Sunday, 4 October 2015

सु 'मंगळ ' योग


                                         
          'अॅपल ' कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीवर 'आयपॅड' या आपल्या उत्पादनाची सही सही नक्कल केल्याचा आरोप लावला . मामला कोर्टात गेला . 'अॅपल 'च पारड बरंच जड होत . आणि अचानक केसमध्ये चित्रपटाच्या 'क्लायमॅक्स' मध्ये येतो तसा 'ट्विस्ट ' आला . प्रतिस्पर्धी कंपनीच्या वकिलांनी स्टेनले क्युब्रिकच्या ‘2001 : ए स्पेस ओडेसी’या चित्रपटातला एक प्रसंग कोर्टासमोर पेश केला ,ज्यात दोन अंतराळ यात्री 'आयपॅड' सारख्या चौकोनी आकारांच्या वस्तूचा वापर 'कम्युनिकेशन ' साठी करत असतात . या क्लिपवरून प्रतिस्पर्धी कंपनीने दावा केला की 'आयपॅड' ही संकल्पना खुप जुनी आहे अगदी 'अॅपल ' कंपनीचा जन्म होण्यापूर्वीची .सायफाय कलाकृती (कादंबरी , चित्रपट ,  विज्ञान कथा ई .) या अनेक वेळा मनोरंजनाच्या पलीकडे जाउन भविष्याचा वेध घेतात त्या अशा  . (जय मल्हार या मालिकेत पण  या तंत्राचा वापर दाखवला आहे म्हणे !)अस म्हणतात की मोबाइलचं पहिलं डिझाईन तयार करणाऱ्या मार्टिन कुपरला ती कल्पना एका विज्ञानमालिका पाहून सुचली होती . 'या आठवड्यात प्रदर्शीत झालेला  ‘द मार्शियन’ चित्रपट पण अशाच काही भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या संकल्पना मांडतो आणि सोबत प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतो .

दिग्दर्शक रिडली स्कॉटचं  अंतराळाविषयी असणार 'ऑबसेशन' सर्वविदित आहे . 'एलियन ' चित्रपटमालिका , 'ब्लेडरनर ', 'प्रॉमेथस ' आणि सध्या निर्मिती अवस्थेत असणारा  'प्रॉमेथस 'चा सिक्वल असे अनेक चित्रपट स्कॉटने बनवले आहेत किंवा बनवत आहे ,ज्यात चित्रपटाचे कथानक अंतराळात घडते . त्यामुळे अॅन्डी वीयर या लेखकाच्या ‘द मार्शियन’या कादंबरीवर आधारीत चित्रपट  रिडली स्कॉट करत आहे अशी बातमी आली तेंव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या . मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'इंटरस्टेलर' आणि 'ग्रॅविटी' सारख्या फिल्म्सनी 'बार 'उंचावला असल्याने , आपल्या आवडत्या  'टेरीटरी' मध्ये रिडली स्कॉट  कस प्रदर्शन करतो याबद्दल पण औत्सुक्य होत . रिडली स्कॉटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे स्कॉट पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे . 'एक्सोडस- गॉडस  अॅण्ड किंग्ज ' या महत्वाकांक्षी आणि महागड्या चित्रपटाच्या अपयशानंतर वयोमानानुसार स्कॉट विझत चालला आहे अशी अवाजवी टीका करणाऱ्यांची तोंड काही काळासाठी का होईना बंद पडतील हे नक्की .

‘द मार्शियन’ हा अथांग अंतराळाच्या पार्श्वभूमीवर त्याहूनपण अथांग मानवी जिद्दीची कहाणी सांगतो . नासा मंगळावर माणुस पाठवण्यात यशस्वी होत . पण एका मोठ्या वादळामुळे मंगळावर उतरलेल्या नासाच्या टीमला तिथुन परत फिरावं लागतं . पण या गडबडीत काही गैरसमजुतीमुळे एक अंतराळवीर मार्क वॉटनी (मॅट डेमन) चुकुन मागेच राहतो . त्या भीषण वादळातून  मार्क वाचतो पण तो आता आता या परक्या ग्रहावर एकाकी आहे . पृथ्वीपासून  एकशे चाळीस लाख मैल अंतरावर  . त्याला वाचवण्यासाठी नासाने रेस्क्यु मिशन पाठवले तरी त्याला तिथे पोहोचायला किमान चार वर्ष लागणार आहेत . दुसरा कुणी असता तर त्याने अशा प्रतिकुल परिस्थितीत हात पाय गाळले असता . पण मार्क जिद्दीचा असतो . त्याला काहीही करून पृथ्वीवर आपल्या बायाकामुलांकडे परतायचं असतं . मार्कच्या मंगळावरच्या 'सर्वायवल ' ची कहाणी म्हणजे ‘द मार्शियन’. चित्रपटाच कथानक दोन पातळ्यांवर घडतं . एक म्हणजे मार्कचा मंगळावरचा संघर्ष आणि दुसर म्हणजे पृथ्वीवर एकट्या मार्कला वाचवण्यासाठी पुन्हा मोहीम पाठवावी की नाही यावर नासामध्ये होणारा अंतर्गत वाद विवाद . दोन्ही भाग उत्कंठावर्धक बनवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे . विशेषतः मार्कच्या मंगळावरच्या वास्तव्याचा भाग तर फारच छान जमुन आला आहे . पाणी आणि अन्न या मूलभूत गरजा मार्क कशा भागवतो हे बघताना प्रेक्षकांना मजा येईल . (त्यावेळेस मंगळावर पाणी आहे हा शोध नासाला लागला नव्हता . या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला तो लागला हा जबरी योगायोग .) चित्रपटाच्या बहुतांश भागात मॅट डेमन पडद्यावर दिसतो . त्यातही बहुतेक भागात तो एकटाच दाखवला आहे . खरतर यामुळे प्रेक्षकांना बोर होण्याची शक्यता होती . पण तस होत नाही याच श्रेय मॅट डेमनच्या ताकतीच्या अभिनयाला द्याव लागेल . रोजच्या जगण्याचा संघर्ष विविध पातळ्यावर दाखवताना मॅट डेमनने अभिनयाच्या इतक्या विविध छटा दाखवल्या आहेत . मॅट डेमनच्या करियरमधल्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक आहे . चित्रपटाची अजून एक भक्कम बाजु म्हणजे सहकलाकारांचा अभिनय . खरतर या सहाय्यक भूमिकांना पडद्यावर फारस फुटेज नाही पण रिडली स्कॉटने या प्रत्येक सहाय्यक कलाकाराला पडद्यावर स्वतःचा असा एक मोमेंटम दिला आहे . किंबहुना जेसिका चेस्टम, जेफ डेनियल, मायकेल पेन्ना आणि इतर सहकलाकारांनी चित्रपट चांगला बनण्यात महत्वाचे योगदान दिले आहे .   आता भारतीय प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा 'ट्रीव्हिया'.  रिडली स्कॉटने एका महत्वाच्या सहाय्यक भूमिकेसाठी आपल्या इरफान खानचं नाव नक्की केल होत . पण इरफान 'पिकु ' च्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याला काही या प्रोजेक्टसाठी तारखा द्यायला जमलं नाही . नुकसान कुणाचं झालं ? बहुतेक रिडली स्कॉटचं . चित्रपटात मंगळ ग्रहाच हुबेहूब चित्रीकरण केल आहे . याच श्रेय नासाला द्यायला हव . कारण या चित्रपटाच्या रिसर्च आणि पटकथानिर्मितीसाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे .

ज्याला काही चाकोरीच्या पलीकडच्या मनोरंजनाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाउन ‘द मार्शियन’  पाहावा . अपेक्षाभंग मुळीच होणार नाही .

स्टार -तीन


1 comment:

  1. hello amol really outstanding movie and your article too...

    ReplyDelete