Saturday, 11 July 2015

सबकुछ जॅकी चेन'ग्लोबल अपील' असण्याच भाग्य किती अभिनेत्यांना मिळत? चार्ली चॅप्लिन, अर्नोल्ड श्वार्जनेगर (तुम्हाला  आवडो  न  आवडो ) , लिओनार्डो डी कॅप्रियो अशी काही नाव चटकन आठवतात .याच प्रभावळीत अजून एक नाव आहे ते म्हणजे जॅकी  चेनच  .या हरहुन्नरी अभिनेत्याने गेल्या पाच दशकांपासून आपल्या अभिनयाचा  अमिट ठसा जगभरातल्या प्रेक्षकांमध्ये उमटवला आहे . मग  तो प्रेक्षक चीनमधला असो , अमेरिकेमधला असो वा जमशेदपूर सारख्या एखाद्या लहान भारतीय शहरामधला असो . इतक्या विविध प्रकारच्या सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रेक्षकापर्यंत पोहोंचण्याच भाग्य फार कमी अभिनेत्यांना मिळत . म्हणजे   जॅकी चेन कधी गोल्डन ग्लोब किंवा ऑस्करच्या शर्यतीत नसेल किंवा समीक्षकांकडून त्याला कधी वाह वाह पण मिळत नसेल पण त्याचा प्रेक्षक वर्ग जगभर विखुरला आहे आणि गल्लाबारीवर त्याचे चित्रपट बऱ्यापैकी पैसे मिळवतात हे त्याच्या कडव्या टीकाकारांना पण मान्य कराव लागेल . अशा या जॅकी चेनचा नवीन चित्रपट 'ड्रॅगन ब्लेड' या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.

सलमान खान किंवा रोहित शेट्टी-अजय देवगण यांच्या चाहत्यांना ज्याप्रमाणे चित्रपटाच्या कथेशी देणघेण नसत तसच जॅकी चेनच्या चाहत्यांच पण आहे . ते फक्त पडद्यावर जॅकी चेनच्या करामती बघायला जातात  आणि 'ड्रॅगन ब्लेड' पण त्यांना निराश करत नाही . पण ड्रॅगन ब्लेड' ला कथा आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकाला खिळवून ठेवणारी कथा आहे .ड्रॅगन ब्लेडच कथानक  प्रागैतिहासिक काळात घडत .चीन मध्ये हान वंशाची राजवट आहे . हुओ आन (जॅकी  चेन) हा त्या राजवटीत एका महत्वपूर्ण पथकाचा सरदार म्हणून कार्यरत आहे .मात्र हुओ आणि त्याच्या पथकावर खोटा आळ येतो आणि त्यांना सक्त मजुरीसाठी वाईल्ड गीस गेट या शहरात पाठवण्यात येत .योगायोगानेच जनरल ल्युशियस (जॉन  क्युसाक ) आपल्या सैन्यासह  चीनमध्ये प्रवेश करतो . प्युबिलिअस (जोसेफ वेटे ) या रोमन गादीच्या वारसदाराचे टिबेरिअस (अड्रियन ब्रोडी ) या सत्तालोलुप भावापासून रक्षण करण्यासाठी तो प्युबिलिअसला घेऊन रानोमाळ भटकत असतो .वाईल्ड गीस गेटचा कब्जा करून तिथे तात्पुरता आश्रय घेण्याचा त्याचा बेत असतो . मात्र इथे त्याची गाठ हुओ आनशी पडते . हुओ आणि ल्युशियस यांच्यात द्वंद्व युद्ध होत. त्यात ल्युशियसला  कळत की हुओ हा एक महान योद्धा आहे . त्यांचे मैत्र जुळते . दरम्यान अशी एक परिस्थिती उद्भवते की हुओला ल्युशियस आणि त्याच्या सैनिकांची मदत घ्यावी लागते . यामुळे ते परस्परांच्या अजून जवळ येतात . एव्हाना टिबेरिअस प्युबिलिअसचा  पाठलाग करत आपल्या प्रचंड सैन्यासह वाईल्ड गीस गेटच्या  वेशीवर उभा ठाकतो . हुओ  आणि ल्युशिअस त्याला थोपवण्यात यशस्वी होतात का ? त्यासाठी  कोणती  किंमत त्यांना चुकवावी लागते ?

चित्रपटात उत्कंठावर्धक अॅक्शन सीन्स आहेत . प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी द्वंद्व युद्ध आहेत .  म्हणजे  जे  जे जॅकी चेनकडून  अपेक्षित आहे  ते सगळ इथे आहे . पण ड्रॅगन ब्लेड काही  बाबतीत वेगळा आहे . चित्रपट मैत्री ,एकनिष्ठता यांच्यावर भाष्य करतो . हुओ आणि ल्युशिअस यांच्यात निर्माण होणार मैत्रीच नात हळुवार पणे  पडद्यावर उलगडल आहे . ल्युशिअसची रोमन गादीशी असणारी एकनिष्ठा पण हेलावून टाकणारी . या  चित्रपटाचे  सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे या चित्रपटात रोमन योद्धे आणि चीनी युद्धनीती यांचा घातलेला सुरेख मेळ . ३०० हा चित्रपट असेल  किंवा रसेल क्रो ला ऑस्कर मिळवून देणारा ग्लॅडिएटर असेल जगभरातल्या प्रेक्षकांना या भव्यदिव्य 'ग्रीक ट्रॅजेडी' पडद्यावर बघायला आवडतात . त्याचबरोबर चीनी कुंग फु चित्रपटांचा पण जगभर पसरलेला असा एक चाहता वर्ग आहे . ड्रॅगन ब्लेड मध्ये ही शैलींच्या  परस्पर विरुध्द ध्रुवांवर असलेली  टोक कौशल्याने एकत्र आणण्याची किमया दिग्दर्शक डैनियल ली ने उत्तमपणे साधली आहे. कथानकात  या दोन संस्कृतींच एकत्र येण हे उत्तमरीत्या गुंफलेल्या कथेमुळे खटकत नाही आणि इथेच दिग्दर्शक अर्धी बाजी मारून जातो .  चित्रपटात अड्रियन ब्रोडी (यावेळी खलनायकी भूमिकेत ) आणि जॉन  क्युसाक सारखे दिग्गज अभिनेते आहेत . आपल्या भूमिका पण त्यांनी चांगल्या निभावल्या आहेत पण  हा चित्रपट जॅकी  चेनचा चित्रपट म्हणूनच गणला जाईल . चित्रपटात  सर्वाधिक फुटेज त्यालाच आहे. कथानक पण त्याच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते.अभिनयाला अनेक मर्यादा असल्या तरी जॅकी  चेनने  हुओचे पात्र उत्तमपणे साकारले आहे .

भारत आणि चीन यांच्यात नेहमी तुलना होत असते . विशेषतः भारतीय माध्यमांमध्ये. पण  आपल्या 'सॉफ्ट पॉवरच्या' (खाद्य संस्कृती , चित्रपट ,कला संस्कृती )  प्रचारात चीन आपल्यापेक्षा अनेक मैल पुढे आहे . जॅकी चेनसारखा अभिनेता आणि ड्रॅगन ब्लेड सारखा चित्रपट हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करतो .

http://216.15.199.42/mimarathi/story.aspx?id=469&boxid=22046659&ed_date=2015-3-29&ed_code=820009&ed_page=10No comments:

Post a Comment