Saturday, 19 September 2015                            लघुपटांच 'बिझनेस  मॉडेल ' नवजोत गुलाटीच्या  'बेस्ट गर्लफ्रेंड ' या शॉर्टफिल्मची सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि युट्यूबवर धुम चालु आहे . व्यवसायाने चित्रपट पटकथालेखक असणाऱ्या नवजोत त्याने लिहिलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहुन कंटाळला होता . या 'ट्रानझीशन पिरीयड ' मध्ये माशा मारत बसण्यापेक्षा स्वतःची जमलेली थोडीफार गंगाजळी वापरून त्याने 'बेस्ट गर्लफ्रेंड ' ही शॉर्टफिल्म बनवली

. https://www.youtube.com/watch?v=tDTfdsbo3uI


त्याच्या या निर्णयाला अपेक्षेपेक्षा पण जास्त यश मिळाले . ही शॉर्टफिल्म युट्यूबवरवर हिट झाली  . या यशामुळे नवजोतला अनेक नवीन प्रोजेक्ट्स मिळाले . आता या यशामुळे  उत्साहित झालेला नवजोत एका प्रोडक्शन हाउससाठी 'लोकल गर्लफ्रेंड' ही वेब सिरीज बनवत आहे .पण हे यश फक्त प्रोत्साहनपर पातळीवर किंवा पुढचे प्रोजेक्ट्स मिळण इतक्यापुरतच मर्यादित नाही . नवजोतने शॉर्टफिल्म मध्ये टाकलेला पैसा पुन्हा मिळवलाच वर बऱ्यापैकी नफापण कमावला आहे. यामागे गेल्या काही वर्षात  शॉर्टफिल्ममेकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेले सकारात्मक बदल कारणीभूत आहेत .

काही वर्षापूर्वी कुणी 'शॉर्टफिल्म मेकिंग' मधून पैसा मिळू शकतो असे विधान केले असते तर लोकांनी खचितच त्याला वेड्यात काढले असते . त्या काळात शॉर्टफिल्म ही फक्त आपल्या गुणवत्तेचे 'एक्झीबिशन' करणे एवढ्या मर्यादित हेतूने बनवली जायची .  काही वर्षापूर्वी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शॉर्टफिल्म नेण्यासाठी आवश्यक व्यासपीठ पण उपलब्ध नव्हती . पण गेल्या चार पाच वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे . यातून शॉर्टफिल्मच स्वतःच अस  एक 'बिझनेस  मॉडेल ' तयार झाल आहे . तर काय आहे हे ' बिझनेस मॉडेल '? याचा हा आढावा .

युट्यूब नावाचं वरदान -

गुगलवर वैयक्तिक माहितीवर अतिक्रमण करत असल्याचे आणि मोनोपोली निर्माण करण्याचे आरोप लागत आहेत . पण त्यामुळे माध्यमांच 'लोकशाहीकरण ' करत असण्याचं त्यांच कर्तुत्व नजरेआड करता येत नाही . युट्यूबमुळे शॉर्टफिल्म मेकर्स ना एक मोठ व्यासपीठ मिळालं आहे . महत्वाचं म्हणजे जर तुम्ही युट्यूबवर पोस्ट करत असणारा 'कंटेंट ' हा 'ओरिजनल ' असेल आणि दर्जेदार असेलं तर तुम्हाला त्यातुन आर्थिक प्राप्ती होऊ शकते . त्यासाठी तुम्हाला तुमच्या युट्यूब अकाउण्ट च्या सेटिंग मध्ये जाउन गुगलला 'अॅड प्लेसिंग ' करण्याची परवानगी द्यावी लागते . तुमच्या 'पोस्ट ' ला जितक्या जास्त हिट्स तितकी तुमची अर्थप्राप्ती जास्त असा साधा सरळ हिशोब आहे . पण तुम्ही जो व्हिडीओ पोस्ट करत असाल त्यावर तुमचा 'प्रताधिकार ' हवा . जर तुम्ही दुसऱ्याच्या पोस्ट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला आणि  'ओरिजिनल ' निर्माता/दिग्दर्शकाने त्यावर आक्षेप घेतला तर युट्यूब तो व्हिडीओ काढून टाकत . 'कंटेंट इज किंग ' असे जे मनोरंजन व्यवसायात वारंवार ऐकायला मिळते त्याची प्रचीती इथे पण येते . जर तुमची शॉर्टफिल्म चांगली निर्मितीमूल्य असणारी असेल आणि कथानक चांगले असेलं तर त्याला जास्त 'विजीट ' मिळतात . लेखाच्या सुरुवातीला ज्या नवजोत गुलाटीचा उल्लेख केला आहे त्याच्या 'बेस्ट गर्लफ्रेंड ' या शॉर्टफिल्मला आतापर्यंत ऐंशी लाख 'विजीट ' मिळाल्या आहेत . अर्थातच नवजोत खुश आहे . साधारण दर दहा लाख 'हिट्स ' मागे त्याला काही हजार रुपये (नक्की आकडा त्याने सांगितला नाही पण तो पाच आकडी आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे ) गुगलकडून मिळाले आहेत . लवकरच त्याची शॉर्टफिल्म एक कोटीचा आकडा पार करेल तेंव्हा  एक मोठी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल हे नक्की .  जर तुमच्यात चांगले मार्केटिंग स्किल्स असतील तर तुमची 'रिकवरि ' होण्याची शक्यता जास्त . त्यासाठी तुम्हाला तुमच्या शॉर्टफिल्मची युट्यूब लिंक विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर (फेसबुक , ट्वीटर, ब्लॉग ई . ) टाकून जास्तीत जास्त प्रेक्षकांना ती फिल्म  बघायला लावण्याचं कसब साधता यायला हवं . युट्यूबवर आपली कलाकृती पोस्ट करून कमाई करणारा नवजोत हा एकटा नाही . अनेक शॉर्टफिल्म मेकर्स  हा रस्ता चोखाळत आहेत . एक तर आपल्या शॉर्टफिल्मला अतिशय लोकप्रिय व्यासपीठ मिळत आणि त्यातून उत्पन्न पण मिळत . असा 'डबल ' फायदा इथे आहे .

मोठ्या चित्रपट निर्मितीगृहांच पदार्पण -

मी फेसबुकवर एका फिल्ममेकर्स ग्रुपचा सदस्य आहे . गेल्या महिनाभरातच  त्या ग्रुपमध्ये सुभाष घईची मुक्ता आर्ट्स , एकता कपूरची बालाजी आणि इरॉस या सारख्या मोठ्या प्रोडक्शन हाउसनि शॉर्टफिल्म मेकर्सना त्यांच्या कडे काही नवीन युनिक शॉर्टफिल्मच्या संकल्पना असतील तर त्या मेल करण्याचे आव्हान केले आहे . जर त्यांना तुमची संकल्पना आवडली तर त्याची निर्मिती करण्यास ते तुम्हाला आर्थिक मदत करणार . सुभाष घई यांनी तर शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रत्यक्ष युट्युबशीच हातमिळवणी केली आहे . वेब सिरीज निर्मितीकडे या निर्मात्यांचा कल वाढला आहे . मागच्या वर्षी अनुराग कश्यपच्या 'फँटम फिल्म्स' ने तर चक्क एखाद्या चित्रपटाप्रमाणे वीजचोरीच्या विषयावर बनलेल्या 'कटियाबाज' या डॉक्युमेण्ट्रिचे वितरण आणि प्रदर्शन केले होते  .  या सर्व घटना बड्या चित्रपटनिर्मात्यांचा 'डिजिटल फिल्म मेकिंग ' कडे झुकलेला कल दाखवतात . पूर्वी
शॉर्टफिल्म स्वतःच्या खिशाला चाट देऊन बनवण्याशिवाय पर्याय नसायचा.  मात्र हल्ली जर तुमची 'कन्सेप्ट ' चांगली असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यापासूनच आर्थिक सहाय्य या चित्रपटनिर्मात्यांकडून मिळु शकत . इरॉस सारखे मोठे निर्मितीगृह 'नेटफ्लिक्स' चा भारतीय अवतार तयार करण्याच्या मागे आहेत . या सर्व घटना
शॉर्टफिल्म मेकर्ससाठी उत्साहवर्धक आहेत .

शॉर्टफिल्म फेस्टिवलस -

सध्या देशात सर्वत्र फिल्म फेस्टिवलसच पेव फुटलं आहे . जवळपास प्रत्येक मोठ्या शहराचा स्वतःचा असा एक फिल्म फेस्टिवल असतो . जस की मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव , पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. नवी मुंबई , औरंगाबाद , नागपूर या शहरांमध्ये पण फिल्म फेस्टिवल्स भरवले जात आहेत . याचा फायदा चित्रपट साक्षरतेचा प्रसार होण्यासाठी होतोच पण अनेक होतकरू चित्रपट दिग्दर्शक -निर्मात्यांना आपले चित्रपट दाखवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून पण होतो . हल्ली जवळपास प्रत्येक फिल्म फेस्टिवलमध्ये लघुपटासाठी वेगळा विभाग असतो . आपल्याकडच्या शॉर्टफिल्म मेकर्सना पूर्वी यासाठी फक्त बाहेरच्या देशात होणाऱ्या फिल्म फेस्टिवल्सवर अवलंबून राहावं लागायचं .  महागड्या एन्ट्री फी मुळे  ते सर्वांनाच परवडायच नाही . शिवाय ग्रामीण किंवा निमशहरी भागातून आलेल्या शॉर्टफिल्म मेकर्सना याची माहितीच नसायची आणि माहिती असली तरी भाषेचे वैगेरे अडथळे पार करताना त्यांची तारांबळ उडायची . पण आता देशांतर्गत फिल्म फेस्टिवल्स व्हायला लागल्यापासून त्यांना एक हक्काच व्यासपीठ मिळालं आहे . या फिल्म फेस्टिवल्समध्ये सर्वोत्तम लघुपट स्पर्धा पण भरवल्या जातात आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीस पण ठेवली जातात . त्यातून पण शॉर्टफिल्म मेकर्सना बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती होऊ शकते .

पण या उत्साहवर्धक घटना घडत असल्या तरी आपण याबाबतीत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या अजूनही खुप मागे आहोत . तिथे चित्रपटगृहात लघुपटांच्या 'पेड स्क्रीनिंग ' होतात . अनेक पोर्टल्स 'पे पर व्ह्यू ' तत्वावर लघुपट दाखवतात . तिथे अनेकदा एखाद्या शॉर्टफिल्मचे प्रताधिकार विकत घेऊन त्यावर निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती केल्याची पण उदाहरण आहेत . अर्थातच आपण एक देश म्हणून शॉर्टफिल्मच्या बाबतीत बाल्यावस्थेत आहोत कारण आता कुठे आपल्याकडे लघुपटक्षेत्र बाळसे धरायला लागले आहे . त्यामानाने आपण प्रगतीचा पल्ला लवकरच गाठला आहे असे म्हणावे लागेल . त्यामुळे या प्रगतीबाबत आपण आनंदी असायला हरकत मुळीच नसावी पण समाधानी होण्याची चुक होऊ नये असे वाटते .No comments:

Post a Comment