Saturday, 19 September 2015                            लघुपटांच 'बिझनेस  मॉडेल ' नवजोत गुलाटीच्या  'बेस्ट गर्लफ्रेंड ' या शॉर्टफिल्मची सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि युट्यूबवर धुम चालु आहे . व्यवसायाने चित्रपट पटकथालेखक असणाऱ्या नवजोत त्याने लिहिलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहुन कंटाळला होता . या 'ट्रानझीशन पिरीयड ' मध्ये माशा मारत बसण्यापेक्षा स्वतःची जमलेली थोडीफार गंगाजळी वापरून त्याने 'बेस्ट गर्लफ्रेंड ' ही शॉर्टफिल्म बनवली

. https://www.youtube.com/watch?v=tDTfdsbo3uI


त्याच्या या निर्णयाला अपेक्षेपेक्षा पण जास्त यश मिळाले . ही शॉर्टफिल्म युट्यूबवरवर हिट झाली  . या यशामुळे नवजोतला अनेक नवीन प्रोजेक्ट्स मिळाले . आता या यशामुळे  उत्साहित झालेला नवजोत एका प्रोडक्शन हाउससाठी 'लोकल गर्लफ्रेंड' ही वेब सिरीज बनवत आहे .पण हे यश फक्त प्रोत्साहनपर पातळीवर किंवा पुढचे प्रोजेक्ट्स मिळण इतक्यापुरतच मर्यादित नाही . नवजोतने शॉर्टफिल्म मध्ये टाकलेला पैसा पुन्हा मिळवलाच वर बऱ्यापैकी नफापण कमावला आहे. यामागे गेल्या काही वर्षात  शॉर्टफिल्ममेकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेले सकारात्मक बदल कारणीभूत आहेत .

काही वर्षापूर्वी कुणी 'शॉर्टफिल्म मेकिंग' मधून पैसा मिळू शकतो असे विधान केले असते तर लोकांनी खचितच त्याला वेड्यात काढले असते . त्या काळात शॉर्टफिल्म ही फक्त आपल्या गुणवत्तेचे 'एक्झीबिशन' करणे एवढ्या मर्यादित हेतूने बनवली जायची .  काही वर्षापूर्वी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शॉर्टफिल्म नेण्यासाठी आवश्यक व्यासपीठ पण उपलब्ध नव्हती . पण गेल्या चार पाच वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे . यातून शॉर्टफिल्मच स्वतःच अस  एक 'बिझनेस  मॉडेल ' तयार झाल आहे . तर काय आहे हे ' बिझनेस मॉडेल '? याचा हा आढावा .

युट्यूब नावाचं वरदान -

गुगलवर वैयक्तिक माहितीवर अतिक्रमण करत असल्याचे आणि मोनोपोली निर्माण करण्याचे आरोप लागत आहेत . पण त्यामुळे माध्यमांच 'लोकशाहीकरण ' करत असण्याचं त्यांच कर्तुत्व नजरेआड करता येत नाही . युट्यूबमुळे शॉर्टफिल्म मेकर्स ना एक मोठ व्यासपीठ मिळालं आहे . महत्वाचं म्हणजे जर तुम्ही युट्यूबवर पोस्ट करत असणारा 'कंटेंट ' हा 'ओरिजनल ' असेल आणि दर्जेदार असेलं तर तुम्हाला त्यातुन आर्थिक प्राप्ती होऊ शकते . त्यासाठी तुम्हाला तुमच्या युट्यूब अकाउण्ट च्या सेटिंग मध्ये जाउन गुगलला 'अॅड प्लेसिंग ' करण्याची परवानगी द्यावी लागते . तुमच्या 'पोस्ट ' ला जितक्या जास्त हिट्स तितकी तुमची अर्थप्राप्ती जास्त असा साधा सरळ हिशोब आहे . पण तुम्ही जो व्हिडीओ पोस्ट करत असाल त्यावर तुमचा 'प्रताधिकार ' हवा . जर तुम्ही दुसऱ्याच्या पोस्ट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला आणि  'ओरिजिनल ' निर्माता/दिग्दर्शकाने त्यावर आक्षेप घेतला तर युट्यूब तो व्हिडीओ काढून टाकत . 'कंटेंट इज किंग ' असे जे मनोरंजन व्यवसायात वारंवार ऐकायला मिळते त्याची प्रचीती इथे पण येते . जर तुमची शॉर्टफिल्म चांगली निर्मितीमूल्य असणारी असेल आणि कथानक चांगले असेलं तर त्याला जास्त 'विजीट ' मिळतात . लेखाच्या सुरुवातीला ज्या नवजोत गुलाटीचा उल्लेख केला आहे त्याच्या 'बेस्ट गर्लफ्रेंड ' या शॉर्टफिल्मला आतापर्यंत ऐंशी लाख 'विजीट ' मिळाल्या आहेत . अर्थातच नवजोत खुश आहे . साधारण दर दहा लाख 'हिट्स ' मागे त्याला काही हजार रुपये (नक्की आकडा त्याने सांगितला नाही पण तो पाच आकडी आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे ) गुगलकडून मिळाले आहेत . लवकरच त्याची शॉर्टफिल्म एक कोटीचा आकडा पार करेल तेंव्हा  एक मोठी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल हे नक्की .  जर तुमच्यात चांगले मार्केटिंग स्किल्स असतील तर तुमची 'रिकवरि ' होण्याची शक्यता जास्त . त्यासाठी तुम्हाला तुमच्या शॉर्टफिल्मची युट्यूब लिंक विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर (फेसबुक , ट्वीटर, ब्लॉग ई . ) टाकून जास्तीत जास्त प्रेक्षकांना ती फिल्म  बघायला लावण्याचं कसब साधता यायला हवं . युट्यूबवर आपली कलाकृती पोस्ट करून कमाई करणारा नवजोत हा एकटा नाही . अनेक शॉर्टफिल्म मेकर्स  हा रस्ता चोखाळत आहेत . एक तर आपल्या शॉर्टफिल्मला अतिशय लोकप्रिय व्यासपीठ मिळत आणि त्यातून उत्पन्न पण मिळत . असा 'डबल ' फायदा इथे आहे .

मोठ्या चित्रपट निर्मितीगृहांच पदार्पण -

मी फेसबुकवर एका फिल्ममेकर्स ग्रुपचा सदस्य आहे . गेल्या महिनाभरातच  त्या ग्रुपमध्ये सुभाष घईची मुक्ता आर्ट्स , एकता कपूरची बालाजी आणि इरॉस या सारख्या मोठ्या प्रोडक्शन हाउसनि शॉर्टफिल्म मेकर्सना त्यांच्या कडे काही नवीन युनिक शॉर्टफिल्मच्या संकल्पना असतील तर त्या मेल करण्याचे आव्हान केले आहे . जर त्यांना तुमची संकल्पना आवडली तर त्याची निर्मिती करण्यास ते तुम्हाला आर्थिक मदत करणार . सुभाष घई यांनी तर शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रत्यक्ष युट्युबशीच हातमिळवणी केली आहे . वेब सिरीज निर्मितीकडे या निर्मात्यांचा कल वाढला आहे . मागच्या वर्षी अनुराग कश्यपच्या 'फँटम फिल्म्स' ने तर चक्क एखाद्या चित्रपटाप्रमाणे वीजचोरीच्या विषयावर बनलेल्या 'कटियाबाज' या डॉक्युमेण्ट्रिचे वितरण आणि प्रदर्शन केले होते  .  या सर्व घटना बड्या चित्रपटनिर्मात्यांचा 'डिजिटल फिल्म मेकिंग ' कडे झुकलेला कल दाखवतात . पूर्वी
शॉर्टफिल्म स्वतःच्या खिशाला चाट देऊन बनवण्याशिवाय पर्याय नसायचा.  मात्र हल्ली जर तुमची 'कन्सेप्ट ' चांगली असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यापासूनच आर्थिक सहाय्य या चित्रपटनिर्मात्यांकडून मिळु शकत . इरॉस सारखे मोठे निर्मितीगृह 'नेटफ्लिक्स' चा भारतीय अवतार तयार करण्याच्या मागे आहेत . या सर्व घटना
शॉर्टफिल्म मेकर्ससाठी उत्साहवर्धक आहेत .

शॉर्टफिल्म फेस्टिवलस -

सध्या देशात सर्वत्र फिल्म फेस्टिवलसच पेव फुटलं आहे . जवळपास प्रत्येक मोठ्या शहराचा स्वतःचा असा एक फिल्म फेस्टिवल असतो . जस की मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव , पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. नवी मुंबई , औरंगाबाद , नागपूर या शहरांमध्ये पण फिल्म फेस्टिवल्स भरवले जात आहेत . याचा फायदा चित्रपट साक्षरतेचा प्रसार होण्यासाठी होतोच पण अनेक होतकरू चित्रपट दिग्दर्शक -निर्मात्यांना आपले चित्रपट दाखवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून पण होतो . हल्ली जवळपास प्रत्येक फिल्म फेस्टिवलमध्ये लघुपटासाठी वेगळा विभाग असतो . आपल्याकडच्या शॉर्टफिल्म मेकर्सना पूर्वी यासाठी फक्त बाहेरच्या देशात होणाऱ्या फिल्म फेस्टिवल्सवर अवलंबून राहावं लागायचं .  महागड्या एन्ट्री फी मुळे  ते सर्वांनाच परवडायच नाही . शिवाय ग्रामीण किंवा निमशहरी भागातून आलेल्या शॉर्टफिल्म मेकर्सना याची माहितीच नसायची आणि माहिती असली तरी भाषेचे वैगेरे अडथळे पार करताना त्यांची तारांबळ उडायची . पण आता देशांतर्गत फिल्म फेस्टिवल्स व्हायला लागल्यापासून त्यांना एक हक्काच व्यासपीठ मिळालं आहे . या फिल्म फेस्टिवल्समध्ये सर्वोत्तम लघुपट स्पर्धा पण भरवल्या जातात आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीस पण ठेवली जातात . त्यातून पण शॉर्टफिल्म मेकर्सना बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती होऊ शकते .

पण या उत्साहवर्धक घटना घडत असल्या तरी आपण याबाबतीत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या अजूनही खुप मागे आहोत . तिथे चित्रपटगृहात लघुपटांच्या 'पेड स्क्रीनिंग ' होतात . अनेक पोर्टल्स 'पे पर व्ह्यू ' तत्वावर लघुपट दाखवतात . तिथे अनेकदा एखाद्या शॉर्टफिल्मचे प्रताधिकार विकत घेऊन त्यावर निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती केल्याची पण उदाहरण आहेत . अर्थातच आपण एक देश म्हणून शॉर्टफिल्मच्या बाबतीत बाल्यावस्थेत आहोत कारण आता कुठे आपल्याकडे लघुपटक्षेत्र बाळसे धरायला लागले आहे . त्यामानाने आपण प्रगतीचा पल्ला लवकरच गाठला आहे असे म्हणावे लागेल . त्यामुळे या प्रगतीबाबत आपण आनंदी असायला हरकत मुळीच नसावी पण समाधानी होण्याची चुक होऊ नये असे वाटते .Sunday, 13 September 2015

सिनेमा नावाचे शस्त्र


                                               

मागच्यावर्षी 'द इंटरव्ह्यू ' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता . दोन अमेरिकन पत्रकार किम जॉन्ग या हुकुमशहाची मुलाखत घ्यायला उत्तर कोरीयात जातात आणि सीआयएच्या मदतीने किम जॉन्गचा काटा काढतात असं या सिनेमाचं कथानक होत . चित्रपट विनोदी होता आणि यथातथाच होता . पण यात दाखवलेला किम जॉन्ग कसा होता ? स्त्रीगुण अंगी  असणारा ,    गोष्टी गोष्टीवर धाय मोकलुन रडणारा आणि बावळट असा . अमेरिकेचे शत्रु समजल्या जाणाऱ्या नेत्याचे हॉलीवूडच्या सिनेमात असे 'कॅरीकेचर' बनण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही . यापूर्वी पण 'हॉट शॉट ' नावाच्या चित्रपटात सद्दाम हुसेनचे असेचं विनोदी चित्रण करण्यात आले होते . २०१२ साली प्रदर्शीत झालेल्या 'द डिक्टेटर' नावाच्या चित्रपटात अलादीन नावाचा हुकुमशहा जनरल गद्दाफीच अर्कचित्र होता . वर उल्लेखित सर्व चित्रपट हे विनोदी होते आणि वरवर पाहता ते निरुपद्रवी वाटु शकतात . पण खरेच तसे आहे  का ? हॉलीवूडचे  चित्रपट जगभरात कोट्यावधी प्रेक्षक पाहत असतात . त्यांच्या 'अचेतन ' जाणिवांवर याचा काहीच परिणाम होत नसेल का ?  शीतयुद्ध  जोमात असताना  प्रदर्शित झालेल्या 'रॉकी ' चित्रपटात सिल्वेस्टर स्टॅलोन जेंव्हा रशियन भूमीवर जाऊन आपल्यापेक्षा आडदांड रशियन प्रतीस्पर्ध्याला धूळ चारतो तेंव्हा हॉलीवूड उर्वरित जगाला कोण जास्त श्रेष्ठ आहे याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं . अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात हॉलीवूडला एक अस्त्र म्हणून वापरलं .  शस्त्रास्त्र आणि अण्वस्त्र याबाबतीत अमेरिकेच्या तडीस तोड असणारा रशिया याबाबतीत मात्र  अमेरिकेसमोर खूपच तोकडा पडला . रशियाचा पाडाव होण्यात आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेत एका हॉलीवूड चित्रपटाचा छोटा वाटा आहे असे कुणी म्हंटले तर लोक त्याला  वेड्यात काढतील . पण ही वस्तुस्थिती आहे . १९८३ साली तात्कालीन अमेरिकन अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांनी रशियन क्षेपणास्त्र प्रणालीला शह म्हणून 'स्टार वॉर्स ' या क्षेपणास्त्र प्रतिरोधक कार्यक्रमाची घोषणा केली . अमेरीकेला प्रतिशह देण्यासाठी रशियाला आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणे भागच होते . लष्करीदृष्ट्या भक्कम पण आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेल्या रशियाला हा बोजा परवडणार नव्हता . जेंव्हा १९८९ साली तात्कालीन 'सोवियेत युनियन ' कोसळले तेंव्हा त्यामागे अतिशय खंगलेली अर्थव्यवस्था हे एक महत्वाचे कारण होते . अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता . वास्तविक पाहता रीगन यांचा  'स्टार वॉर्स ' हा कार्यक्रम  फक्त कविकल्पना होता . स्वतः एकेकाळी आघाडीचे हॉलीवूड नट असणाऱ्या रिगन यांना ही कल्पना  'स्टार वॉर्स ' आणि इतर काही हॉलीवूड चित्रपटांवरून सुचली होती असा दावा अनेक अमेरिकन तज्ञांनी केला आहे . अगोदरच आर्थिकदृष्ट्या विकल असणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला वाढीव खर्चाच्या खोल खोल पाण्यात ओढून नेण्याची रिगन यांची योजना यशस्वी झाली आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचा मान या अंगी नाट्य पुरेपूर मुरलेल्या या माजी हॉलीवूड नटाला मिळाला .पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे .आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जगभरात आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' चा पुरेपूर वापर केला आहे .  'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली . राजकारणातली उद्दिष्ट्ये कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकत न वापरता साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे  'सॉफ्ट पॉवर' . एखाद्या देशाची  'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मुल्ये , त्या देशाची कला आणि संस्कृती , खाद्य संस्कृती आणि यासारखे अनेक घटक . आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपुर्वक निरीक्षण केले तरी अमेरिकेचा याबाबतीतला वरचष्मा सहज लक्षात येईल . केएफसी , कोकाकोला-पेप्सी , मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलीवूड हा पण अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे . अनेक अमेरिकन सिरियल्सला भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली आहे . त्यातूनच अमेरिकेची 'पृथ्वीवरचे नंदनवन ' अशी प्रतिमा बनली आहे . हॉलीवूडने कायमचं आपल्या चित्रपटातून आक्रमक उजव्या अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार केला आहे . जगावर आलेले प्रत्येक संकट निवारण्याची जबाबदारी या जगाचा स्वघोषित नेता म्हणून आमचीच आहे अशी भूमिका अमेरिकन चित्रपट मांडत आलेले आहेत . 'इन्डीपिंडेंस डे ' सारख्या चित्रपटात अमेरिका कशी इतर देशांची तोंडदेखली मदत घेऊन अतिशय शक्तिशाली परग्रहवासियांचा पराभव करते हे दाखवण्यात आले होते . आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असणाऱ्या 'इस्लामिक' दहशतवाद्यांचा बीमोड धीरोदत्त अमेरिकन नायक एकटाकी कसा करतो हे अनेक चित्रपटातून पाहता येत . हॉलीवूड चित्रपट अमेरिकन सरकारचे परराष्ट्र धोरण कसे पुढे रेटतात याचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने अमेरिकन चित्रपटातील खलनायकांचा अभ्यास करावा . ह्या खलनायकांच्या चरित्रनिर्मितीवर अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो . ८० च्या दशकातला खलनायक हा क्रुर , आडदांड असा रशियन असायचा . शीतयुद्धकाळात रशियन लोकांची जी विशिष्ट नकारात्मक प्रतिमा अमेरिकन माध्यमांनी बनवली त्यातून रशिया अजूनपण पुरतेपणी सावरला नाही . १९९० सालानंतर अमेरिकन चित्रपटात खलनायक हा दाढीवाला आणि कट्टर इस्लामिक बनत गेला . ९/११ च्या अमेरिकन भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर तर जवळपास प्रत्येक चित्रपटातला खलनायक हा आशियाई मुस्लिम दाखवण्याची चढाओढ अमेरिकन निर्मात्यांमध्ये सुरु झाली . गेल्या काही वर्षात मात्र त्यांची जागा चीनी किंवा कोरियन खलनायक घेत आहेत . अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन' ची  स्वतःच्या मालकीची  चित्रपटनिर्मिती संस्था आहे यावरून काय अर्थ घ्यायचा तो समजावून घ्यावा .

तर अशा या अमेरिकेला आणि हॉलीवूडला पहिल्यांदाच तडीस तोड उत्तर देणारा प्रतिस्पर्धी तयार होत आहे . तो प्रतिस्पर्धी म्हणजे चीन . चीनी खाद्यसंस्कृती अगोदरच जगभरात लोकप्रिय झाली आहे . आता चीनी चित्रपट पण अमेरिकन आणि युरोपियन मार्केटवर चढाई करण्यास सिद्ध झाले आहेत . सध्या चीनी चित्रपट अमेरिकेत भरपूर गल्ला गोळा करत आहेत . 'कुंग फु पांडा ' सारखा अमेरिकन निर्मिती असणारा पण चीनी जीवनशैलीभोवती फिरणारा चित्रपट अमेरिकेत उत्पन्नाचे उच्चांक तोडतो हे प्रतिमात्मक आहे .जॅकी  चेन, दिग्दर्शक आंग ली यासारखे बरेच चीनी वंशाचे  दिग्गज अमेरिकेत चीनी संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्वाचा वाटा उचलत आहेत . ऑस्कर्स पुरस्कारांमध्ये पण चीनी चित्रपट आपली उपस्थिती दाखवून देत आहेत . २००८ च्या भव्यदिव्य ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' च्या आक्रमक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली . तर 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक युद्धाची युद्धभूमी तयार झाली आहे . ही लढाई जो जिंकेल त्याचे जगावर वर्चस्व राहील हे निश्चित .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिशय मर्यादा असणारा चीन भारतासारख्या लोकशाही देशाच्या याबाबतीत अनेक योजने पुढे आहे ही बाब वेदनादायक आहे . चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर  'प्रपोगंडा' चे साधन होऊ शकते यावर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि देशातल्या इतर  लोकशाही संस्थांनी कधी विचारच केला नाही  ही बाब खेदजनक आहे . काहीही विशेष प्रयत्न न करता अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेच्या देशात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत . अनेक देशात भारतीय चित्रपट हीच आपली ओळख आणि 'सांस्कृतिक राजदूत' आहेत . भारत -चीन  संबंध , भारत पाकिस्तान संबंध आणि एकूणच भारत देशाची प्रतिमा यात सिनेमाने मोठी भूमिका बजावली आहे . पण तो एका स्वतंत्र आणि मोठ्या लेखाचा विषय आहे .

आपल्याकडे 'प्रपोगंडा' म्हणजे काही तरी वाईट गोष्ट अशी प्रतिमा जनमानसात विनाकारण आहे . यापुर्वीपण 'भांडवलशाही 'म्हणजे अतिशय वाईट गोष्ट असा एक देश म्हणून आपला समज होता . 'प्रपोगंडा' म्हणजे आंतरराष्ट्रीय संबधात उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे एक साधन आहे . हे पहिले अमेरिकेने आणि आता चीनने सिद्ध केले आहे . आपले याविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून आपण त्यासाठी एक देश म्हणून कधी वाटचाल सुरु करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे .