत . तरी त्याने हा रोल अतिशय प्रभावीपणे साकारलेला आहे . मेल गिब्सनची जागा त्याने समर्थपणे भरून काढली आहे . पण चित्रपट मॅक्सचा असला तरी सर्वात लक्षणीय पात्र आहे ते चार्लीज थेरॉनने साकारलेल्या फ्युरोशियाच . एक हात तुटलेल्या पण लढाऊ खंबीर स्त्रीच पात्र तिने अप्रतिमपणे साकारलेल आहे . कधी कधी चित्रपटातल मध्यवर्ती पात्र तीच आहे की काय अशी पण शंका मनाला चाटून जाते . ह्युग कीज, निकोलस हॉल्ट, ऍबे ली या साहाय्यक अभिनेत्यांनी पण आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत . सिनेमेटोग्राफ़र जॉन सिले हा या चित्रपटाचा पडद्यामागचा नायक . रखरखीत मरुभुमिच्या अनेक छटा त्याने पडद्यावर अतिशय नजाकतीने जिवंत केल्या आहेत . आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ पाच चित्रपट करणाऱ्या जॉर्ज मिलरला तब्बल तीस वर्षानंतर या चित्रपट मालिकेचे यशस्वी पुनुरुज्जीवन केल्याबद्दल पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील .
आता या चित्रपटाच आपल्या संदर्भातल महत्व . भारतीय चित्रपटसृष्टी ही 'हॉलिवुडप्रुफ' आहे असा एक समज प्रचलित होता . पण तिकीट खिडकीवर भरभरून गल्ला जमवताना आपल्या सोबत प्रदर्शित झालेल्या बॉलीवुड चित्रपटाना किरकोळीत काढणाऱ्या ''अवेंजर्स' आणि 'फास्ट अॅंड फ्युरियस 7' या चित्रपटानी या समजुतीला जोरदार तडा दिला आहे . आता भारतात प्रदर्शित होणारा हा अजून एक मोठा चित्रपट . सोबतच प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे वेल्वेट ' पेक्षा जास्त गल्ला या चित्रपटाने जमवला तर त्याचे होणारे भलेबुरे परिणाम हे दुरगामी असतील हे निश्चित .

No comments:

Post a Comment