Sunday, 9 August 2015

अॅक्शनचा येळकोट

                                                   

                                                     
 .


'मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' मधल्या एका प्रसंगात सीआयएचा प्रमुख ब्रिटनच्या पंतप्रधानाशी बोलताना  ईथन हंटच्या लढाऊपणाच आणि शेवटपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीच  कौतुक करताना काही संवाद बोलतो . हे संवाद  चालू असताना टाळ्या शिट्ट्यांचा गजर प्रेक्षक करतात . ही दाद त्या विशिष्ट प्रसंगाला असतेच पण तितकीच ती जवळपास वीस वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या 'मिशन इंपॉसिबल' चित्रपटमालिकेलापण  दिलेली असते  . यापूर्वीचे चित्रपटमालिकेतले जवळपास सर्वच चित्रपट (दुसऱ्या भागाचा अपवाद वगळता ) लोकांना आणि समीक्षकांना भावले होते . एखाद्या चित्रपटमालिकेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट कसा निवडायचा किंवा त्याचे निकष काय असावेत  यावर नेहमी चाहत्यांमध्ये चर्चा प्रतिचर्चा चालु असतात . अर्थात याची उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात . उदाहरणार्थ जेम्स  बॉन्डचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असा प्रश्न टाकला तर वेगवेगळी उत्तर मिळतात . तीच गोष्ट 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज ' आणि '  हॅरी पॉटर' चित्रपटमालिकांना पण लागु पडते . फार कमी वेळेस या मुद्द्यावर चाहत्यांच एकमत होत . उदाहरणार्थ ख्रिस्तोफर नोलानच्या 'बॅटमॅन' चित्रपटमालिकेतला 'द डार्क नाईट ' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे यावर जवळपास सर्व  चाहत्यांच एकमत होत . 'मिशन इंपॉसिबल' चित्रपटमालिकेतला मागचा चित्रपट 'मिशन इंपॉसिबल- घोस्ट प्रोटोकॉल' जेंव्हा प्रदर्शित झाला होता तेंव्हा हा चित्रपट या मालिकेतला सर्वात चांगला चित्रपट आहे असे सर्टीफ़िकिट त्याला मिळाले होते . त्यामुळे या चित्रपटमालिकेतल्या पुढच्या चित्रपटाची जुळवाजुळव  सुरु झाली तेंव्हा त्याला आपल्या पुर्वसुरींमुळे आलेलं अपेक्षांचं मोठ ओझं बाळगाव लागणार हे उघड गुपित होत . मात्र या चित्रपटमालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' सगळ्या  अपेक्षा पुर्ण करतो आणि त्यापुढ जाऊन हा चित्रपट या चित्रपट मालिकेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे असे विधान केले तरी ते धाडसाचे ठरू नये .

ही आनंदाची बातमी टॉम क्रुझला पण सुखावून गेली असेल . ५३ वर्षाच्या या 'स्टार 'चे चित्रपट एकामागुन एक अपयशी होत होते . वय हा पण महत्वाचा घटक त्याच्याविरुद्ध जात होता . टॉम क्रुझने आता वयानुसार भुमिका (थोडक्यात सांगायचं तर चरित्रभूमिका ) करायचा 'जॉर्ज क्लुनी  फॉर्मुला ' अवलंबावा अशा सुचना पण काही समीक्षकांनी दिल्या होत्या .  'मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' च्या यशाने तात्पुरत का होईना या सगळ्या शंकांना पुर्णविराम दिला आहे . स्क्रीनप्ले लिहिण्यातला दादा माणुस असणाऱ्या ख्रिस्तोफर मॅक्वेरीकडे जेंव्हा टॉम क्रुझने (जो या चित्रपटाचा  निर्माता पण आहे )दिग्दर्शनाची सुत्र सोपवली होती तेंव्हा त्यामागे त्याचे काही ठाम आडाखे होते . ख्रिस्तोफर मॅक्वेरीने  'द युजवल ससपेक्ट्स' च्या लिखाणासाठी ऑस्कर जिंकल होत . टॉम क्रुझच आणि मॅक्वेरीच व्यवसायीक साहचर्य खुप जुन आहे . ख्रिस्तोफर मॅक्वेरीने पण अतिशय कडक स्क्रीनप्ले लिहिला आणि तो दिग्दर्शक म्हणून पडद्यावर उतरवला देखील .

बहुतेक हेरपट किंवा थरारपटाची सुरुवात कशी होते यावर त्या चित्रपटांचा डोलारा अवलंबून असतो . अतिशय थरारक 'ओपनिंग सिक्वेन्स ' असण म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं असतं .   'मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' चा सुरुवातीचा प्रसंग  हा गेल्या काही वर्षातला सर्वोत्कृष्ट 'ओपनिंग सिक्वेन्स 'आहे . बेलारूसमधल्या एका विमानतळावर ईथन हंट आणि त्याचे सहकारी  घातक शस्त्रसाठा हस्तगत करण्यासाठी घुसखोरी करतात . पण त्यांना पोहोचायला थोडा उशीर होतो . शस्त्रसाठा विमानात भरला गेला असतो आणि विमान उड्डाणाच्या तयारीत  असताना ईथन हंट चालत्या विमानात शिरून तो शस्त्रसाठा चोरतो हा प्रसंग अंगावर शहारा आणणारा आहे . या प्रसंगातूनच पुढे काय वाढून ठेवले आहे याची प्रेक्षकाला जाणीव होते आणि प्रेक्षक खुर्चीत सरसावून बसतो .

 ईथन हंट ज्या आयएमएफ या संस्थेसाठी काम करतो त्या संस्थेच अस्तित्व धोक्यात आलं आहे .  सीआयएचा प्रमुख (अलेक बाल्डविन) हा या संस्थेच स्वतंत्र अस्तित्व नष्ट करून तीच विलीनीकरण  सीआयएमध्ये करावे यासाठी प्रयत्नरत असतो . आपल्या प्रयत्नात तो यशस्वी पण होतो . पण  ईथन हंटच्या नाकात वेसण घालण्याची त्याची महत्वाकांक्षा अपुरीच राहते . 'सिंडीकेट ' या अतिशय गुप्तधर्तीवर काम करणाऱ्या पण धोकादायक संघटनेचा मोड करण्याच्या मोहिमेवर ईथन हंट असतो . पण अशी काही संघटना अस्तित्वात आहे यावरच सीआयएचा विश्वास नसतो . म्हणून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नसते . शेवटी आपले जुने सहकारी बेंजी (सायमन पेग) , विलियम (जेरेमी रेनर ) आणि ल्युथर (विंग ) यांना सोबत घेऊन ही कामगिरी तडीला नेण्याचा हंट निर्धार करतो . जागतीक नेत्यांच्या हत्या करून 'न्यु वर्ल्ड ऑर्डर ' प्रस्थापित करण्याचा 'सिंडीकेट 'चा इरादा असतो . 'सिंडीकेट 'च्या मागावर असतानाच हंटची गाठ लीसा फॉस्ट (रेबेका फर्गुसन)या गुढ महिला एजंटशी  पडते. कधी ती हंटच्या बाजुने असते तर कधी विरुद्ध . ईथन हंट आपल्या कामगिरीत यशस्वी होतो का ? लिसा नेमकी कोण असते ? आयएमएफच भवितव्य काय होत ? या प्रश्नांची उत्तर चित्रपट बघताना मिळतात .

या चित्रपटमालिकेतल्या प्रत्येक चित्रपटात असा एक भन्नाट सीन असतो ज्यावर खास 'मिशन इंपॉसिबल मार्क' असतो . या चित्रपटातपण असा एक सीन आहे .  सत्तर हजार गैलन पाण्यात हंट उडी मारून तब्बल सहा मिनिट श्वास थांबवतो तो प्रसंग प्रेक्षकांचाही श्वास थांबवतो . एका  कामगिरीसाठी हंट ज्या चतुराईने ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या आवाजाचे नमुने गोळा करतो तो प्रसंग पण मजा आणतो .दिग्दर्शकाने  सायमन पेग आणि रेबेका फर्गुसन यांनी साकारलेल्या पात्रांना पण तितकच महत्व दिले आहे . लिसाचे पात्र तर हंटच्या पात्राइतकेच महत्वाचे आहे . चित्रपट प्रेक्षकांना  लंडन , मलेशिया , बेलारूस अशी विविध देशांची नेत्रदीपक सफर घडवून आणतो .

मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' सर्वात मजबुत पक्ष आणि सर्वात मोठा कमकुवत पक्ष एकच आहे . 'मिशन इंपॉसिबल ' चित्रपट मालिकेतला पाचवा चित्रपट असण . सर्वात मजबूत पक्ष यासाठी की या समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांची पसंती लाभलेल्या चित्रपटमालिकेचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे . त्या पुण्याईच्या जोरावर चित्रपटाला पहिल्या आठवड्यात  जोरदार प्रतिसाद मिळणार हे नक्की . कमकुवत पक्ष ह्यासाठी म्हणायचं की पहिल्या चार भागांच्या पुण्याईमुळे पाचव्या भागाकडून डोंगराएवढ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत. पण मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' मनोरंजनाच्या सर्व अपेक्षाना दशांगुळे पुरून उरतो  हे नक्की .

स्टार -चार 


No comments:

Post a Comment