Saturday, 11 July 2015

हॉलिवूडची दबंगगिरी                                                        

   चित्रपट बघायला येणाऱ्या दर्शकांची पण एक सोशिओलॉजी असते .सलमान खानच्या चित्रपटात टाळ्या शिट्ट्यांचा गजर चालू असतो. त्यातून त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग कुठल्या वयोगटातला आहे , कुठल्या सामाजिक वर्गातून आला आहे याचा अंदाज बांधता येतो . हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे व्हाईट कॉलर , बहुदा आर्थिक उच्चवर्गातून आलेला असा एक 'स्टिरियोटाईप' आहे.  पण या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'फास्ट अॅंड फ्युरियस 7' हा चित्रपट हे स्टिरियोटाईप मोडून काढतो . पूर्ण चित्रपटभर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवायला मिळतो . साधारणतः  सोळा  ते  पंचवीस  या वयोगटातल्या  प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं चित्रपटगृह , श्वास रोखून धरणाऱ्या अॅक्शन सीन्सला मिळणाऱ्या  शिट्ट्या , अभिनेत्यांच्या  संवादांना मिळणाऱ्या टाळ्या ह्या गोष्टी फास्ट अॅंड फ्युरियस चित्रपटमालिका  भारतात पण किती लोकप्रिय आहे याचा जणू दाखलाच देतात .हा चित्रपट (विशेषतः  थ्री डी  वर्जन ) प्रेक्षकांना एका रोमांचकारी रोलर कोस्टर राईडचा अनुभव देतो .

चित्रपटात तोंडी लावण्यापुरती एक कथा आहे . चित्रपटमालिकेच्या  मागच्या चित्रपटात डॉमनिक( विन डिजल) आणि  ब्रायन (पॉल वॉकर) यांच्या टोळीने ओवेनला पराभूत करून धुळीस मिळवलं होत . पण आता ओवेनचा भाऊ डेकार्द (जॅसन स्टॅथम)  भावाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या जीवावर उठला आहे . डेकार्द हा अतिक्रूर आणि तितकाच बुद्धिमान आहे . डेकार्द विरुद्धच्या लढाईत अचानक त्यांना मदतीचा हात मिळतो तो स्वतःची मिस्टर  नोबडी(कर्ट रसेल ) म्हणून ओळख देणाऱ्या अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधीकडून .पण या मदतीच्या मोबदल्यात त्याला डॉमनिक आणि त्याच्या साथीदारांकडून मदत हवी असते . एका संगणक तज्ञाने 'गॉड आय' नावाच तंत्रज्ञान विकसित केलेलं असत . त्याच्या  मदतीने जगात कुठल्याही माणसाचा ठावठिकाणा लावणे एकदम सोपे आहे . अमेरिकन सरकारला ते तंत्रज्ञान हव आहे . पण ज्या संगणक तज्ञाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे त्याचे अपहरण काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी केल आहे आणि त्याला उझबेकिस्तानमध्ये दडवून ठेवलं आहे . मग डॉमनिक आणि ब्रायन उझबेकिस्तानमध्ये ते तंत्रज्ञान हस्तगत करायला थडकतात . डेकार्द हा त्यांच्या पाठीमागे असतोच . मग  ह्या सगळ्या पात्रांचा  रंजक प्रवास पुढे टोकियो , अबुधाबी आणि नंतर अमेरिकन भूमीवर एक  शेवटची हाणामारी होऊन संपतो. पूर्ण चित्रपट खिळवून ठेवणारा असणारा असला तरी दोन प्रसंगांचा खास उल्लेख करायला हवा . उजबेकिस्तानच्या  पर्वतीय भागात रंगलेला 'कार  चेस ' चा सीन निव्वळ अफलातून या श्रेणीतला आहे .चित्रपटाच्या शेवटी दिवंगत पॉल वॉकरच्या एकूण योगदानाला 'ट्रिब्युट ' देणारा सुंदर प्रसंग आहे . फास्ट अॅंड फ्युरियस  चित्रपट मालिकेशी संबंध आलेल्या प्रत्येकाला हा सीन हळवा करून जाईल हे नक्की .   पॉल वॉकरच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये असलेल्या सहानुभूतीचा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पुरेपूर वापर करून घेतला आहे . 'जोकर' या अजरामर खलनायकी भूमिकेत गहिरे रंग भरलेल्या हिथ लिजरच्या अकस्मात मृत्यूचा फायदा 'द डार्क नाईट' चित्रपटाला झाला होता. तसाच फायदा  पॉल वॉकरच्या अपघाती मृत्यूचा या चित्रपटाला होताना दिसतो.चित्रपटात पॉल वॉकर जेंव्हा पडद्यावर पहिल्यांदा येतो तेंव्हा  प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्याच स्वागत करतात . एखाद्या कलावंताच्या मृत्यूला एक गूढ वलय कसे मिळते ?प्रसिद्ध लेखक अंबरिष मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकात ओ.पी नय्यर यांच्यावर एक सुंदर प्रकरण आहे. नय्यर हे  गुरुदत्त या मनस्वी कलाकाराच्या अतिशय जवळचे . नय्यर यांचे गुरुदत्तच्या गूढ  वर्ख  चढलेल्या मृत्यूबद्दलच  मार्मिक निरीक्षण मिश्र यांनी नोंदवल आहे. नय्यर यांच्या मते गुरुदत्तचा मृत्यू (आत्महत्या ) हि त्याच्या कमालीच्या बेहिशोबी व्यवहार आणि त्यातून आलेल्या व्यवसायिक अपयशातून झाली होती . मग त्या आत्महत्येला हे गूढ वलय कसे आले  ? त्याचे उत्तर देताना नय्यर म्हणतात  कि नोस्टाल्जियाचे गळे काढणारे चाहते  आणि  पत्रकार यांनी  ती दिली आणि त्यातून आजची गुरुदत्तची खिन्न ,निराश नायक अशी प्रतिमा उभी राहिली . कारण आणि संदर्भ वेगवेगळे असले  असली तरी हिथ लिजर आणि पॉल वॉकर याच पथावरचे वाटसरू .

धीरगंभीर, संतुलित आणि डोकेबाज डॉमनिकची भूमिका विन डिजल या अभिनेत्याने छान रंगवली आहे.या  चित्रपटमालिकेचा  अविभाज्य हिस्सा असणाऱ्या पॉल वॉकरने पण आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे .क्रूर , अतिशय थंडपणे मुडदे पाडणारा खलनायक  म्हणून जॅसन स्टॅथम शोभून दिसतो . ड्‌वेन जॉन्सन व इतर सहकलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत . चित्रपटाच भारतीय कनेक्शन म्हणजे आपल्याकडे मोठया भूमिकेत झळकणारा अली  फझल  (फ़ुकरे , खामोशीया ) इथे  दोन  सीनपुरती हजेरी लावून जातो . या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून जेम्स वेन याची झालेली  निवड थोडी बुचकळ्यात पाडणारी होती . वेनने यापूर्वी अनेक गाजलेले भयपट दिले आहेत . अॅक्शन जेनर हा प्रकार त्याने पहिल्यांदा हाताळला . मात्र त्याला दिग्दर्शनाचे पूर्ण गुण द्यायला हवेत . एक उत्तम दिग्दर्शक कुठल्याही प्रकारचा चित्रपट चांगल्याप्रकारे करू शकतो हा नियम पुन्हा सिध्द झाला .

 'फास्ट अॅंड फ्युरियस 7'  शंभर कोटीच्या वर कमाई करणाऱ्या  चित्रपटांच्या यादीत जाऊन बसणारा भारतातला पहिला हॉलीवूड चित्रपट बनण्याची पुरेपूर शक्यता आहे हे विधान धाडसी ठरू नये .

http://216.15.199.42/mimarathi/story.aspx?id=592&boxid=94855656&ed_date=2015-4-05&ed_code=820009&ed_page=10

No comments:

Post a Comment