Monday, 24 August 2015


                                                    फसलेलं 'रीबूट '

बिमल रॉय  यांच्या दिलीप कुमार अभिनित 'देवदास' मध्ये देवदासच्या वडिलांचा त्याच्या पारोशी असणाऱ्या प्रेमप्रकरणाला आर्थिक आणि तात्कालीन सामाजीक कारणांमुळे जबरदस्त विरोध असतो .   संजय लीला भंसाळीच्या भव्यदिव्य 'देवदास' मध्ये देवदासचा बाप हे पात्र पडद्यावर असून नसल्यासारखे होते. तिथे बायकांची (देवदासची आई , वहिनी , पारोची आई ) पारिवारिक राजकारण 'सेंटर स्टेज' ला होती . अनुराग कश्यपच्या रांगड्या आणि 'रॉ' देवदासमध्ये त्याचा बाप पारोच्या लग्नाच्या मांडवातच व्हिस्कीचे घोट घेत आपल्या कमनशिबी पोराला सांगतो की हि पारो मला आपल्या घराची सुन म्हणून हवी होती पण तु तुझ्या बावळटपणाने तिला गमावून बसलास . आपण आयुष्यात काहीतरी मोलाचं हरवून बसलो आहोत हि जाणीव देवदासला तिथे होते आणि त्याच्या अधोगतीलापण तिथेच सुरु होते . एकचं पात्र . पण दिग्दर्शक वेगळा असल्याने एकाच पात्राचे वेगवेगळे साचे बनतात . आपल्याकडे चित्रपट (दुर्दैवाने) नायकांच्या नावाने ओळखले जात असले तरी त्यावर दिग्दर्शकाचीच मोहोर उमटलेली असते . त्यामुळे जेंव्हा एखाद्या चित्रपटाचा रिमेक बनतो किंवा एखादी चित्रपटमालिका 'रीबूट ' होते तेंव्हा दिग्दर्शक हा त्या 'ट्रान्झिशन' मधला सर्वात कळीचा मुद्दा ठरतो .    काही बदल होऊनपण कथानकाची 'आउटलाईन' ढोबळमानाने तीच असते त्यामुळे दिग्दर्शकाच   'इंटरप्रिटेशन' काय आहे यावर त्या 'रिमेक ' किंवा 'रीबूट ' च यशापयश अवलंबून असतं . या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'फॅण्टास्टिक  फोर' नेमका याचं आघाडीवर खुप म्हणजे खुपच कमी पडला आहे . एका लोकप्रिय फ्रेन्चायजीला न्याय देण्यात दिग्दर्शक जोश ट्रॅन्क पुर्णपणे अपयशी ठरला आहे .

यापूर्वी 'फॅण्टास्टिक  फोर' ही चित्रपटमालिका चांगलीच लोकप्रिय होती. त्यामुळे जेंव्हा ही चित्रपटमालिका 'रीबूट ' होणार अशी बातमी आली तेंव्हा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा होत्या . पण जेंव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा सगळ्यांनाच धक्का बसला . त्याला मिळालेल्या प्रतिसादाची तुलना 'रामगोपाल वर्मा की आग ' किंवा साजीद खानच्या 'हमशकल्स' ला मिळालेल्या प्रतीसादाशीच होईल . समीक्षकांनी त्याचे वाभाडे काढले तर प्रेक्षकांनी झिडकारले . अस सर्वांगीण अपयश 'फॅण्टास्टिक  फोर' ला मिळेल असे कुणालाच वाटले नव्हते . दिग्दर्शकाच महत्व काय असतं हे पुन्हा अधोरेखित झालं . यापुर्वी ख्रिस्तोफर नोलानने आपल्या वेगळ्या  'इंटरप्रिटेशन' ने गाळात गेलेल्या  'बॅटमॅन' चे अतिशय यशस्वी 'रीलॉन्चींग' केलं होत. पण जोश ट्रॅन्कला याबाबतीत आलेल्या अपयशाचे परिणाम दुरगामी झाले आहेत .  या चित्रपटमालिकेतला दुसरा भाग  सुरु होण्याआधीच बहुदा बासनात गुंडाळला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे .

जोश ट्रॅन्कचे वय अवघे एकतीस . त्यामुळे चित्रपटमालिकेला 'तरुण' चेहरा देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे . यापुर्वीच्या  'फॅण्टास्टिक  फोर' चित्रपटमालिकेतली पात्र हि मध्यमवयीन किंवा प्रौढ होती . मात्र जोश ट्रॅन्कने त्याच्या चित्रपटमालिकेत मुख्य पात्र 'टीनएजर्स' दाखवली आहेत . टिपिकल 'नर्ड ' असणाऱ्या  रीडला  (माइल्स टेलर) हा लहानपणापासूनच विज्ञानात खुप गती असते . रीड करत असलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगात त्याला साथ असते ती त्याचा जीवश्च कंठश्च मित्र बेनची (जेमी बेल)  . एकदा एका 'सायन्स फेयर ' मध्ये त्यांनी केलेल्या धमाल वैज्ञानिक प्रयोगाच्या प्रात्यक्षिकामुळे त्यांना 'बॅक्सटर फाउंडेशन ' च्या समांतर अवकाशाशी संबंधीत  महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळते . स्यु (केट मारा),  जॉनी स्टोर्म (मायकेल बी . जॉर्डन) आणि हुशार पण काही वैयक्तिक प्रश्नांची ओझी बाळगणारा व्हिक्टर (टोबी केबेल ) हे रीडच्या टीमचे ईतर सदस्य असतात . ही टीम समांतर अवकाशात जाण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवते. पण अतिउत्साहात त्यांच्या हातुन एक चुक होते आणि या सगळ्यांची आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातात . या बदलांमुळे जगाला मिळतात काही सुपरहिरो आणि हो एक सुपरव्हिलनपण.

 'फॅण्टास्टिक  फोर' चा सगळ्यात मोठा फसलेला भाग म्हणजे सर्व पात्रांची एकमेकांमध्ये असलेली फसलेली किंवा काही ठिकाणी चक्क गैरहजर असणारी 'केमिस्ट्री '. उदाहरणार्थ रीड आणि बेन हे कथेत एकमेकांचे जीवलग मित्र आहेत . पण  पडद्यावर  तसे दिसत किंवा जाणवत नाही . स्यु आणि रीड मध्ये हळूहळू उमलणाऱ्या रोमान्सचा गळा दिग्दर्शकाने पडद्यावरच घोटला आहे . या सगळ्यांच्या नात्यांमधले वेगवेगळे तानेबाने दाखवण्यात दिग्दर्शक पुर्ण अपयशी ठरला आहे . त्यामुळे या 'फॅण्टास्टिक  फोर' मधल्या सदस्यांच एकत्र येण फारच कृत्रिम वाटायला लागतं . चित्रपटात मोठ्या प्रमाणावर किचकट वैज्ञानिक परिभाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे . तो बऱ्याच वेळा प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातो . या किचकट वैज्ञानिक परिभाषेचा शिकार ठरतो तो चित्रपटाचा 'क्लायमॅक्स'. चित्रपटातला सुपरव्हिलन नेमकं काय करत आहे आणि त्याला थांबवण्यासाठी   'फॅण्टास्टिक  फोर' नेमकं काय करत आहेत ह्याचा बोधच प्रेक्षकांना होत नाही . त्यामुळे प्रेक्षक पडद्यावर जे काही चालू आहे त्याच्याशी स्वतःला 'डिसअसोसिएट' करून घ्यायला लागतो . याचा परिणाम एकुणच  फारच मारक ठरतो . चित्रपटातल्या पात्रांची ओळख करून देण्यात आणि त्यांची ओळख प्रस्थापित करण्यात चित्रपटाचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ खर्च होतो. आणि चित्रपटाच्या कथेच्या पुढे सरकण्यासाठी जो 'कॉनफ़्लिक्ट' आवश्यक असतो त्याच्यासाठी फारसा वेळच उरत नाही आणि तो घाईगडबडीने उरकला जातो.
इफेक्ट्स आणि ग्राफिक्सच्या दृष्टीनेपण चित्रपट काही फारसं वेगळ करत नाही .अभिनयाच्या आघाडीवर सगळ्यांनी बऱ्यापैकी काम केली आहेत .

यशाचे अनेक बाप असतात आणि अपयश हे अनाथ असतं हा वाक्प्रचार  फिल्म्सना पण लागू पडतो . पण या चित्रपटाच्या अपयशाचा पिता फक्त  दिग्दर्शक जोश ट्रॅन्कचं आहे  हे उघड आहे . मोठा स्टूडीयो , पाण्यासारखा पैसा , हाताशी असणारी एक प्रस्थापित चित्रपटमालिका इतक्या जमेच्या बाजू असताना पण जोश ट्रॅन्क अपयशी ठरला . 'क्रॉनिकल ' सारखा वेगळा चित्रपट देणारा हाच का तो जोश ट्रॅन्क असा प्रश्न पडतो . या चित्रपटमालिकेच्या पुर्वपुण्याईला भुलुन जर हा चित्रपट बघायला जाणार असाल तर अपेक्षाभंग होण्याची शक्यताच जास्त आहे .

  स्टार - दोन

No comments:

Post a Comment