Sunday, 12 July 2015

साचे मोडणारा हेरपट"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हाच होते. वर केनेडी यांनी  म्हणल्याप्रमाणे, त्यांच्या  यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. मात्र हॉलिवुड चित्रपटांच्या कृपेने या व्यवसायालापण चांगलीच लोकप्रियता लाभली आहे . जेम्स बॉन्डच्या  चित्रपटाना मिळालेल्या घवघवीत यशामुळे नंतर जेसन बोर्न चित्रपटत्रयी , छोट्या आणि मोठ्या पडद्यावर गाजलेले  शेरलॉक होम्स असे अनेक गुप्तहेर कथानकाच्या केंद्रबिंदू  असणाऱ्या कलाकृती तयार झाल्या  . ह्या चित्रपटाना चांगलाच लोकाश्रय मिळाला  . मात्र एकाच विषयावर अनेक कलाकृती तयार होण्याचे काही साईड इफेक्ट्स असतात . सगळ्यात महत्वाचा साईड इफेक्ट्स म्हणजे  गुप्तहेरांची  काही हास्यास्पद 'सरसकटिकरण ' (Generalizations ) तयार झाली .   हॉलिवुडमध्ये असले हास्यास्पद 'सरसकटिकरण ' प्रमाण मानुन त्यांची खिल्ली उडवणारे  'पॅरोडी मुवीज ' अतिशय लोकप्रिय आहेत.  उदाहरणार्थ  हॉरर चित्रपट    आणि  त्यांच्यात   अनुपस्थित असणाऱ्या  तर्क -कार्यकारण भावाच्या अभावाची खिल्ली उडवणारी  'स्क्रीम ' हि चित्रपटमालिका.  जेम्स बॉन्ड या पात्राचे  'स्टिरियोटाईप' वापरून तयार  केलेला 'जॉनी इंग्लिश ' हा चित्रपट याचे अजून एक उदाहरण . या प्रकारच्या चित्रपटाला एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग असतो आणि कला माध्यमाच्या दृष्टीने विचार केला असता हे चित्रपट फारसे 'महत्वाकांक्षी ' मानले  जात नाहीत . मात्र या आठवड्यात प्रदर्शित झालेला  'स्पाय ' हा विनोदी हेरपट  या नियमाला अपवाद ठरण्याचा जोरदार प्रयत्न करतो  .

प्रत्येक संस्थेत किंवा कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते .  प्रत्यक्ष 'फिल्ड ' मध्ये काम करणारे  आणि 'डेस्क ' वर काम करणारे म्हणजे पडद्यामागचे कलाकार  , हे ते दोन प्रकार . पण संस्थेच्या यशाचे श्रेय सामान्यतः पडद्यावरच्या कलाकारांना म्हणजेच 'फिल्ड ' वर काम करणाऱ्या लोकांना मिळते . भरीव योगदान देऊन पण  'डेस्क ' वर काम करणारे लोक दुर्लक्षितच राहतात . या वैश्विक नियमाला अपवाद नाहीतच . मग ते वर्तमानपत्राचे ऑफिस असो , आय टी असो वा जगद्विख्यात गुप्तहेर संघटना सीआयए  असो . सीआयएमध्ये  विश्लेषक म्हणुन काम करणारी सुझान कुपर (मेलिसा मेकार्थी) ही नेहमीच आपल्या कामात पुरेपूर योगदान देत असते . पण तिच्या या कामाचे श्रेय मात्र नेहमीच ब्राडली फाईन (ज्यूड लॉ) हा 'फिल्ड सिक्रेट एजंट घेऊन जात असतो . मात्र फाईनला सुझानच्या या योगदानाची पुर्ण जाणीव आहे . सुझानच मन या रांगड्या फाईनवर  जडल आहे . मात्र विध्वंसकारी अण्वस्त्र माफियांच्या हाती पडू नये म्हणून जीवाचा धोका पत्करणारा फाईन या मोहिमेत रायनाच्या (रोझ बायरन )  हातुन मारला जातो . दरम्यान असेही लक्षात येते  की  सीआयएच्या  सगळ्या फिल्ड एजंटची नाव रायनाला कळली आहेत . म्हणुन अनुभवी  एजंट न पाठवता असा एखादा नवीन माणुस या  प्रकरणाची तड  लावण्यासाठी पाठवणे भाग असते ज्याला शत्रू ओळखत नाही . म्हणुन या मोहिमेसाठी सुझानची निवड होते . सिक्रेट एजंटचे जे जे म्हणुन काही 'स्टिरियोटाईप ' असतात,  त्यात सुझान कुठेच फिट बसत नाही . सुझान आत्मविश्वास नसणारी , वेंधळी , स्थुल , अनाकर्षक अशी चाळीस वर्षीय महिला आहे . मात्र तिची सहकारी आणि मैत्रीण नान्सी (मिरांडा हार्ट ) तिला धीर देते . पण तिचा अजुन एक सतत बढाया मारणारा आणि आपले फिल्ड वरचे किस्से रंगवुन सांगणारा बोलभांड सहकारी  रिक फोर्ड (जेसन स्टेथम) याचा सुझानला या मोहिमेवर पाठवायला विरोध असतो . सुझानला फिल्डवर सिक्रेट एजंट पाठवायच्या निर्णय कसा चुकीचा आहे हे ठासुन सांगुन तो नौकरी सोडतो आणि एकटाच कामगिरी बजावायचा निश्चय करून निघुन जातो . सुझान कामगिरीवर पॅरीस , रोम , बल्गेरिया असे देश पालथे घालत निघते . तिच्या या यशस्वी कामगिरीची नर्मविनोदी कथा म्हणजे 'स्पाय '.

दिग्दर्शक पॉल फिगच सगळ्यात मोठ यश म्हणजे चित्रपटात  'पॅरोडी मुवीजचे अनेक नियम वापरून जरी व्यक्तिरेखा उभ्या केल्या असल्या तरी उत्तरार्धात त्या व्यक्तिरेखांना स्वतःचा असा एक रंग प्राप्त होतो . उदाहरणार्थ ज्यूड लॉ ने साकारलेल्या व्यक्तिरेखेवर जेम्स बॉन्डचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे मात्र नंतर त्या व्यक्तिरेखेला स्वतःचा असा एक साचा मिळतो .  हीच  गोष्ट  सगळ्या व्यक्तिरेखांना लागू पडते . त्यामुळेच वर उल्लेख केल्याप्रमाणे हा एक 'महत्वाकांक्षी ' आणि हेरपटाना एक वेगळे वळण देणारा ट्रेंड सेटर चित्रपट ठरू शकतो . सुझान खलनायकाचा रोमच्या रस्त्यावरून  पाठलाग करते  तो प्रसंग अफलातून आहे . उत्तरार्धात प्रेक्षकाला आश्चर्यचकित  करणारे  अनपेक्षित असे धक्के आहेत . अभिनय ही चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजु आहे . सुझानच्या भुमिकेत मेलिसा मेकार्थीने सुंदर रंग भरले आहेत . पण खरी कमाल केली आहे ती तिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत असणाऱ्या मिरांडा हार्टने . सुझान वर घारीसारख लक्ष ठेऊन असणारी भोळी भाबडी मैत्रीण तिने विनोदाचे रंग भरत अफलातून साकारली आहे . पडद्यावरील गुप्तहेराचे सगळे स्टिरियोटाईप मुर्तिमंत असणारा  पण फिल्डवर  नाकाम असणाऱ्या रिकी फोर्डची भुमिका जेसन स्टेथमने मस्त केली आहे . सध्याचा आघाडीचा अॅक्शन हिरो असणाऱ्या जेसनने  स्वतःची खिल्ली उडवणारी आणि मध्यवर्ती नसणारी भुमिका करणे हे दाद देण्यासारखे आहे . चित्रपट संथगतीने सुरु होतो . मात्र नंतर घटनाक्रम वेग पकडायला लागतो आणि प्रेक्षक पडद्यावरच्या कथानकात गुंतुन जातो .

जेम्स बॉन्डच्या  चित्रपटानी हेरपट या 'जॉनर' वर एक स्वतःचा न पुसता येणारा ठसा उमटवला आहे . हा प्रभाव अनेक दिग्दर्शकांना टाळता येत नाही . 'स्पाय ' चित्रपटाकडून सुरुवातीला फारशा अपेक्षा त्यामुळे कुणाला नव्हत्या . मात्र अनपेक्षित सादरीकरणामुळे चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही पसंतीची पावती मिळाली आहे . कथेच्या 'ट्रीटमेंट' च्या दृष्टीने हा चित्रपट ट्रेंड सेटर  आहे असे म्हंटले तरी चालेल .  हेरपट आवडत असतील तर जवळच्या चित्रपटगृहात जाउन हा चित्रपट नक्की बघा . अगदी जेम्स बॉन्डचे चाहते असाल तरी .

http://epaper.mimarathilive.com/epapermain.aspx?pgno=6&eddate=2015-06-21&edcode=820009No comments:

Post a Comment