Sunday, 12 July 2015

लादल्या गेलेल्या चिरतारुण्याची कथा


‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ मध्ये ऑस्कर वाइल्ड लिहितो ,"काही  गोष्टी खूप मुल्यवान असतात कारण त्या जास्त वेळ टिकत नाहीत ." या अजरामर कादंबरीमधल मुख्य पात्र डोरियन ग्रे याच कारणाने आपले तारुण्य जपण्यासाठी अखंड धडपड करत असते . अगदी पडेल ती किंमत देऊन . ज्ञानपीठकार वि . स . खांडेकर  यांचा विषयासक्त ययाति  देवाकडे चिरतारुण्य मागतो . नंतर  स्वतःच्या मुलाचेच तारुण्य ओरपुन घेतो आणि  नंतर  हे  तारुण्य पण संपल्यावर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ होतो . 'चिरतारुण्य या कल्पनेने सुदूर इंग्लंडमधल्या ऑस्कर वाइल्ड या शापित यक्षाला आणि  आपल्याकडच्या काळाच्या कित्येक योजने पुढे असणाऱ्या खांडेकर या अवलिया लेखकाला भुरळ घातली यात आश्चर्य नाही . पुनर्जन्म , अमरत्व , परिसाचा दगड या सार्वकालिक आणि वैश्विक 'मृगजळी ' कल्पनांप्रमाणेच 'चिरतारुण्य ' हि कल्पना पण कलावंताना भुरळ पाडत आली आहे . चिरतारुण्य संकल्पनेभोवती फिरणाऱ्या  बहुतेक कलाकृतींमध्ये एखादे पात्र चिरतारुण्याचा पाठलाग करताना दिसते . पण एखाद्यावर हे 'चिरतारुण्य इच्छा नसताना लादले गेले असले तर काय होईल या थोड्या वेगळ्या प्रश्नांचा धांडोळा या आठवडयात प्रदर्शित झालेला 'द एज ऑफ अ‍ॅडलाइन' हा  चित्रपट घेतो .


चित्रपटाची सुरुवात होते ती १९३७ सालात . २९ वर्षीय अ‍ॅडलाइन बोमॅन (ब्लेक लाइवली) हि एका जीवघेण्या अपघातातुन आश्चर्यकारकपणे  बचावते . पण या अपघातामुळे तिच्या डि एन ए मध्ये काही बदल होतात आणि त्याचा परिणाम म्हणुन तिच शारीरिक वय वाढण्याची  प्रक्रिया थांबते . काही वर्षांनतर हि गोष्ट तिच्या आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांना ठळकपणे जाणवायला लागते . तिच्या चिरतारुण्याचे  रहस्य जाणुन घेण्यात  रस असणारे  काही लोकपण तिच्या मागे लागतात . पुढच जीवन प्रयोगशाळेत 'गिनिपिग ' बनुन राहण्यापेक्षा अ‍ॅडलाइन भुमिगत होऊन नवीन जीवन सुरु करण्याचा निर्णय घेते . आपली मुलगी फ्लेमिंग  (एलेन बर्स्टिन ) हिची परवानगी घेऊन ती राहती जागा सोडते . पण हा निर्णय आचरणात आणायला सोपा नसतो . तीच चिरतारुण्य आणि वय न वाढणे हे एका विशिष्ट काळानंतर लोकांपासुन लपुन राहणे शक्य नसते . त्यामुळे तिला वारंवार आपल्या वास्तव्याच्या जागा बदलाव्या लागत असतात . दरम्यान तिच्या आयुष्यात काही पुरुष पण येतात पण तिच्या या रहस्यामुळे त्यांच्यात होणाऱ्या जवळिकीला मर्यादा पडत असतात . या लपुन छपुन जगण्याचा आणि एकाकीपणाचा अ‍ॅडलाइनला मनापासुन वीट आला असतानाच तिच्या आयुष्यात पुन्हा एक आशा जागृत होते . एलिस जोन्स (मिशेल हुसमॅन) हा तरणाबांड श्रीमंत तरुण तिच्या आयुष्यात येतो . प्रेमात पडलेल्या अ‍ॅडलाइनला पुन्हा आयुष्यात रस वाटायला लागतो . पण एव्हाना 'त्या ' अपघाताला  अनेक  दशक होऊन गेली असतात .  अ‍ॅडलाइन हि तब्बल १०६ वर्षाची झालेली  असते . तिची मुलगी पण आता बरीच वृद्ध झाली आहे . आपले वयाचे रहस्य एलिसपासुन लपवून ठेवावे का त्याला सर्व सांगुन टाकावे  या द्विधा मनस्थितीत अ‍ॅडलाइन सापडते . अ‍ॅडलाइन पुढे काय करते ? तिच्या आयुष्याची सुखांतिका होते का  शोकांतिका ? या  सगळ्या प्रश्नांची उत्तर 'द एज ऑफ अ‍ॅडलाइन' चित्रपट पाहताना मिळतात .

दिग्दर्शक ली टोलँड क्रेगरला मानवी भाव भावना  केंद्रबिंदू असणारे चित्रपट करायला आवडतात . त्याचा यापूर्वीचा भावाच्या भावी वधूच्या प्रेमात पडणाऱ्या नायकाची कथा सांगणारा 'द व्हिशियस काइंड ' आणि  आयुष्याचे गणित पुन्हा उलगडु पाहणाऱ्या घटस्फोटीत दाम्पत्याची कथा सांगणारा 'सेलेस्टी & जेसी फॉर एव्हर ' हे  चित्रपट दिग्दर्शकाच्या या बलस्थानाची साक्ष देतात . 'द एज ऑफ अ‍ॅडलाइन' हा चित्रपटही याला अपवाद नाही . या चित्रपटात नातेसंबंधाचे प्रभावी चित्रण आहे . विशेषतः वृद्ध होत जाणाऱ्या मुलीचे आणि चिरतरुण आईचे थोडे अवघडलेले पण एकमेकांची काळजी घेणारे नाते खुप सुंदरपणे पडद्यावर साकारले आहे . अ‍ॅडलाइन आणि एलिस मधल प्रेम पण पडद्यावर छान साकारल आहे.  चित्रपटाचा पडद्यावरचा लुक 'क्लासिक ' सदरात मोडतो . थोडा 'प्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडाइस' च्या जवळ जाणारा . त्यामुळे हा चित्रपट एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाला आवडु शकतो पण त्यामुळेच हा चित्रपट  आपल्या देशात 'मास एंटरटेनर' बनण्यावर मर्यादा येणार हे उघड आहे  .  अ‍ॅडलाइनची शीर्षक भूमिका  ब्लेक लाइवली या अभिनेत्रीने पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहे . तिच्या मुलीच्या भुमिकेत एलेन बर्स्टिनने तिला छान साथ दिली आहे .हॅरिसन फोर्ड , मिशेल हुसमॅन यांनी पण आपल्या भुमिका योग्यरीत्या बजावल्या आहेत . चित्रपटामध्ये घडणाऱ्या  कथानकाचा कालावधी तब्बल आठ दशकाचा आहे . पडद्यावर हा कालावधी तुटक तुटक न वाटता सलग प्रवाही वाटतो . याबद्दल संकलक मेलिसा केंटला पैकीच्या पैकी गुण . चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाजू पण भक्कम .

हॉलिवुडचे चित्रपट म्हणजे टेकसेव्हि हाणामाऱ्या, सुपर हिरो , परग्रहवासीयांची आक्रमण किंवा  पृथ्वीचा विनाश असा आपल्याकडच्या काही प्रेक्षकांचा समज असतो . पण ते लोक भावनाकेंद्री चित्रपटपण अतिशय उत्तम बनवतात .   'द एज ऑफ अ‍ॅडलाइन'  हा चित्रपट पण त्यातलाच एक . हा चित्रपट फार मोजक्या चित्रपटगृहात लागला आहे . पण पडद्यावर उलगडलेला हळुवार रोमान्स , अनवट नातेसंबंध पहायचे असतील तर एकदा थोडा त्रास सहन करायला हरकत नाही .

  

No comments:

Post a Comment