Saturday, 11 July 2015

सुपरहिरोंच 'धुमशान '

लोकांना सुपरहिरो का आवडतात ? काही मानसशास्त्रज्ञांच्या मते , सर्वसामान्य वाचक किंवा प्रेक्षक कुठेतरी  अफाट शक्ती असणाऱ्या पण कुठलीतरी 'कमजोरी ' असणाऱ्या किंवा कुठलातरी हळवा कप्पा  असणाऱ्या सुपरहिरो च्या 'आल्टर ईगो' मध्ये कुठेतरी स्वतःला पाहात असतात . म्हणजे अचाट शक्ती असणारा  सुपरमॅन जेंव्हा वर्तमानपत्रात  वेंधळा मिस्टर केंट बनून धडपडत असतो तेंव्हा ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या  बहुतेक प्रेक्षकवर्ग त्या मिस्टर केंट मध्ये   स्वतःला बघायला लागतो . स्पायडरमॅन बनून अचाट करामती करणारा पीटर पार्कर जेंव्हा प्रेम , करियर अशा सर्व आघाड्यांवर चाचपडताना दिसतो तेंव्हा प्रेक्षकांना त्याच्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसायला लागते . एकदम सुपरहिरो नसला तरी पडद्यावर तशीच अचाट कृत्य करणारा सत्तर च्या दशकातला अन्यायी 'सिस्टीम ' च्या विरुद्ध उभा राहणारा  अमिताभ बच्चन च्या भुतो न भविष्यति लोकप्रियतेची बीज पण या प्रेक्षकांच्या मनोस्थितीत सापडतात .

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला  या चित्रपटमालिकेतला 'द अवेंजर्स'  हा चित्रपट आपल्याकडे पण भरपूर चालला होता . दुसऱ्या आकाशगंगेतून पृथ्वीवर झालेला प्राणघातक हल्ला परतवून लावण्याच्या सामायिक उद्देशाने एकत्र आलेला  पण अतिशय परस्परविरुद्ध  स्वभाव असणाऱ्या सुपरहिरोंचा समूह म्हणजे अवेंजर्स. यातली मुख्य पात्र टोनी स्टार्क उर्फ आयर्नमॅन , हल्क आणि कॅप्टन अमेरिका अगोदरच खुप लोकप्रिय होती . या सगळ्या पात्रांना मोठ्या पडद्यावर एकत्र आणण आणि त्या सर्व पात्रांना न्याय देण हि एक मोठी रिस्क होती .
पण दिग्दर्शक जॉस व्हेडनने हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या उचलले.  या आठवड्यात प्रदर्शित झालेला चित्रपटमालिकेतला  पुढचा चित्रपट ' अवेंजर्स : एज ऑफ अल्‍ट्रॉन' हा चित्रपट  पण चित्रपट रसिकांची निराशा करत नाही .

मागच्या चित्रपटात या अवेंजर्सनी दुसऱ्या ग्रहावरून झालेला हल्ला परतवून लावला होता . आता या भागात त्यांना आवाहन आहे ते  अल्‍ट्रॉन नावाच्या आर्टिफिशल इंटेलीजेंसकडून. चित्रपटाची सुरुवातच एका भन्नाट अॅक्शन सीन ने होते आणि प्रेक्षक खुर्चीत सरसावून बसतो . या सीनमध्ये टोनी स्टार्क उर्फ आयर्नमॅन (रॉबर्ट डाउनी ज्युनियर ), थॉर (क्रिस हेम्सवर्थ), कॅप्टन अमेरिका (ख्रिस  इवान्स), हॉकआय (जेरेमी रेनर), हल्क (मार्क रूफोलो) आणि नताशा रोमोनोफ (स्कारलेट जॉन्सन ) एका अभियानामध्ये जोरदार कारवाई करून एका गुन्हेगारी टोळीचा अड्डा उध्वस्त करतात .  या कारवाईत त्यांच्या हाती  काही अनोळखी हत्यार आणि रोबोट सोल्जर्स चे आराखडे लागतात . टोनी स्टार्क याचा वापर पृथ्वीला कुठल्याही धोक्यापासून वाचवणाऱ्या
आर्टिफिशल इंटेलीजेंस शांती सेना तयार करण्यासाठी करण्याचा बेत आखतो . अर्थातच आपल्या इतर साथीदारांना अंधारात ठेवून. पण त्याचा बेत उलटतो . अल्‍ट्रॉन हा आर्टिफिशल इंटेलीजेंस  या तत्वावर काम करत असतो की ज्याने आपल्याला अस्तित्व दिल आहे त्याचच अस्तित्व नष्ट करायचं . मग हा अल्‍ट्रॉन आपल्या रोबोट सेनेसह अवेंजर्सच्या मागे हात धुवून लागतो . त्यानंतर त्याच उद्दिष्ट असत ते मानवजातीला नष्ट करून पृथ्वीवर मशिनी युग सुरु करण्याच . आता मानवजातीला पुन्हा वाचवण्याची जबाबदारी येउन पडते ती अवेंजर्सवर . या कामगिरीत त्यांना साथ मिळते ती क्विकसिल्वर (एरन टेलर) और स्कारलेट विच (एलिजाबेथ ओल्सन) या जुळ्या सुपरहिरोंची.

बहुतेक सुपरहिरो चित्रपटांचा मोठा तोटा असा असतो की त्याचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना अगोदरच अंदाजाने माहित असते . या चित्रपटामध्ये पण अवेंजर्स शेवटी आपल्या कामगिरीत यशस्वी होणार हे प्रेक्षकांना माहित असत . पण हा ओळखीचा प्रवास रसपूर्ण बनवण्याची मोठी जबाबदारी येउन पडते दिग्दर्शकावर . दिग्दर्शक जॉस व्हेडन यात पूर्णपणे यशस्वी झाला आहे . चित्रपटाच्या एकदम पहिल्या सीन मध्ये अवेंजर्स धडक कारवाई करत असताना थोर , टोनी स्टार्क , हल्क  आणि इतर सुपरहिरो खलनायकांची धुलाई करत असतानाचा सीन एकाच  शॉट मध्ये घेताना जॉस व्हेडनने जे टेकिंग घेतलं आहे ते निव्वळ अफलातून या श्रेणीत आहे . चित्रपटात टोनी स्टार्कचे पेटंट टाळ्यावसूल आणि भावखाऊ 'वन लाइनर्स' आहेतच . पण हा चित्रपट म्हणजे फक्त नेत्रदीपक विजुअल इफेक्ट्स आणि हाणामारी नाही . अनपेक्षित धक्का देत दिग्दर्शकाने हल्क आणि नताशा रोमोनोफ यांच्यात एक हळुवार आणि बहुतेक वेळ 'अव्यक्त ' राहणारी प्रेमकथा फुलवली आहे . हे अनपेक्षित वळण या चित्रपट मालिकेला अजून रोमांचकारी बनवत .

पात्र म्हणून अतिशय स्वकेंद्रित दाखवलेल्या टोनी स्टार्कच्या भूमिकेत रॉबर्ट डाउनी ज्युनियरने कहर केला आहे . इतके सगळे सुपरहिरो असताना पण आपण इतरांपेक्षा इंचभर का होईना सरस आहोत हे दाखवायची एक पण संधी तो सोडत नाही . त्याच्याखालोखाल क्रमांक लागतो तो हल्क च्या भूमिकेतल्या मार्क रूफोलोचा . नको असताना सुपरहिरोपणाच लोढण गळ्यात पडलेल्या हल्कची मानसिक कुतरओढ त्याने चांगली दाखवली आहे . बाकीच्या कलाकारांनीपण भुमिका चोख बजावल्या आहेत .

फास्ट अॅंड फ्युरियस 7 चित्रपटाने गल्लाबारीवर १०० कोटीच्या वर गल्ला जमा केला . इतकेच नव्हे तर यशराज सारख्या मोठ्या निर्मितीसंस्थेचा चित्रपट 'डिटेक्टिव व्योमकेश बक्षी ' सारख्या स्टार चित्रपटाचे आवाहन मोडून काढले . भारतीय प्रेक्षकांमध्ये असणारी चित्रपट मालिकेची क्रेझ बघता   अवेंजर्स : एज ऑफ अल्‍ट्रॉन' हा चित्रपट त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार हे उघड आहे . प्रेक्षकांच्या आवडी निवडीचा मनु याच वेगाने बदलत राहिला तर अजून काही वर्षांनी 'प्राईम टाइम' मध्ये हिंदी चित्रपटासाठी राखीव शो ठेवण्याची वेळ आली तरी फारस आश्चर्य वाटू नये .


http://216.15.199.42/mimarathi/epapermain.aspx?pgno=6&eddate=2015-04-26&edcode=820009

No comments:

Post a Comment