Sunday, 18 October 2015

भ्रामक राष्ट्रवादाला चपराक

                             
 


स्टिवन स्पीलबर्ग या अवलिया प्रतिभावान दिग्दर्शकाला इतिहासाबद्दल जबरदस्त आकर्षण आहे . अब्राहम लिंकन यांच्या जीवनपट उलगडणारा 'लिंकन ' हा चरित्रपट , एका देशाच्या भयानक प्रतिशोधाची कहाणी सांगणारा 'म्युनिक ' , दुसऱ्या महायुद्धात शेकडो ज्युंचे प्राण वाचवणाऱ्या एका महात्म्याची कहाणी सांगणारा 'शिंडलर्स लिस्ट ' हा चित्रपट ही काही पटकन डोळ्यात भरणारी उदाहरण . जागतिक राजकारणात घडलेल्या महत्वाच्या पण तितक्याच संवेदनशील घटनांना पडद्यावर आणण्यात स्पीलबर्गचा हात पकडतील असे फार कमी दिग्दर्शक आहेत . यात स्पीलबर्गच स्वतः ज्यु असण महत्वाच असु शकेल . दुसऱ्या महायुद्धात हिटलर आणि नाझी जर्मनीच्या कराल दाढेत सापडलेल्या ज्यु जमातीने ज्या  मरणयातना भोगल्या असतील  त्यांच वर्णन करायला कुठल्याही भाषेतलं शब्दभांडार अपुर पडेल . स्पीलबर्गचे आजी आजोबा युद्धकाळात जीव धोक्यात घालुन युक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते .लहानपणापासून 'होलोकॉस्ट' च्या कहाण्या ऐकत मोठ्या झालेल्या स्पीलबर्गला  'शिंडलर्स लिस्ट ' बनवावा वाटला तो त्याच्या 'ज्यु ' पार्श्वभुमीमुळेच. अशा या स्पीलबर्गने अशाच एका अनवट ऐतिहासिक घटनेवर ' ब्रिज ऑफ स्पाईज' हा चित्रपट बनवला आहे .

'ब्रिज ऑफ स्पाईज' हा चित्रपट पॉलीटिकल थ्रीलर या सदरात मोडतो . 'सेविंग प्रायवेट रायन ' मध्ये जेंव्हा स्टिवन स्पीलबर्ग आणि टॉम हॅंक्स एकत्र आले होते तेंव्हा स्पीलबर्गला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा  ऑस्कर पुरस्कार मिळाला होता . आता 'ब्रिज ऑफ स्पाईज' मध्ये हे दोन दिग्गज पुन्हा एकत्र आले आहेत आणि ऑस्करसाठी असणाऱ्या या चित्रपटाच्या दावेदारीच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत हा योगायोग खचितच नाही . शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि तत्कालीन सोवियेत युनियन यांच्या दरम्यान एकमेकांच्या बंदी असलेल्या हेरांच्या झालेल्या देवाणघेवाणीची कथा या चित्रपटात सांगितली आहे . अॅबेल (मार्क रीलांस ) ह्या सोवियेत गुप्तहेराला अमेरिकेत हेरगिरी करताना रंगेहात पकडले जाते . कोर्टात अॅबेलची बाजु मांडण्यासाठी सीआयए ही अमेरिकन गुप्तहेर संघटना जेम्स डोनोवन ( टॉम हॅंक्स) या वकिलाला विनंती करते . आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या सारीपाटावर त्यांना अॅबेलचा वापर करून घ्यायचा असतो . राष्ट्रहित लक्षात घेऊन जेम्स डोनोवनपण अॅबेलची केस स्वीकारतो . जसे  आपल्याकडे दुरकालीन विचार न करता आक्रस्ताळा उजवा राष्ट्रवाद म्हणजेच देशप्रेम असे मानणारे समाजघटक (आठवा याकुब मेननच्या फाशीच्यावेळेस झालेला राष्ट्रीय गदारोळ )आहेत तसे ते अमेरिकेतपण आहेत . ते घटक  जेम्स डोनोवनला गद्दार म्हणुन घोषीत करतात आणि त्यात त्याच्या परिवाराची बऱ्यापैकी परवड होते . पण देशभक्तीच्या संकल्पना नक्की  असणारा जेम्स आपलं कर्तव्य बजावत राहतो . १९६२ मध्ये यु -२ या विमानातुन रशियात टेहेळणी करणारा पॉवर्स या हेराचे विमान रशियाने पाडले आणि पॉवर्सला बंदी बनवले . अमेरिकेचे नाक आंतरराष्ट्रीय पातळीवर कापले जाण्याची वेळ आली . त्यावेळेस देशाच्या मदतीला धावुन आला तो जेम्स डोनोवन. तो या प्रकरणात दोन देशांमध्ये मध्यस्थाची भुमिका बजावतो . त्याच्या यशस्वी मध्यस्थीमुळेच पुर्व बर्लिनच्या एका पुलावर दोन्ही बाजुच्या बंदी हेरांची देवाणघेवाण होते . एका आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग सुटतो . अमेरिकेची प्रतिष्ठा राखली जाते . ती पण एके काळी लोकांनी ज्याला देशद्रोही म्हणून घोषित केले असते अशा माणसाकडून .

टॉम हॅंक्सने नेहमीप्रमाणेच लाजवाब काम केले आहे . पण मला सर्वाधिक आवडला तो अॅबेलच्या भूमिकेतला मार्क रीलांस. वयोवृद्ध रशियन हेराची भुमिका त्याने अप्रतिमरीत्या वठवली आहे . ज्या प्रसंगामध्ये हॅंक्स आणि रीलांस एकमेकासमोर येतात ते प्रसंग म्हणजे प्रेक्षकांसाठी अभिनयाची मेजवानी आहेत . त्यात थोडा का होईना रीलांस सरस ठरतो . या चित्रपटाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः दिग्गज दिग्दर्शक (नो कंट्री फॉर  ओल्ड मॅन  सारखा जबरी चित्रपट ) असणाऱ्या कोएन बंधुनी (इथन कोएन आणि जोएल कोएन ) यांनी या चित्रपटाची बांधेसुद पटकथा लिहिली आहे . हा चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केला असता तर तो पडद्यावर कसा उतरला असता याची तुलना वारंवार मनात चित्रपट पाहताना येत होती. सिनेमेटोग्राफर  कामिन्स्की आणि  संकलक मायकेल काहन हे स्पीलबर्गच्या टीममधले जुने भिडू . या लोकांनी आपली काम नेहमीप्रमाणेच चोख पार पाडली आहेत . विशेष उल्लेख करावा लागेल तो सेट डिझाईन करणाऱ्या टिमचा . मार्को बीटनर आणि त्यांच्या टिमने साठीच्या दशकाचा काळ तंतोतंत उभा केला आहे .


'ब्रिज ऑफ स्पाईज' हा एक चांगला पॉलीटिकल थ्रीलर आहेचं . पण हा चित्रपट राष्ट्रवाद म्हणजे काय , देशभक्तीचे निकष काय आहेत या विषयावर पण अप्रत्यक्ष भाष्य करतो . हल्ली आपल्याकडे आम्ही म्हणु तोच राष्ट्रवाद आणि जो मानणार नाहीत ते राष्ट्रद्रोही अशी एक सरळसोट विभागणी काही लोक करताना दिसतात . कुठल्याही वाईट गोष्टीचा निषेध केला की इतिहासातील मढी उकरून त्यावेळेस तुम्ही कुठे होतात असा भंपक प्रश्न विचारला जातो . या लोकांना आवर्जुन 'ब्रिज ऑफ स्पाईज' दाखवायला हवा  . राष्ट्रवाद हा शॉर्ट टर्म नसतो तर  लॉंन्ग टर्म पण असू शकतो हे सत्य त्यांच्या डोक्यात ठसल तरी खुप आहे . सध्याच्या आपल्या देशातल्या गढूळलेल्या सामाजीक आणि राजकीय वातावरणात हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे हा असलाच तर सुखद योगायोग .

स्टार -तीन 

2 comments: