Sunday, 12 July 2015

तोच खेळ पुन्हा एकदा ...                                                   

     एडवर्ड विल्सन हे प्रख्यात पुलीत्झर विजेते प्राध्यापक आणि लेखक आहेत . त्यांच्या एका शोधनिबंधात त्यांनी असे म्हंटले आहे की , जगाला वेगळे वळण देणाऱ्या शक्ती या ऐतिहासिक नसतात तर जैविक असतात . याच अतिशय योग्य उदाहरण म्हणजे पृथ्वीवर एकेकाळी निरंकुश वावर असणारे डायनॉसॉर  हे अवाढव्य प्राणी धुमकेतूची धडक बसुन नामशेष झाले . ही घटना घडली नसती तर मानवाची उत्क्रांती कशी झाली असती ? आपला सगळ्यांचा पुर्वज असणारा आदिमानव या अमानुष ताकदवान प्राण्यांसमोर तग धरू शकला असता का हा आपल्या  सध्याच्या अस्तित्वाच्या अनुषंगाने असणारा लाख मोलाचा प्रश्न आहे . यामुळेच की काय , आपल्यापुर्वी पृथ्वीवर राज्य करणाऱ्या डायनॉसॉरबद्दल मानवाला प्रचंड आकर्षण आहे . स्टीव्हन स्पीलबर्ग या अवलिया दिग्दर्शकाने मानवी मनाची ही गरज ओळखुन  'ज्युरासिक पार्क' नावाचा  चित्रपट तयार केला . डायनॉसॉरच रक्त पिताना गोठला गेलेल्या एका डासापासून डायनॉसॉरचे डी एन ऎ  मिळवुन शास्त्रज्ञांच्या मदतीने जॉन हेमंड नावाचा उद्योगपती पुन्हा या महाकाय प्राण्याचं पुनर्निर्माण कस करतो हे या विज्ञान काल्पनिकेत दाखवलं होत  . ह्या चित्रपटाने तिकीट खिडकीवर घवघवीत यश मिळवलं . नंतर या कल्पनेचे चित्रपटमालिकेत रुपांतर करून अजून दोन चित्रपट बनवले . त्यांना पण चांगल यश मिळाल . भारतात पण या चित्रपटमालिकेचा  मोठा चाहतावर्ग आहे . याच चित्रपट मालिकेचा चौथा भाग 'जुरासिक वर्ल्ड' अपेक्षांचं मोठ ओझ  घेऊन या आठवडयात प्रदर्शित झाला आहे .

यावेळेस दिग्दर्शनाची धुरा  स्पीलबर्गऐवजी  कॉलिन ट्रेवॉरो या तुलनेने नव्या दिग्दर्शकाने सांभाळली आहे .  हा चित्रपट देखील पूर्वसुरीपेक्षा काहीबाबतीत वेगळा आहे . पूर्वी तत्कालीन कथानायकांचा मुकाबला फक्त अवाढव्य डायनॉसॉरशी  होता . यावेळेस मात्र डायनॉसॉर फक्त आकाराने मोठे नाहीत तर चक्क बुद्धिमान पण आहेत . ते  निरीक्षण करतात , विचार करू शकतात आणि मानवांना मारणे हा त्यांच्यासाठी चक्क 'खेळ ' आहे . जुरासिक पार्कची देखभाल आणि धुरा सांभाळण्याचे काम आता सायमन मसरानी  (इरफान  खान) या  महत्वाकांक्षी उद्योगपतीच कार्पोरेशन  सांभाळत आहे . हे पार्क आता एक 'टुरिस्ट डेस्टिनेशन ' म्हणुन लोकांसाठी खुले करण्यात आले आहे . त्यामुळे 'जुरासिक पार्क ' ला पण आता अर्थव्यवस्थेचे नियम लागू व्हायला लागले आहेत . लोकांना सतत काहीतरी वेगळे देण्याच्या खटपटीत मसरानि  कार्पोरेशनने अजून आकाराने अक्राळविक्राळ डायनॉसॉर तयार केले आहेत . पण हे नवे प्राणी  बौद्धिकदृष्ट्या उत्क्रांत झाले आहेत याची त्यांना कल्पना नाही . कर्तव्याला  नेहमी भावनांपेक्षा प्राधान्य देणारी क्लेयर (ब्रेस डालास हावर्ड) ही तिथली एक वरिष्ठ अधिकारी आहे . ऑवेन ग्रीडी (ख्रिस प्रॅट  ) हा तिथेच डायनॉसॉरच्या विशिष्ट जमातीला ट्रेनिंग देण्याच काम करत आहे . डायनॉसॉरना ट्रेनिंग देऊन त्यांना प्रशिक्षित करता येत अशी ऑवेनची थियरी आहे .   लहान मुल आणि अजस्त्र डायनॉसॉर असा लोकांना आवडणारा 'विरोधाभास ' या चित्रपटात पण आहे . क्लेयरचे दोन अल्पवयीन पुतणे या पार्कला भेट द्यायला येतात . ते काही विचित्र संयोगाने धोकादायक क्षेत्रात शिरायला आणि हे नवीन 'उत्क्रांत ' डायनॉसॉर मानवी हलगर्जीमुळे पिंजऱ्यातून सुटायला एकच गाठ पडते . आणि सुरु होतो गतिमान पाठलागाचा नवीन खेळ . पार्क मध्ये अडकून पडलेले  तब्बल वीस हजार टुरिस्टपण या डायनॉसॉरच्या तडाख्यात सापडतात . याही परिस्थितीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी करू पाहणारा तिथला सुरक्षाप्रमुख विक हॉस्किंस (विंसेंट डी'ओनोफ्रियो) याच्यामुळे परिस्थिती अजुनच गंभीर बनते . अशात क्लेयर ऑवेनला  घेऊन आपल्या पुतण्याना शोधण्यासाठी धोकादायक क्षेत्रात शिरते . अर्थातच चित्रपटमालिकेतल्या पहिल्या चित्रपटाच्या  कथानकाचा प्रभाव या चित्रपटाच्या कथानकावरपण आहे हे उघड आहे . पण गेल्या बावीस वर्षात तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा पुरेपूर फायदा दिग्दर्शकाने उचलला आहे . थ्री डी तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर  चित्रपटात आहे . विशेषतः दोन विशालकाय डायनॉसॉरच्या लढतीचा प्रसंग अंगावर रोमांच आणणारा आहे . हा चित्रपट बघायचा असेल तर तो थ्री डी मध्येच बघणे क्रमप्राप्त आहे . जुरासिक पार्कची सुंदरता भव्य लॉंग शॉटसचा मोठ्या प्रमाणावर वापर करून अप्रतिमपणे पडद्यावर दाखवली आहे .

अभिनयाच्या  आघाडीवर ख्रिस प्रॅट आणि ब्रेस डालास हावर्ड या जोडीने भूमिकेला न्याय दिला आहे . पण आपल्यासाठी महत्वाची असणारी अजून एक गोष्ट म्हणजे इरफान खानच  चित्रपटात असलेल भरीव योगदान . काही वर्षापूर्वी भारतीय अभिनेत्यांनी हॉलिवुड फिल्म्समध्ये छोट्या किरकोळ भुमिका कराव्यात का यावर चर्चा झडल्या होत्या (याचाच अजून एक भाग म्हणजे  आघाडीच्या मराठी अभिनेत्यांनी हिंदी चित्रपटात नौकर किंवा घरगड्याच्या भूमिका कराव्यात का यावर पण रसभरीत चर्चा झाल्या होत्या ). म्हणजे आपल्याकडचा महानायक म्हणवल्या जाणाऱ्या  अमिताभ बच्चनने  एका हॉलिवुड चित्रपटात निव्वळ दोन मिनिटाची भुमिका केली होती . 'इस्ट इज इस्ट ' मधल्या ओम पुरीसारखे काही निवडक अपवाद वगळता बहुतेक भारतीय अभिनेत्यांनी हॉलिवुड फिल्म्समध्ये किरकोळ भूमिका करण्यात धन्यता मानलेली दिसते . या ट्रेंडला छेद देण्याच काम शेवटी इरफानने केले आहे . इरफान हा किती गुणी अभिनेता हे वेगळे सांगायची गरज नाहीच . या चित्रपटातपण त्याने आपली भुमिका चोख बजावली आहे .  हा चित्रपट पाहिल्यावर आपण चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक क्षेत्रात हॉलिवुडपेक्षा किती वर्ष मागे आहोत अशी तुलना मनात सुरु होते . विज्युअल इफेक्ट्सचा सढळ वापर चित्रपटाला चित्रपटमालिकेतील इतर चित्रपटांपेक्षा काही बाबतीत सरस बनवतो .

पृथ्वीवर निरंकुश राज्य करणारा डायनॉसॉर हा प्राणी निसर्गाच्या एका फटक्याने नामशेष झाला . आपल्याला आव्हान देणार कुणीच नाही या गुर्मीत वसुंधरेचा विध्वंस करणाऱ्या मानव जातीला उद्या नामशेष होण्याचा प्रसंग आला तर 'जुरासिक वर्ल्ड ' च्या धर्तीवर भविष्यकाळात   त्यावेळेस पृथ्वीवर राज्य करणाऱ्या  प्राण्याने  मानवांचा  एखादा 'पार्क ' तयार केला  तर त्याचे नाव काय असेल असा अस्वस्थ करणारा प्रश्न 'जुरासिक वर्ल्ड ' पाहिल्यावर पडला तर तो 'बोनस' समजावा .

http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=729&boxid=6185848&ed_date=2015-6-14&ed_code=820009&ed_page=6
No comments:

Post a Comment