Sunday, 26 July 2015

अपवादात्मक सुपरहिरो


       
                           

    स्पायडरमॅन, हल्क,  आयर्नमॅन, यांच्यासारख्या आणि इतरही अनेक लोकप्रिय सुपरहिरोंच्या निर्मितीमागचा 'ब्रेन ' एकच आहे . सध्या वयाच्या नव्वदीत असणारा स्टॅन ली नावाचा अवलिया . त्याने निर्मिलेले बहुतेक कॉमिक्स हिरो आता मोठ्या पडद्यावर पण आले आहेत आणि तिथेही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवत आहेत . तर अशा या स्टॅन लीने  सुपरहिरोबद्दल एक चांगल निरीक्षण नोंदवल होत . स्टॅन ली म्हणतो ,"कुठलाही सुपरहिरो जन्माला येत नाही . तो परिस्थितीने इतरांपेक्षा वेगळा बनत जातो आणि त्यामुळे त्याला पुढे जाउन महानायकत्वाचि कवचकुंडल लाभतात ." या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या  'अ‍ॅण्टमॅन' चित्रपटातल्या अतिशय वेगळ्या सुपरहिरोला पण हे तंतोतंत लागु पडतं  .

सुपरहिरो म्हंटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जे  जे म्हणुन 'सरसकटीकरण ' येतात त्याला अ‍ॅण्टमॅन  अपवाद आहे . सामान्यपणे सुपरहिरो म्हंटल की 'लार्जर दॅन लाईफ' अशा काही प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात . धिप्पाड शरीरयष्टी , आकर्षक व्यक्तिमत्व , अमानुष ताकत अशी काही  'सरसकटीकरण ' प्रेक्षकांनी सुपरहिरोना बहाल केलेली असतात . अ‍ॅण्टमॅन हा सुपरहिरो अशा सर्व  'सरसकटीकरण' करणाऱ्या नियमांना छेद देतो . या चित्रपटातला सुपरहिरो नावाप्रमाणेच मुंगीच्या आकाराचा आहे .  अॅण्टमॅन’ हा मार्व्हल कॉमिक्सच्या  इतर सुपरहिरोप्रमाणे आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध आहे. पण या 'अपवादात्मक' सुपरहिरोला पडद्यावर कितपत यश मिळेल याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होत्या . पण दिग्दर्शक पेटन रीड याने हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रण केला . यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे . खर तर या चित्रपटावर पुर्वी 'शॉन ऑफ द डेड ' आणि 'वर्ल्डस एंड ' सारखे भन्नाट चित्रपट देणारा एडगर राईट हा दिग्दर्शक काम करत होता. त्याने चित्रपटाची संहितापण तयार केली होती . पण काही मतभेदांमुळे तो या प्रोजेक्टमधून बाहेर पडला . अर्थातच त्याच्या जागी आलेल्या पेटन रीडने चांगली कामगिरी बजावली आहे . तरीसुद्धा एडगर राईटने हा चित्रपट केला असता तर तो कसा बनला असता अशी एक हुरहूर लागून राहते . पण राजकारण आणि सिनेमा या क्षेत्रात जरतरला फारसा अर्थ नसतो .

पॉल रूड या अभिनेत्याला मुख्य भुमिकेत कास्ट करून दिग्दर्शकाने अर्धी बाजी मारली आहे . पॉल हा अतिशय गुणी पण कायम दुय्यम भुमिका बजावणारा नट. व्यक्तिमत्व फारस भारदस्त नसल  तरी  त्याच्या अभिनयात एक 'सिन्सिरियटी' असते . स्पायडरमॅनची भुमिका पुर्वी बजावणार्या  टोबी माग्वायारची आठवण पॉल रूड करून देतो . या सुपरहिरो चित्रपटामध्ये मुख्य व्यक्तिरेखेइतकच मायकेल  डग्लसने साकारलेल्या पात्राला पण 'फुटेज ' आहे हे एक अजुन विशेष .

चित्रपटाच  कथानक १९८९  साली सुरु होत . डॉक्टर हॅन्क पाईम ( मायकेल  डग्लस) या शास्त्रज्ञाने असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे की ज्यामुळे कुठलीही वस्तु किंवा सजीव प्राणी सुक्ष्म आकार धारण करू शकेल . मात्र आपले तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडेल या भीतीने तो जिथे काम करत असतो तिथुन राजीनामा देतो  . कथानक नंतर आताच्या काळात आणल जात . स्वभावाने चांगला असणारा पण परिस्थितीमुळे छोटे मोठे गुन्हे करणाऱ्या  स्कॉटची(पॉल रूड)  ओळख प्रेक्षकांशी होते . घटस्फोट झालेल्या स्कॉटचा आपल्या मुलीवर खुप जीव असतो . त्याची माजी पत्नी त्याला इशारा देते की जर त्याला आपल्या मुलीला भेटायचे असेल तर त्याने  पुरेसा आर्थिक आधार देणे आवश्यक आहे . एक मोठा हात मारून आर्थिक ददात मिटवावी असा विचार करून स्कॉट आपल्या मित्रांसह एका मोठ्या चोरीचा बेत आखतो . पण घटनाक्रम असा घडत जातो की त्याच्या हातात माणसाचा आकार मुंगीइतका  करणारा पण कुठल्याही सामान्य माणसापेक्षा दसपट अधिक अधिक शारीरिक बळ देणारा सुट लागतो . ह्या अनपेक्षित शक्तीचे काय करायचे हे त्याला समजत नसतानाच त्याची गाठ डॉक्टर हॅन्क पाईम याच्याशी पडते . हॅन्क स्कॉटला तो सुट खलनायक
डॅरेन (कोरी स्टॉल) ला थोपवण्यासाठी थांबवण्याचा सल्ला देतो . हॅन्क पाईमने वापरलेले तंत्रज्ञान वापरून डॅरेनने पण असा सुट तयार करण्यात यश मिळवले आहे . हे तंत्रज्ञान दुष्ट प्रवृत्तीच्या काही लोकांना विकण्याचा त्याचा इरादा आहे . अशाप्रकारे जगाला याच्यापासून वाचवण्याची जबाबदारी  स्कॉट आपल्या अंगावर घेतो .  स्कॉट अॅण्टमॅनचा सुट घालुन जगाला एका मोठ्या संकटातुन कस वाचवतो याची कहाणी म्हणजे हा चित्रपट . 

हा चित्रपट लहान मुलांचा प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवुन तयार केला आहे हे सतत जाणवत राहात . चित्रपटात अनेक हलके फुलके क्षण आहेत जे चित्रपटाला मनोरंजक बनवतात . राजमौलीच्या 'एगा' चित्रपटात पण हिरो एका माशीच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन खलनायकाचा बदला घेतो . अॅण्टमॅनची थीम पण याच्याशी थोडी मिळती जुळती आहे . चित्रपटात खलनायक आणि नायक सुक्ष्म अवतारात जाऊन एका 'ब्रीफकेस ' मध्ये एकमेकांशी लढतात असा एक सीन आहे . त्याच टेकिंग भन्नाट आहे . चित्रपटात तरुणपणीचा मायकेल  डग्लस इतका हुबेहूब दाखवला आहे की तंत्रज्ञाच्या कौशल्याची कमाल वाटते . राकेश रोशनच्या कारोबार नामक चित्रपटात असाच प्रयोग ऋषी कपुरसोबत केला होता . त्या फसलेल्या प्रयोगाची आठवण झाली तरी अंगावर काटा येतो . पुर्वार्धात चित्रपट थोडा रेंगाळतो आहे अस वाटू शकत मात्र नंतर वेगवान घटनांचा क्रम सुरु होतो . अभिनयाच्या आघाडीवर सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे . 

ह्या वीकेंडला चित्रपटगृहात जाऊन तुम्ही नक्की हा मनोरंजक आणि एका सर्वार्थाने वेगळ्या सुपरहिरोला पाहु शकता . एक विशेष सुचना . मार्व्हलच्या सर्व चित्रपटामध्ये एकदम शेवटी चित्रपटाच्या चित्रपटमालिकेतल्या पुढच्या भागाची 'हिंट ' दिलेली असते . तशी ती या चित्रपटात पण आहे . त्यामुळे 'एंड क्रेडिट्स ' सुरु झाले की निघायची घाई मुळीच करू नका .  'एंड क्रेडिट्स ' संपल्यावर तुम्हाला ही 'हिंट ' पाहायला मिळेल . 

http://epaper.mimarathilive.com/epapermain.aspx?eddate=2015-07-26&edcode=820009
No comments:

Post a Comment