Saturday, 11 July 2015

मेक इन इंडियाच' बॉलीवुडी प्रारूप

                                          


पंतप्रधान मोदी यांनी 'मेक इन इंडिया ' अभियानाची घोषणा केल्यानंतर देशभरात त्यावर चर्चा आणि प्रतिचर्चा सुरु झाल्या . पण पंतप्रधानांच्या आवाहनाला एका अनपेक्षित ठिकाणाहून त्वरित प्रतिसाद मिळाला आहे . बॉलीवुडकडून. या आठवड्यात प्रदर्शित झालेला विधू विनोद चोप्रा या दिग्गज भारतीय निर्माता दिग्दर्शकाचा"ब्रोकन हॉर्सेस‘ हा चित्रपट मोदी यांच्या मेक इन इंडिया 'च बॉलीवुडी प्रारूपच आहे. म्हणजे प्री-प्रोडक्शन , पोस्ट प्रोडक्शन, मार्केटिंग वैगेरे सगळ्या गोष्टी भारतात आणि भारतीय टीम नी केल्या आहेत . आणि आता हा चित्रपट हॉलिवुड चा गड सर करायला निघाला आहे . वास्तविक पाहता ही घटना ऐतिहासिकच म्हणावी लागेल . अगदी टाटांनी 'जागुवार ' कंपनी टेक ओव्हर केल्यासारखीच . पण दुर्दैवाने मराठी माध्यमांमध्ये याचा फारसा गवगवा झाल्याचा दिसत नाही .

१९८९ साली प्रदर्शित झालेला विधू विनोद चोप्रा यांचा 'परिंदा ' हा चित्रपट अनेक अर्थानी मैलाचा दगड मानला जातो .  पु .ल . देशपांडे यांच्या भाषेत कोसलाने मराठी सारस्वतांना डुलक्या घेताना पकडले अगदी त्याचप्रमाणे बालिश प्रेमकथा आणि निरर्थक मसालापट यांच्या विळख्यात अडकलेल्या बॉलीवुडला परिंदाने गदागदा हलवून झोपेतून उठवले . मुंबई अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर बदलणारे दोन भावांचे नातेसंबंध अतिशय अप्रतिमपणे रेखाटलेल्या या चित्रपटाला कालांतराने कल्टचा दर्जा मिळाला . सध्या बॉलीवुडमधल्या  न्यू एज सिनेमा चळवळीच नेतृत्व करणाऱ्या अनुराग कश्यपला पण त्या काळी  या चित्रपटाने प्रेरणा दिली होती . तर हॉलिवुड मध्ये पदार्पण करण्यासाठी विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या या चित्रपटाच्याच कथेची निवड केली  आहे . परिंदाच्याच कथेत काही फेरफार  करून तयार झालेल्या कथेवर ब्रोकन हॉर्सेस हा चित्रपट तयार झाला आहे . परिंदामधल्या मुंबई अंडरवर्ल्डची जागा इथे अमेरिका आणि मेक्सिको सीमेवरील टोळी युद्धाने घेतली आहे . याच अस्थिर सीमेवरील एका खेड्यात बडी आणि  जेकी  हे भाऊ आपल्या प्रामाणिक पोलिस अधिकारी असणाऱ्या वडिलांसोबत राहत असतात . दोन्ही भावंडांच एकमेकावर खूप प्रेम असत . एका दिवशी बडी च्या डोळ्यासमोरच त्याच्या वडिलांची निर्घुण हत्या होते .  स्थानिक गुंड  हेंच (विन्सेंट ओनोफ्रियो ) किशोरवयीन बडीच्या मनातल्या सुडाच्या भावनेचा कौशल्याने वापर करून त्याला आपल्या टोळीत सामील करून घेतो . बडी आपल्या लहान भावाला जेकीला संगीत शिक्षणासाठी न्युयॉर्कला पाठवतो . १५ वर्ष उलटतात . मोठा झालेला जेकी (अंतोन येलचेन )आता व्यवसायिक संगीतकार झाला आहे  आणि विट्टोरिया(मारीया वाल्वेर्दे) या आपल्या प्रेयसीशी विवाहबद्ध होणार आहे . लग्नापूर्वी मोठा भाऊ बडी  (ख्रिस मार्क्वेट्ट) याला भेटावे आणि जमल तर त्याला आपल्यासोबत न्युयॉर्क ला घेऊन यावे यासाठी  जेकी आपल्या खेड्याला अनेक वर्षांनी भेट देतो . पण आता सगळच बदलल आहे याची त्याला जाणीव होते . बडी हा हेंचच्या  प्रभावामुळे  गुन्हेगारी जगाच्या दलदलीमध्ये गळ्यापर्यंत रुतला  आहे . हेंच हा बडीसाठी फादर फिगर बनला असून तो त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची शक्यता सुतराम नाही . अशा विषम परिस्थितीत जेकी आपल्या मोठ्या भावाला या गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एक अनपेक्षित आणि धाडसी निर्णय घेतो . काय असतो तो निर्णय ? या निर्णयाचे पडसाद दोन्ही भावंडांच्या जीवनावर कसे उमटतात ? या प्रश्नांची कहाणी म्हणजे ब्रोकन हॉर्सेस. 

विधू विनोद चोप्रा यांचा हा महत्वकांक्षी प्रयत्न स्तुत्य आहे . पण चित्रपट मनाची पकड घेत नाही . अनेकदा मध्येच रेंगाळतो . आपल्याच कथेचा 'रिमेक' करून चोप्रा यांनी चुक केली आहे का अशीही शंका वाटायला लागते. भारतात तरी प्रेक्षक या चित्रपटाची परिंदाशी तुलना करणार हे स्वाभाविकच आहे. आणि परिंदाच्या फुटपट्टीने मोजायचे तर ब्रोकन हॉर्सेस हा फारसा प्रभावी नाही हे मान्य करावे लागेल . पाश्चात्य प्रेक्षकांच्या चष्म्यातून पाहिलं तर भावनांनी थबथबलेले भावांमधले नातेसंबंध त्यांना किती मानवतील याबद्दल पण शंकाच आहेत . नात्याचं चित्रण करताना चोप्रा आपल्यातला 'भारतीय ' बाजूला ठेवू शकले नाहीत असे विधान केले तरी ते वावगे ठरू नये . पण चित्रपटात सगळ्याच उण्या बाजू आहेत असेही नाही . चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे . लॉंग शॉटस चा सढळ वापर करून उजाड भूभागाची अमेरिका मेक्सिको सीमारेषा सुंदर पणे पडद्यावर उभारली आहे . बडी च्या भूमिकेतल्या ख्रिस मार्क्वेट्टने  भाबडा , चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा  आणि सतत फादर फिगरच्या शोधात असणारा मोठा भाऊ छान साकारला आहे . पण खलनायकाच्या भूमिकेतला विन्सेंट ओनोफ्रियो परिंदा मधल्या नाना पाटेकरने साकारलेल्या  सनकी , येडचाप आणि आगीला प्रचंड घाबरणाऱ्या अण्णाच्या तुलनेत खूपच कमी पडला आहे .

निर्माता म्हणून थ्री इडियट्स', मुन्नाभाई चित्रपटमालिका  असे एकाहून एक हिट चित्रपट देणारे विधू विनोद चोप्रा दिग्दर्शक म्हणून आपला 'गोल्डन टच 'हरवून बसले आहेत .ब्रोकन हॉर्सेस तिकीटबारीवर चालण निर्माता चोप्रांपेक्षा दिग्दर्शक चोप्रांसाठी जास्त आवश्यक आहे .अशावेळेस एखादी 'सेफ बेट ' खेळण्यापेक्षा डायरेक्ट हॉलिवुड मध्ये उडी मारणे हा चोप्रांनी मांडलेला मोठा जुगार आहे . त्याला यश येवो ना येवो पण चोप्रांना त्यासाठी पुरेपूर गुण द्यावे लागतील . चित्रपट हे भावनांवर चालत नाहीत पण बॉलीवुडचा झेंडा हॉलिवुड वर लावण्यासाठी 'सुलतानढवा' करणाऱ्या चोप्रा यांच्यासाठी सगळ्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून एकदा तरी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहावा .

http://216.15.199.42/mimarathi/story.aspx?id=672&boxid=9251217&ed_date=2015-4-12&ed_code=820009&ed_page=10

No comments:

Post a Comment