Sunday, 12 July 2015

मिनियंसची धमाल

                                                     
१९९८ साली रामगोपाल वर्माचा 'सत्या ' कसाबसा रखडत प्रदर्शित झाला तेंव्हा चित्रपटाची फारशी हवा नव्हती . हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक 'माईलस्टोन' बनेल असे कुणी भाकीत केले असते तर लोकांनी त्याला वेड्यात काढले असते . पण 'माउथ टु माउथ  पब्लिसिटी' आणि समीक्षकांनी दिलेले अनुकूल मत यामुळे चित्रपटाची हवा तयार होऊ लागली . पण एक अजब गोष्ट घडत होती . चित्रपट बघून बाहेर पडणाऱ्या पब्लिकच्या तोंडी एकच नाव होत . भिकु म्हात्रेच. रांगडा , धसमुसळ्या आणि दिमागसे ज्यादा दिल से सोचनेवाल्या भिकु म्हात्रेवर पब्लिक जाम खुश होत . चित्रपटाच्या यशाच श्रेय पण त्या व्यक्तिरेखेला देण्यात आल .  सहव्यक्तिरेखेने मुख्य व्यक्तिरेखेला मात दिली असण्याच हे  एक उदाहरण . २०१० मध्ये  प्रदर्शित झालेल्या 'डेस्पिकेबल मी' या अॅनिमेशन चित्रपटाने लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले . पण यातल्या मुख्य पात्राएवजी भाव खाऊन गेले ते 'मिनियंस' नावाने ओळखले जाणारी  पात्र . ओबडधोबड , विचित्र भाषेत बोलणाऱ्या आणि मजेशीर अशा या मिनियंसना न भुतो न भविष्यति अशी लोकप्रियता लाभली . २०१२ साली आलेल्या 'डेस्पिकेबल मी-२' ला पण बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली . तर या मिनियंसनाच मुख्य पात्र बनवून चित्रपट काढला तर तो किती लोकप्रिय होईल या  कल्पनेतुन  'मिनियंस' हा चित्रपट बनवण्यात आला . आपल्याकडेपण हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे .

चित्रपटाची पहिली पंधरा मिनिट अक्षरशः भन्नाट आहेत . मिनियंस प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहेत या कल्पनेभोवती हि पहिली पंधरा मिनिट गुंफली आहेत . सतत  सेवा करण्यासाठी एखादा मालक असण ही या मिनियंसची एक मुलभूत गरज असते .या मिनियंसनी डायनॉसॉरपासून ते नेपोलियनपर्यंत अनेक मालकांची    केलेली सेवा मस्त विनोदी ढंगात दाखवली आहे . एक वेळ अशी येते की या या मिनियंसनीना कुणी मालकच उरत नाही . आयुष्याचा  मुलभूत उद्देशच नसल्याने हे  मिनियंस सैरभैर होतात. मग केव्हिन , बॉब आणि स्टुअर्ट हे तीन या मिनियंस नवीन मालकाच्या शोधात बाहेर पडतात . नवीन मालकाच्या शोधाच्या प्रवासात त्यांची गाठ स्कारलेट ओवरकिल (पडद्यामागचा आवाज -सांड्रा बुलक ) ह्या खलनायिकेशी पडते .पुर्ण जगावर राज्य करण्याची तिची महत्वाकांक्षा असते . तिचे सहाय्यक म्हणुन काम करत असतानाच असा काही घटनाक्रम घडत जातो की जगाला आणि मनुष्यजातीला वाचवायची जबाबदारी या निरागस मिनियंसवर येउन पडते .

दुर्दैवाने 'डेस्पिकेबल मी' चित्रपटमालिकेत सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना भावुन जाणारे  मिनियंस इथे फक्त  लहान मुलांना भावतात . बाकी वयोगटातल्या प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता आहे . चित्रपट वाईट नाही . नक्कीच मनोरंजक आहे पण त्याच्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या त्यांना तो पूरक ठरत नाही . कधीकधी ताटातली एखादी चटणी किंवा लोणच एवढ स्वादिष्ट असत की ताटातली भाजी सोडून आपण त्यावरच ताव मारतो . पण दुसऱ्या दिवशी  ताटात फक्त ती चटणीच मेन डिश म्हणुन आली असली की ती आवडत नाही . अगदी तसच 'डेस्पिकेबल मी' चित्रपटमालिकेत सर्वाना आवडलेले मिनियंस इथे मुख्य पात्र म्हणून फारसे गळी उतरत नाही . चित्रपटाची कथा पण फारशी पकड घेणारी नाही . चित्रपटात काही चांगले ट्विस्ट आहेत . थ्री डी मध्ये चित्रपट बघायला अजून मजा येते .

कुठल्याही पात्रासाठी  दिग्दर्शक कुणाचा आवाज निवडतो याला  अॅनिमेशन चित्रपटात खुप महत्व असते . दिग्दर्शक जोडगोळी काईल बाल्डा आणि पियरे कॉफिन यांनी अर्धी लढाई इथेच जिंकली आहे . सांड्रा बुलक, बर्डमॅन फेम मायकेल कीटन , जॉन हेम या कलाकारांची निवड पडद्यावरच्या पात्रांना आवाज देण्यासाठी करून त्यांनी बाजी मारली आहे .

चित्रपटाची सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे खलनायिका स्कारलेट ओवरकिलच पात्र . 'डेस्पिकेबल मी' चित्रपटमालिकेत 'ग्रु ' या सुपरविलनच पात्र  प्रेक्षकांच्या मनावर ठसल होत .  स्कारलेट ओवरकिलच पात्र या आघाडीवर कमी पडत . स्वतंत्र कलाकृती म्हणुन हा चित्रपट चांगला असला तरी 'डेस्पिकेबल मी' चित्रपटमालिकेशी होणारी तुलना या चित्रपटाला मारक ठरणार आहे . हा चित्रपट समजण्यासाठी 'डेस्पिकेबल मी'  चित्रपट पाहणे आवश्यक नाही हि एक चांगली गोष्ट . थोड्याफार प्रमाणात हा चित्रपट या चित्रपटमालिकेचा 'प्रीक्वल ' आहे असे म्हंटले तरी हरकत नाही .

थोडक्यात काय तर ,घरात लहान मुल असतील आणि त्यांना खळखळून हसताना पहायचे असेल त्यांना नक्की चित्रपट बघायला घेऊन जा . पण तुम्ही 'डेस्पिकेबल मी' चित्रपटमालिकेचे आणि मिनियंसचे चाहते  आहात म्हणून चित्रपट बघायला जाणार असाल तर पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे .

http://epaper.mimarathilive.com/epapermain.aspx?pgno=6&eddate=2015-7-12&edcode=820009


No comments:

Post a Comment