Saturday, 11 July 2015

कालबाह्य 'सिस्टम 'ची कहाणी

                                                 

    माझ  'कोर्ट 'या मराठी चित्रपटाचे 'मी मराठी live' च्या आजच्या अंकात आलेलं परीक्षण…
                                

                                        कालबाह्य 'सिस्टम 'ची कहाणी
                                                                
सिस्टम किंवा व्यवस्था हा शब्द आपल्याकडे मोठ्या नकारात्मकपणे बघितला जातो . सिस्टम म्हणजे  भ्रष्टाचार , अराजकता वाटेल असा गोंगाट असा एक समज आहे . पण खरडत खरडत का होईना हि सिस्टम सातत्याने चालू आहे हे विशेष . अगदी कालबाह्य नियमांसकट . सिस्टम म्हणजे काय तर काळोख्या खोलीत तिथे नसणारे काळे मांजर शोधणारा आंधळा मनुष्य असेही विनोदाने म्हंटले जाते . दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे
 या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ;कोर्ट ' या आपल्या चित्रपटातून याच सिस्टमचा एक नवीन पैलू दाखवतो.
हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपिचा मुद्दा ऐरणीवर आला असताना 'कोर्ट 'प्रदर्शित होण याला सुखद योगायोग म्हणाव लागेल .

या अगडबंब , अंगावर येणारी विविधता असणाऱ्या देशाला कुठली गोष्ट जोडून ठेवते ? तर बॉलीवुड ,क्रिकेट आणि संसदीय लोकशाही अशी उत्तर मिळतात . पण त्यात अजून एक गोष्ट वाढवायला हवी . भारतीय न्यायव्यवस्था . प्रलंबित खटल्यांची प्रचंड संख्या , वापरात असलेले ब्रिटीशकालीन कालबाह्य कायदे यांच ओझ बाळगून वंगण नसलेल्या चाकासारखी हि सिस्टम चालू आहे . दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे ने 'कोर्ट ' मध्ये याच सिस्टमचा  आणि त्यापलीकडे जाउन त्या सिस्टम मधल्या माणसांचा वेध घेतला आहे .  घटनाक्रमाची सुरुवात होते ते एका सफाई कामगाराच्या झालेल्या मृत्यूने . पोलिसांचा दावा असतो की हा नैसर्गिक मृत्यू नसून आत्महत्या आहे . नारायण कांबळे (वीरा साथीदार ) या लोकशाहिराच्या पोवाड्यामुळे तो सफाई कामगार आत्महत्येस प्रवृत्त झाला .आत्महत्येला उद्युक्त केल्याप्रकरणी नारायण कांबळेला कोठडीत डांबल जात व रीतसर खटला दाखल केल्या जातो . कोर्ट हि या खटल्याची कहाणी आहे . हि  कहाणी फक्त नारायण कांबळे ची नाही . तर न्याय व्यवस्थेचा भाग असणारा बचाव पक्षाचा वकील विनय  वोरा (विवेक गोंबर ), सरकारी वकील (गीतांजली कुलकर्णी ), आणि जज सदावर्ते (प्रदीप जोशी ) यांची पण आहे . चारी पात्रांचा समांतर प्रवास चित्रपटात दाखवला आहे . ही सगळी पात्र एका विशिष्ट सामाजिक -आर्थिक वर्गाच प्रतिनिधित्व करतात . पात्रांना अशी पार्श्वभूमी देण्यामागे दिग्दर्शकाचे काही ठाम आडाखे आहेत . चित्रपट बघताना ते किती बरोबर आहे  ते कळत .चित्रपट  सुरुवात ,मध्य आणि शेवट अशी परिचित वळण घेत नाही . बहुतेक चित्रपट कोर्टरूम मध्ये घडतो . कोर्टरूम ड्रामा हा प्रकार बॉलीवुड ने बदनाम करून टाकला आहे . कोर्टातच  कर्णकर्कश आवाजात ओरडणारे वकील , प्रतिस्पर्धी वकिलाला न्यायालयात बुकलुन काढणारा सनी  देओल , 'रुक जाओ जजसाब ' म्हणत मध्येच टपकणार  पात्र या प्रकारांनी कोर्ट खरच अस चालत असा समज जनमानसात पसरवला आहे . इथे दिग्दर्शक आपल वेगळेपण दाखवतो . कोर्टाच रुक्ष , शब्द आणि नियमावर बोट ठेवून चालणार काम त्याने इतक्या चपखलपणे दाखवले आहे  की एखाद्या खऱ्या  कोर्टात कॅमेरा लावून त्यातून झालेलं रेकोर्डिंग पडद्यावर दाखवलं आहे की काय अस वाटायला लागत . याच श्रेय अर्थातच छायाचित्रणकार म्रीणाल देसाईच.  आपली  न्यायव्यवस्था कशी कालबाह्य झाली आहे आणि शोषित वर्गाला न्याय मिळण्याची शक्यता कशी शून्यवत आहे याच अस्वस्थ करणार दर्शन 'कोर्ट' घडवतो . पण कालबाह्य असली तरी आपल्या देशाच गाड त्यामुळेच चालू आहे . पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल झिया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व त्यांना  त्याना मृत्युदंड  मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले.  भुट्टो हे तसे  भारत विरोधक. १९७१ च्या युद्धाच्यावेळी  त्यांनी युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टोनी  मोदीना  सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय लोकशाही आणि सिस्टमची  खिल्ली उडवायला आवडत. पण या दोन  गोष्टीच  भारताच बलस्थान आहे. तुमच्या व्यवस्थेमध्ये  नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. यामुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय व्यवस्थेला दिलेली ही एक सलामी.

सगळ्याच कलाकारांनी उत्कृष्ट आणि वास्तववादी अभिनय केला आहे . पण विशेष कौतुक जजच्या भूमिकेतल्या प्रदीप जोशी यांच . कार्यक्षम पण थोडा जुनाट विचारसरणीचा आणि नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या जज च्या भूमिकेत या नटाने  अप्रतिम रंग भरले आहेत . चित्रपटात लौकिक अर्थाने नायक आणि नायिका नसले तरी चित्रपटाला एक पडद्यामागचा नायक आहे . दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे . जागतिकीकरणाचा भारतात बिगुल वाजण्याच्या थोड अलीकडे जन्माला आलेल्या या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात जी कामगिरी बजावली आहे ती थक्क करणारी आहे .

आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची आई ' ला  पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते . त्यानंतर मुंबईत शिवाजी पार्क वर आचार्य अत्रे यांचा जाहीर सत्कार झाला . त्यावेळी केलेल्या भाषणात अत्रे विषादाने म्हणाले ,"तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलात . पण याच्या अर्धी गर्दी जरी तिकीट खिडकीवर आली असती तर आमच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा थोडा हलका झाला असता ."असे म्हण्याची पाळी चैतन्य ताम्हाणे आणि टीमवर येऊ नये यासाठी एक भाषिक समाज म्हणून आपण काय करणार आहोत हा कळीचा प्रश्न आहे .
No comments:

Post a Comment