Sunday, 30 August 2015

गाय रिचीच विक्षिप्त 'फिल्म स्कुल '

                                           
                                                          


"फिल्म स्कुल्समधुन जे विद्यार्थी बाहेर पडतात त्याचं काम अतिशय रटाळ असतं" , असं विधान एकदा दिग्दर्शक गाय रिचीने केले होत . स्वतः गाय रिची कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये शिकला नव्हता . त्याने फिल्म मेकिंगचे सर्व तांत्रिक अंग प्रत्यक्ष  'फिल्ड '  वरच शिकले  होते . असाच पराक्रम करणारा दुसरे काही  दिग्दर्शक म्हणजे स्टीवन स्पीलबर्ग आणि आपल्याकडचा इम्तियाज अली . गाय रिची हा त्याच्या काहीश्या विक्षिप्त पण भन्नाट फिल्ममेकिंगमुळे आणि त्याच्या मॅडोना सोबतच्या विवाहामुळे ओळखला जातो . गाय रिचीचा  'लॉक, स्टॉक अ‍ॅण्ड टु स्मोकिंग बॅरल ' हा त्याच्या भन्नाट आणि विक्षिप्त फिल्ममेकिंगचा एक अफलातुन नमुना आहे. तर अशा या वल्ली म्हणता येईल अशा दिग्दर्शकाचा 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' (याचा उच्चार अंकल असापण  होतो ) या आठवड्यात प्रदर्शीत झाला आहे . गाय रिची सध्या त्याच्या रॉबर्ट डाउनी ज्युनियर अभिनीत 'शेरलॉक होम्स'च्या यशामुळे 'टॉप गियर ' मध्ये आहे . 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' पण गाय रिचीची 'लेगसी ' पुढे नेण्याचे काम समर्थपणे करतो आणि त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही .

वर गाय रिचीचा उल्लेख विक्षिप्त दिग्दर्शक असा केला आहे . त्याच्या विक्षिप्ततेचा नमुना या चित्रपटात पण दिसून येतो .  'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई'  हा चित्रपट एक हेरपट आहे . याच्यातल्या  दोन मुख्य पात्रापैकी  एक पात्र अमेरिकन हेर आहे तर दुसर पात्र रशियन हेर . गाय रिचीचा विक्षिप्तपणा असा की त्याने अमेरिकन हेराच्या पात्रासाठी ब्रिटीश अभिनेता 'कास्ट ' केला आहे तर रशियन हेराच्या पात्रासाठी अमेरिकन अभिनेता निवडला आहे . आंतरराष्ट्रीय राजकारणाचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या आणि युरोपियन देश व अमेरिका यांच्या संबंधांचे तानेबाने माहित असणाऱ्या कुणालापण या 'कास्टिंग ' मधला उपहासातुन आलेला अंतर्विरोध लगेच समजू शकेल . 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' च्या पटकथेत फारसे वेगळे असे काही नाही आणि बाकी हेरपटात जसे ठराविक काळाने 'ट्विस्टस' येतात तसे इथे येत नाहीत . तरी चित्रपट दोन तास प्रेक्षकांचं  भरपूर मनोरंजन करतो. याच श्रेय गाय रिचीच्या वेगवान पटकथेला आणि स्टायलिश दिग्दर्शनाला .

चित्रपटाचे कथानक घडते तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा आहे . वरकरणी तरी सध्या अमेरिका आणि रशिया मित्र आहेत. नाझी जर्मनीचा पराभव झाला तरी नाझी प्रवृत्ती अजून पुर्ण ठेचल्या गेलेल्या नाहीत .  शीतयुद्धाचा 'आगाज ' अजून व्हायचा आहे . नेपोलियन सोलो (अमेरिकन पात्राचं नाव फ्रेंच राजावरून.  हा अजून गाय रिचीच्या खास विक्षिप्तपणाचा नमुना ) हा एकेकाळचा अट्टल चोर  सध्या 'सीआयए ' साठी काम करत आहे . नेपोलियन (सुपरमॅनच्या इमेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असणारा हेनरी काव्हिल ) ची नेमणूक सध्या बर्लिनमध्ये आहे .  एक श्रीमंत नाझी दाम्पत्य एका जर्मन शास्त्रज्ञाच्या मदतीने विध्वंसक अण्वस्त्र तयार करत आहेत अशी बातमी 'सीआयए' ला कळते. नाझींच्या हाती अण्वस्त्र पडण रशिया आणि अमेरिका या दोघांनाही परवडण्यासारखे नसते . त्यामुळे नाझींना अण्वस्त्र बनवण्यापासून थांबवण्यासाठी रशियन हेरसंस्था 'केजीबी'  'सीआयए 'शी हातमिळवणी करते. त्यासाठी  नेपोलियन सोलोच्या मदतीला इल्या (द लोन रेंजरच्या दणदणीत अपयशातून सावरण्याचा प्रयत्न करणारा आर्मी हमर ) हा रशियन एजंट येतो . दोघांचे स्वभाव आणि प्रकृती भिन्न असल्याने दोघांमध्ये खटके उडणे स्वाभाविक असतं . नाझी दाम्पत्याला अण्वस्त्र बनवण्यात मदत करणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याच्या मुलीचा गॅबी (एलीशिया विकांडेर ) चा पत्ता या दोघांना लागतो . मग गॅबीच्या मदतीने हे दोघे नाझीच्या तळावर शिरकाव करतात .ते आपली कामगिरी कशी यशस्वीरीत्या पार पाडतात याची कहाणी म्हणजे 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' .

चित्रपटाचा सगळ्यात मोठा 'युएसपी' आहे तो म्हणजे दोन मुख्य पात्रांमध्ये जुळून आलेली जबरदस्त 'केमिस्ट्री '.  हेनरी काव्हिल आणि आर्मी हमर यांच्यात जबरदस्त ताळमेळ आहे . त्यांच्या पात्रांच्या स्वभावात असणाऱ्या विरोधाभासामुळे आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या स्वभावामुळे ही 'केमिस्ट्री ' अजूनच जमली आहे . प्रत्येक हेरपटात एक जबरदस्त खलनायक असतो . चित्रपट परिणामकारक बनवण्यासाठी आणि मुख्य पात्राच 'नायकत्व ' ठसवण्यासाठी या खलनायकाचा उपयोग होतो . पण 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' मध्ये अशा खलनायकाचा अभाव जाणवतो . चित्रपटात पन्नाशीच्या दशकातलं बर्लीन आणि रोम दाखवलं आहे. ते इतकं 'ऑथेण्टिक' आहे की आपल्याला त्या काळात गेल्याचा भास होतो . या शहरांची सुंदरता आणि देशाच्या पराभवामुळे या राजधान्यांच्या शहरावर आलेली औदासिन्याची कळा खुप सुंदररीत्या दाखवली आणि टिपल्या गेली आहे . या चित्रपटाच्या सेट डिझाईन करणाऱ्या टीमच कौतुक कराव तितक कमी आहे . कुठलाही हेरपट एका जबरदस्त 'चेस  सीन ' शिवाय अपूर्ण असतो . या चित्रपटात पण एक जबरदस्त आणि उत्कंठावर्धक चेस आहे. आपल्याकडे चित्रपट नायकांच्या नावाने ओळखले जातात . पण चित्रपट हे नेहमीच दिग्दर्शकाच माध्यम असतं . या चित्रपटात पण मोठे स्टार असले तरी चित्रपटावर दिग्दर्शक गाय रिचीचा न पुसता येण्याजोगा ठसा आहे . इतिहासात  'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई' ची ओळख गाय रिचीचा चित्रपट अशीच राहिलं .

२०१५ हे वर्ष हॉलिवुडच्या इतिहासात 'हेरपटाचे वर्ष ' म्हणून नोंदले जाईल . यावर्षी अनेक उत्तमोउत्तम हेरपट प्रदर्शीत झाले आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद पण उत्तम मिळाला . हे हेरपट एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे होते आणि विषयांमध्ये वैविध्य होते . 'स्पाय ' आणि 'किंग्जमॅन-द सीक्रेट सर्विस' या फिल्म्सनी तर हेरपटाचे साचे आणि प्रचलित नियम तोडण्याचे काम यशस्वीरीत्या करून दाखवले .तर  'मिशन इंपॉसिबल : रोग नेशन ' हा एक टिपिकल पण प्रभावी हेरपट होता . या सगळ्यावर कळस करण्यासाठी बहुचर्चित आणि ज्याची सगळे वाट बघत आहेत असा जेम्स बॉन्डचा 'स्पेक्टर ' लवकरच प्रदर्शित होत आहे . पण या हेरपटाच्या मांदियाळीत
 'द मॅन फ्रॉम यूएनसीएलई'  ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे हे निर्विवाद . एक चांगला हेरपट बघायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा .

स्टार -तीन


No comments:

Post a Comment