Wednesday, 29 July 2015

' ट्रो' चा एक दिवस


धबधब्यासारख्या गर्दीशी झगडा करत 'ट्रो ' बसमध्ये चढला . जागा मिळाली नाही म्हणुन 'सिनियर सिटीझन ' साठी राखीव जागेवर बेधडक बसला . बाजुला उभ्या असणाऱ्या आजीकडे त्याने सोयीस्कर दुर्लक्ष केले . सकाळपासुन 'ट्रो ' ला मोबाईल चेक करायला वेळच मिळाला नव्हता . 'ट्रो ' ला सतत सोशल नेट्वर्किंग साईट वर पडीक राहण्याचा चस्का लागला होता . कारण सरळ होत . एरवी अतिशय सामान्य आयुष्य जगणाऱ्या 'ट्रो ' ला या वर्च्युअल आयुष्यात स्वतःचा असा आवाज मिळाला होता . बाजुच्या आडदांड गुजरात्याला आवडत नाही म्हणून स्वतःच्याच घरात चोरून मच्छी खाणाऱ्या 'ट्रो ' ला या सोशल नेट्वर्किंग साईटवर  देशाच्या पंतप्रधानापासून ते चवळीचे आरोग्याला होणारे फायदे या रेंज मध्ये कशावरही मुक्तपणे मत मांडता येत होते . 'ट्रो ' राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय जागरूक होता . म्हणजे तो तस समजायचा . त्याची एका पक्षावर आणि एका नेत्यावर अव्यभिचारी निष्ठा होती . हा नेताच देशाला महासत्ता बनवणार आहे आणि आपल्या पक्षात एकही भ्रष्टाचारी माणुस नाही अशी त्याने आपल्या मनाची समजूत घालुन घेतली होती . मग कोणी त्या पक्षाविरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध काही बोलल की 'ट्रो ' त्याच्यावर ऑनलाईन हल्लाबोल करायचा . यथेच्छ  शिवीगाळ आणि वैयक्तिक विधान करायचा . विशेषतः अस करणार स्त्री असली की 'ट्रो ' ला अजुनच चेव चढायचा . ऑफिसमधल्या  वरिष्ठ मेनन बाईंचा राग तो त्या बाईवर काढायचा . त्या बाईच्या चरित्रावर आणि व्यवसायावर मनमुराद राळ उडवून झाली की 'ट्रो ' चा आत्मा शांत व्हायचा . वेळ मिळेल तस 'ट्रो ' दुसऱ्या धर्मावर , दुसऱ्या जातीवर , दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांवर पण ऑनलाईन हल्लाबोल करायचा. 'ट्रो 'ने ही अशी ऑनलाईन 'कम्पार्टमेंटस' तयार केली होती आणि त्यात तो सुखाने राहत होता . काही लोक आपल्याला इन्टरनेट ट्रोल म्हणतात हे त्याला कळले होते . पण बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ म्हणुन 'ट्रो ' खुश होता . आतापण  सोशल नेट्वर्किंग साईटवर एका आतंकवाद्याला फाशी देऊ नये म्हणुन काही लोकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याच त्याला कळल आणि त्याच्या गोट्या मस्तकात गेल्या . या आतंकवाद्याला भरचौकात फाशी द्यायला हवी आणि त्याला सहानुभुती दाखवणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवुन द्यावे अशी आग्रही मागणी त्याने एका कॉमेंटमध्ये केली. मग त्याला थोडं बर वाटलं . बसमधून उतरून ऑफिसमध्ये धडपडत 'ट्रो ' शिरला . मेल उघडण्याअगोदर  आपल्या पीसीवर  त्याने बातम्या सांगणाऱ्या वेबसाईट उघडल्या . हे काय ? या सुंदर अभिनेत्रीने आपल्या दिवंगत नेत्याच नाव चुकीच लिहिल्याची बातमी वाचून त्याच रक्त खवळलं  . 'माजले आहेत साले हे बॉलीवुडवाले . रोज नवीन लोकांसोबत झोपतात . करोडो रुपये विनाश्रम कमवतात . फटके द्यायला पाहिजेत साल्यांना .' ट्रो ' च मध्यमवर्गीय मन कुरकुरत . वास्तविक पाहता आज सकाळीच पोराने विचारलेल्या 'गांधीजीच पुर्ण नाव काय ' प्रश्नाच उत्तर देताना त्याने 'मोहनलाल करमचंद गांधी अस उत्तर दिले होते . पण 'ट्रो 'च्या वर्चुअल जगात सेलिब्रिटी आणि विशेषतः स्त्री सेलिब्रिटीना माफी नव्हती . जितका मोठी सेलिब्रिटी तितकी त्याच्यावर अभद्र विधान करण्यात मजा अस त्याच साध सरळ समीकरण होत . दुपारी मिटिंगमध्ये मेनन बाई 'ट्रो ' वर चढ चढ चढल्या . सगळ्यांसमोर युजलेस फेलो म्हणाल्या . 'ट्रो ' ने निमुटपणे खाली मान घालुन सगळ ऐकल . सुन्नपणे आपल्या पीसीवर  आला . तीच फाशीची शिक्षा चर्चा एका पोस्टवर चालु होती . 'ट्रो ' ने पुन्हा गरळ ओकली . अतिरेक्याला सहानुभूती  दाखवणाऱ्या सगळ्यांना 'दडपून युजलेस फेलो म्हणाला . विरोधी मत असणाऱ्यांना पटापट 'ब्लॉक ' केले .
"मत पटले नाही की आपण सरळ ब्लॉक मारतो . माध्यमांच लोकशाहीकरण झालंय म्हणाव बच्चमजी. काही माध्यमवेश्यांची मक्तेदारी नाही आता इथे ." मनातल्या मनात 'ट्रो ' म्हणाला . कामाचा रगाडा संपवून ट्रो ' थकून भागून घरी येतो . दात अमळ पुढे असणारी पण त्याच्यावर जीव लावणारी बायको दरवाजा उघडते . गरम चहाचा कप हातात देते . तोवर 'ट्रो ' मोबाईल उघडून बातम्या वाचण्यात गर्क असतो . राष्ट्रपतींनी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज फेटाळला हे वाचल्यावर 'ट्रो ' ला भेंडीच्या भाजीचे दोन घास जास्त जातात . ट्रो बेडवर पडला असतो . दिवगंत राष्ट्रपतींचे चुकीचे नाव टाकणाऱ्या अभिनेत्रीचा गोंडस चेहरा काही त्याच्या डोळ्यासमोरून जात नसतो . त्याची बायको येते . 'ट्रो ' कडे पाहून निर्व्याजपणे हसते . दिवसभर शिव्या देऊन आणि शिव्या खाऊन थकलेल्या 'ट्रो ' ला  ते हसू पाहून मनापासून बर वाटत . बायकोच्या चेहऱ्यात 'ट्रो ' ला त्या मुर्ख अभिनेत्रीचा चेहरा दिसायला लागतो . समाधानी चेहऱ्याने 'ट्रो ' दिवा मालवतो .

सगळ्या पक्षाच्या आणि विचारसरणीच्या आंधळ्या 'ट्रो ' ना समर्पित .  

1 comment:

  1. मस्त लिहिलीय पोस्ट :)

    ReplyDelete