Sunday, 12 July 2015

'युटोपिया ' ची सफर

 
     
                                      
   प्रत्येकाचा एक स्वप्नाचा गाव असतो . मनाच्या कुठल्यातरी हळुवार कप्प्यात दडलेल्या या गावात सगळ कस 'परफेक्ट ' असत . त्या गावात ना कुठली कडक शिस्तीची शाळा असते , ना कुठली तरी मारून मुटकुन  करावी लागणारी नौकरी असते . आणि हो तुमच्या आयुष्याबद्दल चांभार चौकशा करणारे नातेवाईक पण नसतात . असतात फक्त उनाड दिवस . अशा आदर्श जागेला इंग्रजीत 'युटोपिया ' म्हणतात . आयुष्याची रेस धावता धावता त्या गावाच स्टेशन कधी माग पडत ते कळत पण नाही . पण ते मनात अस्तिवात असतच . हॉलिवुड चित्रपटानी मानवी मनाचा हा कप्पा चांगलाच ओळखला आहे . 'एलिस इन वंडरलँड' , 'नार्निया ' चित्रपट मालिका , , असे अनेक चित्रपट काढुन ह्या स्वप्नाच्या गावाना हॉलिवुडनी दृश्यरूप दिल आहे  . हॅरी पॉटरमधल हॉगवॉर्ट्‌ज तरी दुसर काय आहे? जॉर्ज क्लुनी अभिनीत 'टुमारोलँड' पण आपल्याला या सुंदर 'युटोपिया 'ची  सफर घडवुन आणतो .

केसी न्यूटन (ब्रिट रॉबर्टसन) या अतिशय चौकस स्वप्नाळु मुलीच्या हाती अपघातानेच एक 'पिन' लागते . या पिनला  स्पर्श करताच स्पर्श करणारा माणुस 'टुमारोलँड' नावाच्या एका मोहक जगात पोहोंचत असतो . 'टुमारोलँड' हे असे सुंदर , काळाच्या पुढचे जग  आहे जे  अनेक शास्त्रज्ञ , कलाकार  आणि काळाच्या पुढे विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येउन बसवल आहे . बाकीच्या जगाला मात्र 'टुमारोलँड' ची खबरबात पण नाही . हे बाकीचे जग  उध्वस्त होण्यात आत्ममग्न आहे . या 'पिन 'च्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी केसी घराबाहेर पडते . रस्त्यात तिची गाठ एथेनाशी  (राफि  कसाडी )पडते . एथेनाच्या सल्ल्यावरून ती वॉकर (जॉर्ज क्लुनी) या वैफल्यग्रस्त पण हुशार शास्त्रज्ञाच्या दारावर जाते . विक्षिप्त आणि निराश वॉकर तिची मदत करायला अर्थातच नकार देतो . पण परिस्थिती अशी निर्माण होते की त्याना एकत्र येउन 'टुमारोलँड' ला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही . त्यांना अर्थात साथ असते एथेना या लहान मुलीच्या रुपात असणाऱ्या रोबोटची . त्यांच्या या  रोमांचक प्रवासाची कहाणी म्हणजे 'टुमारोलँड' .

'डिस्नेची' निर्मीती असल्याने चित्रपटात सुंदर ग्राफिक्सची  मेजवानी आहे . डिस्नेच्या चित्रपटात जो एक दर्जा असतो तो इथे पण दिसतो . चित्रपटात एक प्रसंग आयफेल टॉवरवर घडतो . त्या प्रसंगात आयफेल टॉवरच मध्यभागातून विभाजन होत आणि एक रॉकेट बाहेर पडत अस दृश्य आहे . ते दृश्य निव्वळ जिवंत आणि अस्सल  वाटत . अशा अनेक चमकदार 'फ्रेम्स ' चित्रपटात आहेत . तुकड्या तुकड्यामध्ये चित्रपट चांगला वाटला तरी सलग असा परिणाम चित्रपट साधत नाही  हे दिग्दर्शक ब्रॅड बर्डच अपयश म्हणाव लागेल . ब्रॅड बर्डने  यापुर्वी डिस्नेचे  प्रतिस्पर्धी असणारया 'पिक्सार ' च्या छावणीत राहून अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत . तो तिथे क्रियेटिव्ह टिम चा भाग होता . दिग्दर्शक म्हणुन पण त्याने 'राटाटुलि ' 'द इनक्रेडिबल्स' असे भन्नाट चित्रपट दिले आहेत . त्याच्या पूर्वीच्या कामाशी तुलना केली असता   'टुमारोलँड' मध्ये त्याने बर्यापैकी निराशा केली आहे असे म्हणता येईल .

जॉर्ज क्लुनीचा अभिनय चित्रपटाची एक जमेची बाजु आहे . वय होण ही प्रक्रिया किती 'ग्रेसफुल ' असु शकते याच क्लुनी हे मुर्तिमंत उदाहरण आहे . चमचमणारे पांढरे  केस , डोळ्याखालची काळी वर्तुळ आणि नाहीच्या बरोबर असणारा मेक अप या गोष्टी असुन देखील क्लुनी तितकाच देखणा दिसतो . चित्रपटात एक प्रसंग आहे . ह्युग लॉरीने साकारलेला खलनायक अनेक वर्षांनी भेटलेल्या जॉर्ज क्लुनीने साकारलेल्या  वॉकरला म्हणतो ,"तुझ वय दिसायला लागल आहे वॉकर. " डोळ्यात मिश्किल छटा आणुन क्लुनी म्हणतो ," नाही जमत हे सगळ्यांना ." तेंव्हा चित्रपटगृहात हास्याची लकेर पसरते . केसीची भुमिका साकारणार्या  ब्रिट रॉबर्टसनने चांगली साथ दिली आहे . ह्युग लॉरीने साकारलेला निक्स हा खलनायक पण प्रभावीत करून जातो .

चित्रपटात जे 'टुमारोलँड' दाखवलेलं आहे ते फारस प्रभावी वाटत नाही . जॉर्ज कमेरोन ने 'अवतार ' चित्रपटात जी दुसऱ्या ग्रहावरची जीव सृष्टी साकारलेली होती किंवा  हॅरी पॉटरमधल्या  भन्नाट  हॉगवॉर्ट्‌जशी  'टुमारोलँड' ची तुलना केली असता निराशा पदरी पडते . ही तुलना अस्थायी वाटु शकते पण पडद्यावर एक नवीन जग (मग ते कार्टूनच असो वा काल्पनिक ) उभारण हा डिस्नेचा मजबूत पक्ष मानला जातो . मात्र नेमक्या याच आघाडीवर चित्रपट कमी पडतो .

 चित्रपटात मोठ 'पोटेन्शियल' असूनही पडद्यावर ते फारस उतरलेलं नाही ही खेदाची गोष्ट आहे . एक चांगला होता होता राहुन गेलेला चित्रपट म्हणुन 'टुमारोलँड' ची नोंद होईल . बाकी एकदा चित्रपटगृहात जाउन या 'युटोपिया 'च्या सफारीचा आनंद घ्यायला हरकत नाही .

http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=722&boxid=71241295&ed_date=2015-05-24&ed_code=820009&ed_page=6

No comments:

Post a Comment