Sunday, 16 August 2015

बालक आणि पालक यांना सांधणारा पूल


                                 
             
                                                                     
……… मी आणि बाबा दोघेही  टॉम& जेरीचे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा  टॉमच्या बाजूने  तर मी जेरीच्या बाजूचा . नेहमी शेवटी जेरीच जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या टॉमची बाजू घेता ?" एकदम हसणाऱ्या  बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टॉम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टॉमची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा टॉम नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरीच दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणाऱ्या  सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

या आठवड्यात आलेला 'शॉन द शीप ' या  अॅनिमेशन चित्रपटाच्या   टॅगलाइनमध्ये 'केवळ लहान मुलंच नव्हे तर मोठ्यांनापण  भावेल असा चित्रपट ' असं चित्रपटाच वर्णन केल आहे . जेंव्हा मी चित्रपट बघायला गेलो  तेंव्हा अख्ख्या थेटरात मी एकटा असा होतो जो कुठल्या मुलासोबत नव्हतो (किंवा असा एकटा मुलगा होतो जो माझ्या वडिलांसोबत नव्हतो ). 'शॉन द शीप ' नी आपली टॅगलाइन सार्थ ठरवली आणि पुढचे दोन तास प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना निखळ आनंद दिला .

'शॉन द शीप '  ही टेलीविजनवरची गाजलेली कार्टुनमालिका आहे . आपल्या देशातल्यापण मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलांमध्ये 'शॉन द शीप '  प्रसिध्द आहे . पण टिवीवर गाजलेल्या मालिकेला मोठ्या पडद्यावर आणणे बऱ्याचवेळा 'ट्रिकी ' ठरत . 'सिम्पसन्स ' या अजून अशाच एका गाजलेल्या  अॅनिमेशन मालिकेला मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी गंडला होता . आपल्याकडे 'खिचडी' या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेसोबत पण असा फसलेला प्रयोग झाला होता . टीवीवर अर्ध्या तासात जी धमाल करता येते ती मोठ्या पडद्याच्या कालविस्तारित आवृतीत कुठेतरी हरवून जातो असा अनुभव आहे . पण आश्चर्यकारकरीत्या 'शॉन द शीप ' या नियमाला अपवाद ठरते . त्यासाठी मार्क बर्टन आणि रिचर्ड स्तार्झक या लेखक -दिग्दर्शन जोडगोळीला पैकीच्या पैकी मार्क .

शॉन हा मेंढा शहराच्याबाहेर असणाऱ्या एका फार्मवर आपल्या मित्रांसोबत आणि शेतकरी मालकासोबत उनाड आयुष्य जगत असतो . हा शॉन थोडा 'थ्री इडियटस ' मधल्या रांचोसारखा. इतरांपेक्षा नेहमी हटके सोच असणारा . आणि ह्या 'सोच' पायी कायम कुठल्यातरी   त्रांगड्यात अडकुन पडणारा . असच एके दिवशी आयुष्यातल्या अतीनिवांत आयुष्याला कंटाळलेला शॉन मालकाचा डोळा चुकवून फार्मच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो . हा प्रयत्न त्याला आणि त्याच्या साथीदारांना शहरात नेउन सोडतो . शहरात त्यांची मोठी तारांबळ उडते . ह्या शहराच पाणी आपल्याला मानवणार नाही हे त्यांच्या लक्षात येते आणि 'गड्या आपुला गाव बरा ' म्हणून पुन्हा फार्मवर जाण्याची त्यांची धडपड सुरु होते . शहर ते फार्म हा त्यांचा प्रवास म्हणजे 'शॉन द शीप 'ची कहाणी .


चित्रपटात एकही संवाद नाही . इथली कॉमेडी ही 'सिच्युएशनल' आहे . छोट्या छोट्या प्रसंगातुन  दिग्दर्शकाने ती छान फुलवली आहे . शॉन आणि त्याचे सहकारी वेगवेगळी वेषांतर (disguise ) करून शहरातील लोकांमध्ये विरघळून जाण्याचा प्रयत्न करतात ते प्रसंग खुप हसवणारे आहेत . विशेषतः ते एका पॉश हॉटेलमध्ये जातात तो प्रसंग तर खुपच मनोरंजक आहे .

चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचा वेगळा उल्लेख करायला हवा . चित्रपटात संवाद नसले तरी हे पार्श्वसंगीत त्या त्या प्रसंगाचा 'टोन ' सेट करते . यात संगीत दिग्दर्शक ईलान ईश्केरीने धमाल केली आहे . अमेरिकन कंट्री म्युझिक पासुन ते बेथोवनच्या भव्य 'सिम्फनी ' पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा वापर त्याने पार्श्वसंगीतात केला आहे . संकलन , अॅनिमेशन, छायाचित्रण या इतर तांत्रिक बाजु पण भक्कम .

कार्टून्स लहान मुलांना आवडतात पण ते पालकांसाठीपण महत्वाचे असतात . आपल्या मुलाशी जोडणारे कार्टून्स  किंवा अॅनिमेशनपट हे पूल  असतात . पण ही एक संधीपण असते . सर्व विवंचना विसरून पुन्हा बालपणात जायची . 'शॉन द शीप ' सारखे अॅनिमेशनपट ही थोड्या वेळाकरता का होईना मुल बनण्याची संधी आपल्याला देतात . हेच त्यांच यश .   कार्टून्स  किंवा अॅनिमेशनपट पाहणे हा 'पोरवडा ' आहे असे गैरसमज ज्या समाजात आहे त्या  समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे  . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .आपल्या छकुला किंवा छकुलीला सोबत घेऊन मनमुराद हसायचे असेल आणि पुन्हा थोड्या वेळाकरता पुन्हा मुल व्हायचे असेल जवळच्या थियेटर मध्ये 'शॉन द शीप ' नक्की बघा .


No comments:

Post a Comment