Wednesday, 23 December 2015

संकटकालिन खिडक्या...'दिव्य मराठी ' च्या दिवाळी अंकात आलेलं 'भारतीय बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री ' या विषयावरचा माझा लेख. पहिले एकदा पोस्ट केला होता नंतर पुन्हा डिलीट केला . आता पुन्हा टाकत आहे
डद्यावर चित्रपट सुरू आहे, पण प्रेक्षकांना काही देणंघेणं दिसत नाहीये... थिएटरमध्ये गच्च काळोख भरून राहिला आहे... कुणी ओळखीचा माणूस प्रेक्षकांमध्ये असला तर त्याने आपल्याला ओळखू नये, यासाठी तो अंधार महत्त्वाचा भूमिका बजावतो आहे... थोडक्यात, अंधारामुळे तोंड लपवून फिरण्याची गरज नाहीये. सोबतीला एक अगम्य कुबट वास. पडदा पण फाटलेला... हजर असलेले प्रेक्षक कोपऱ्याच्या ‘सीटा’ पकडून आहेत... त्यात आपल्या शारीरिक गरजांचे काय करावं, हे न समजून तिथे आलेले काही टीनएजर्स, कचरा वेचणारे लोक आणि तत्सम खालच्या आर्थिक वर्गातून आलेले लोक यांचाच मुख्यत्वे प्रेक्षकांमध्ये समावेश आहे... स्त्रियांचं प्रमाण एकदम नगण्य. एखादं दुसरी भडक मेकअप केलेली बाई हजर आहे, तीसुद्धा एखाद्या फाटक्या व्यक्तीसोबत... त्या जोडीला चित्रपट बघण्यापेक्षा त्या गच्च काळोखात इतर गोष्टी करण्यातच जास्त रस आहे... इतक्यात पडद्यावर एखादा ‘तसला’ सीन सुरू होतो आणि एकटे एकटे आलेलं पब्लिक सरसावून बसतं... तो सीन संपतो आणि त्या पब्लिकचा रस संपतो. मध्यंतरापर्यंतच अर्धं थिएटर रिकामं होतं. ती भडक मेकअप केलेली बाई आणि तो फाटका माणूस अजून तग धरून असतात. चित्रपट संपायच्या अगोदर ते पण निघून जातात... शो संपतो... आक्रसलेलं थिएटर पुन्हा त्याच नवीन खेळासाठी सज्ज होतं...
हे चित्र कुठलाही ‘कच्ची कली’, ‘डाकू हसीनाबाई’ किंवा ‘रेशमा की जवानी’ नामक चित्रपट दाखवणाऱ्या जीर्ण शीर्ण चित्रपटगृहात दिसतं. कुठल्याही चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये असणाऱ्या दृश्याच्या एकदम उलट. शेतकरी नेते शरद जोशींनी मांडलेल्या ‘इंडिया आणि भारत’ थिअरीसाठी एक दृश्यात्मक परिमाण निवडायचे असेल तर वर वर्णन केलेले सिंगल स्क्रीन थिएटर आणि मल्टिप्लेक्स यांच्याइतकं समर्पक उदाहरण सापडणार नाही. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची पण एक विशिष्ट उतरंड आहे. या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी आहेत ते ‘बी ग्रेड चित्रपट’ दाखवणारे चित्रपट. जगभरात ‘बी ग्रेड’ चित्रपट म्हणजे, अतिशय कमी पैशात बनलेले, आशय-विषय सामान्य असलेले चित्रपट. पण आपल्याकडे या व्याख्येत अजून एक महत्त्वाचा घटक समाविष्ट होतो, तो म्हणजे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतो म्हणून मुळातच नसलेल्या कथेत टाकलेला, ‘सेक्शुअल कंटेंट’. या प्रकारच्या चित्रपटांना कुठल्याही प्रकारच्या वैश्विक जाणिवा नसतात. गेला बाजार चित्रपट माध्यमाची सामाजिक बांधिलकी वगैरे शब्दबंबाळ विषयांशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना आवडेल, ते देण्याचं असिधाराव्रत पाळत बी ग्रेड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक कार्यरत असतात.

बी ग्रेड चित्रपटांचा इतिहास

भारताला बी ग्रेड सिनेमांचा फार जुना इतिहास आहे. बी. आर. इशारा, आय. एस. जोहर, विनोद तलवार वगैरेे मंडळी यात आघाडीवर होती. पण त्या वेळची बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री आणि आताची बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री यात जमीन- अस्मानाचा फरक आहे. त्या काळातल्या बी ग्रेड चित्रपटांची निर्मितिमूल्ये जरी कमी दर्जाची असली तरी चित्रपटाला कथानक असायचं. चित्रपटातून कधी तरी एखादा ‘सोशल मेसेज’ देण्याचाही संबंधितांचा प्रयत्न असायचा. यात मोठा बदल झाला, तो १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रात के अंधेरे मे’ चित्रपटानंतर. त्या काळाचा विचार करता, त्या चित्रपटामध्ये बराचसा ‘इरॉटिका मसाला’ भरला होता. चित्रपट बऱ्यापैकी चालला. त्या चित्रपटाने थोड्या गुंतवणुकीत जास्त गल्ला गोळा करण्याची आकांक्षा असणाऱ्या अनेक लोकांना संधीची नवी कवाडं उघडून दिली. लैंगिक जाणिवांबद्दल अतिशय भंपक असलेल्या भारतीय समाजात लैंगिक उपासमार होणारे असंख्य लोक असणार आणि आपण त्यांना हवे ते मोठ्या पडद्यावर दाखवायचे, हे त्यामागचे सूत्र होते. नंतर या क्षेत्रात रामसे बंधूंचं आगमन झालं आणि या खेळाचे नियमच बदलून गेले.
एफ. यू. रामसे हे कराचीमधले मोठे प्रस्थ. फाळणीनंतर आपले चंबुगबाळं आवरून रामसे आपली सात मुलं आणि मोठा जामानिमा घेऊन मुंबईला आले. उत्तम बिझनेसमन असणाऱ्या रामसे परिवाराने मुंबईत चांगला जम बसवला. रामसे यांना चित्रपटांचा मोठा शौक होता. त्यांनी ‘शहीद ए आझम भगतसिंग’, ‘रुस्तुम सोहराब’सारख्या मोठ्या बजेटची चित्रपट निर्मिती केली; पण दैवाचे फासे फिरले. हे चित्रपट पडले. दिवाळखोरीची वेळ आली. कर्जाचा डोंगर उभा राहिला. यातून मार्ग कसा काढायचा? रामसेनी प्रोड्यूस केलेल्या ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ चित्रपटात एक प्रसंग होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारे पृथ्वीराज कपूर एक भीतिदायक मुखवटा घालून चोरी करतात आणि मुमताज या अभिनेत्रीला घाबरवतात, असा तो प्रसंग त्या चित्रपटात होता. या ‘भयानक’ प्रसंगातून रामसेंना प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान मिळवून बसलेला आणि नंतर ‘कल्ट’ झालेल्या ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली. केवळ पंधरा लोकांच्या ‘क्रू’ने हा चित्रपट अवघ्या एका महिन्यात हातावेगळा केला. तिकीट खिडकीवर चित्रपट धो धो चालला आणि बी ग्रेड फिल्म्समधले ‘रामसे युग’ सुरू झाले. नंतर रामसे बंधूंनी ‘दरवाजा’सारखे तब्बल ३० लो बजेट भयपट प्रोड्यूस केले. ‘रामसे’ आडनावाचा ब्रँड या प्रकारच्या चित्रपटांशी एवढा जोडला गेला, की काही वेगळं करू पाहणाऱ्या रामसे कुटुंबाच्या पुढच्या पिढीला त्याचंच ओझं होऊ लागलं. या स्वतःच तयार केल्या गेलेल्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटी केशू रामसे या धाकट्या पातीने स्वतःच्या आडनावाला चक्क रजा दिली आणि फक्त केशू या नावाने ‘खिलाडी’ अक्षयकुमारसारखे बडे स्टार घेऊन ए ग्रेडची चित्रपटनिर्मिती सुरू केली.
तत्कालीन बी ग्रेड चित्रपट निर्मात्यांपैकी अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे जोगिंदर. ६५ वर्षांचा जोगिंदर २००९ मध्ये आपल्या जुहूमधील घरात मरण पावला, तेव्हा वर्तमानपत्रांत आतल्या पानावर त्याच्या मृत्यूची सिंगल कॉलम बातमी आली होती. पण एकेकाळी या जोगिंदरने सातत्याने बी ग्रेड हिट चित्रपट दिले होते. जोगिंदर हा एकाच वेळेस निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संकलक आणि अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडायचा. तो ‘रंगा खुश’ या आपल्या पडद्यावर साकारलेल्या चरित्र भूमिकेच्या नावाने पण ओळखला जायचा. ‘Its so bad that it’s good’ या सिंड्रोमची रेलचेल त्याच्या चित्रपटात होती. ‘प्यासा शैतान’, ‘रंगा खुश’, ‘बिंदिया और बंदुक’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. रद्दड कथा, उन्मुक्त अंगप्रदर्शन, दर पाच मिनिटाला येणारी गाणी ही जोगिंदरच्या चित्रपटांची काही व्यवच्छेदक लक्षणं. त्याच्या ‘प्यासा शैतान’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत चक्क कमल हसन होता. मूड ऑफ असेल तर यूट्यूबवर जाऊन जोगिंदरच्या चित्रपटांच्या क्लिप पाहा. हसून हसून तबियत खुश होऊन जाईल. विशेषतः जोगिंदरच्या लोटा डान्सची क्लिप तर अफलातून विनोदी या श्रेणीतली आहे.
बी. आर. इशारा हे या प्रभावळीमधले अजून एक मोठं नाव. भारतीय चित्रपटामध्ये सेक्स आणि अतिशय बोल्ड संवाद आणण्याचं श्रेय बी. आर. इशारांचे. पु .ल . देशपांडे यांच्या भाषेत भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ने मराठी सारस्वतांना डुलक्या घेताना पकडले, अगदी त्याचप्रमाणे पोरकट आणि सपक प्रेमकथांच्या विळख्यात अडकलेल्या बॉलीवूडला बी. आर. इशारा यांच्या ‘चेतना’ चित्रपटाने गदागदा हलवून झोपेतून उठवले. ‘चेतना’ चित्रपटाच्या पोस्टरवर शरीराचं प्रदर्शन करणारी रेहाना म्हणजे, मोठा बॉम्बगोळा होता. बी. आर. इशारांचे चित्रपट कमी बजेटचेे आणि बोल्ड कंटेंटवाले असले तरी त्या चित्रपटाना किमान कथानक असायचं. सामाजिक संदेश असायचा. समाजात असणाऱ्या सेक्सविषयक दुहेरी मापदंडांवर कोरडे ओढलेले असायचे.

कांती शहा नावाचं कल्ट

रामसे बंधू जर बी ग्रेड फिल्मचा भूतकाळ असतील, तर कांती शहा हा वर्तमानकाळ आहे. अनेक लोक त्याला ‘बी ग्रेड फिल्म्सचा करण जोहर’ म्हणूनही हिणवतात. कांती शहाने तब्बल ९० चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. अनेक प्रेक्षकांना कांती शहा माहीत आहे, तो त्याच्या कल्ट क्लासिक ‘गुंडा’ या फिल्ममुळे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स व अतिशय वाईट तांत्रिक बाजू असते, तेव्हा ‘गुंडा’सारखा चित्रपट तयार होतो.आज IMBD सारख्या वेबसाइटवर ‘गुंडा’च मानांकन रणबीरच्या ‘रॉकस्टार’, विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’, आणि चक्क ‘शोले’पेक्षा पण जास्त आहे. खरं तर ‘गुंडा’चा दिग्दर्शक हीच कांती शहाची ओळख करून देणे म्हणजे, त्याच्यावर अन्याय होईल. ‘डाकू मुन्नीबाई’, ‘गरम’, ‘कांती शहा के अंगूर’, ‘लोहा’, ‘शीला की जवानी’ या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. विक्रमादित्य मोटवानीच्या गाजलेल्या ‘उडान’ या चित्रपटात, ‘कांती शहा के अंगूर’ या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होतो. ‘उडान’मधला टीनएजर नायक आणि त्याच्या मित्रांच्या लैंगिक जाणिवांचा, तो चित्रपट एक अविभाज्य हिस्सा असतो .
छोट्या आणि सेमी-अर्बन भागात कांती शहाच्या चित्रपटांना आजही लाखोंचा चाहता वर्ग आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. कांती शहाला तुम्ही यशस्वी मानत असाल, तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. ही कांती शहाची बायको. पण ती कांती शहाच्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही, तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर पण भरपूर ‘योगदान’ दिले आहे. कांती शहाच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे.
कांती शहाने त्याच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत धर्मेंद्र, मिथुन, गोविंदा, मनीषा कोईराला अशा ‘ए ग्रेड’ अभिनेत्यांसोबत पण काम केलं आहे. अर्थात,‘बी ग्रेड’ चित्रपटात काम करणारे मोठे अभिनेते हा स्वतंत्र लेखाचा विषय. राजेश खन्नाने आपल्या पडत्या काळात ‘वफा’ नावाचा एक तद्दन ‘बी ग्रेड’ चित्रपट केला होता. त्यात त्याने केलेले काही सीन्स पाहून त्याच्या चाहत्यांवर वीज पडेल. तीच गोष्ट उर्वशी ढोलकिया या ‘बिग बॉस’च्या विजेतीची. या प्रकारच्या चित्रपटात काम करणाऱ्या आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्री सपना, पूनम दास गुप्ता, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा या आहेत.H

दाक्षिणात्य स्कूल

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपले वेगळेपण उर्वरित किंवा उत्तर भारतापासून वेगळे ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असो दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. सिनेमा क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. दाक्षिणात्य प्रादेशिक ‘बी ग्रेड’ चित्रपट (तेलुगू, मल्याळम, तामिळ) हे आपल्या उत्तर भारतीय जातभाईपेक्षा अधिक धीट, अधिक बोल्ड असतात. त्याच्या या बोल्ड कंटेटमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून ते देशभरात बघितले जातात. रेशमा, शकीला, देवी या अशा चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रींना देशभर मोठी लोकप्रियता आहे.

बी ग्रेड ची ‘सोशिओलॉजी’

चित्रपट बघायला येणाऱ्या दर्शकांची एक सोशिओलॉजी असते. सलमान खानच्या चित्रपटात टाळ्या-शिट्ट्यांचा गजर चालू असतो. त्यातून त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग कुठल्या वयोगटातला आहे, कुठल्या सामाजिक वर्गातून आला आहे, याचा अंदाज बांधता येतो. हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे, व्हाइट कॉलर, बहुधा उच्चवर्गातून आलेला, असा एक ‘स्टिरिओटाइप’ आहे. अर्थातच, हे काही आखीव नियम नाहीत, तर ढोबळमानाने मांडलेले अंदाज आहेत.
बी ग्रेड फिल्म आणि या फिल्म्स ज्या चित्रपटगृहात लागतात, त्या थिएटरची पण स्वतःची ‘सोशिओलॉजी आहे. साधारणपणे या प्रकारच्या चित्रपटांना येणारा प्रेक्षक, हा समाजाच्या खालच्या आर्थिक स्तरातला. शारीरिक श्रम करून जगणारा असतो. स्वस्तात दोन घडी विरंगुळा म्हणून तो इथे येतो. मल्टिप्लेक्स आणि मोठे चकचकीत मॉल, इथे त्याला कागदोपत्री नसली तरी अघोषित प्रवेशबंदी असते. हे घाणेरडे, मळके कपडे घातलेले लोक आणि त्यांची शेंबडी चिल्लीपिल्ली ही मल्टिप्लेक्स आणि मॉलच्या व्यवस्थापनाला आपल्या अधिकारक्षेत्रात नको असतात. कितीही कटू असलं, तरी हे आपलं आजच सामाजिक वास्तव आहे. निशिकांत कामतच्या ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटात या विषयावर सुंदर भाष्य केले आहे. या प्रेक्षकाला बी ग्रेड फिल्म्स दाखवणाऱ्या चित्रपटगृहात राजरोस जाता येतं. कुठेही पाय पसरून बसता येतं. या चित्रपटांच्या प्रेक्षकांत टीनएजर्सचा अधिक भरणा असतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, असतातं. मध्येच एखादं समलैंगिक जोडपं येतं. समाजात ज्या गोष्टी राजरोस करायला परवानगी नाही त्या करण्याची परवानगी हा चित्रपटातला कुबट काळोख देतो. एकप्रकारे ही चित्रपटगृहे आपल्या समाजव्यवस्थेच्या ‘संकटकालीन खिडक्या’ असतात. आपल्या समाजाबद्दल आणि त्याच्या संस्कारीपणाबद्दल ज्यांच्या भ्रामक कल्पना आहेत, त्यांना या परिसरात फिरवून आणावे. त्यांची संस्कारीपणाची पुटं गळून पडतील. समाजातला मध्यमवर्ग या थिएटरकडे लांबूनच पाहत असतो. मनात प्रचंड औत्सुक्य असलं, तरी चेहऱ्यावर तुच्छता दाखवायचं कसब यांना साधलेलं असतं. हे लोक कधी इकडे फिरकत नाहीत. चुकून कुणी फिरकलाच, तर कुणी पाहिलं, तर लोक काय म्हणतील या टिपिकल मध्यमवर्गीय गंडाने तोंड लपवत फिरतात...

माध्यमबदल

बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा एकुणच पॉर्न पाहण्याच्या किंवा अनुभवण्याच्या माध्यमांमध्ये होणारे बदल पाहणे रोचक आहे . कारण यात एक देश म्हणुन आपण कसे बदलत गेलो आहोत याच प्रतिबिंब त्या प्रवासात पडल आहे . किंवा ज्याला म्हणुन भारताच्या सामाजिक बदलांचा अभ्यास करायचा आहे त्याने याचा पण अभ्यास करणे आवश्यक आहे . १९९० च्या सुमारास आपल्या दरवाजावर आर्थिक उदारीकरण उभं ठाकल . त्यावेळेस तारुण्यात पदार्पण करत असलेल्या पिढीला पडद्यावर दोन फुलांचं एकमेकांना मिळण किंवा भुंगा फुलावर बसण या मेनस्ट्रीम फिल्म्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या भंपक सांकेतिक दृश्यांना पाहणे यापलिकडे जास्त वाव नव्हता . मग मित्रांच्या टोळीमध्ये डेबोनायर चे जुने अंक बघणे किंवा बस स्थानकावर मिळणारे पिवळे साहित्य मिळवून ते वाचणे याला पर्याय नसायचा . जास्त हिम्मत असणाऱ्या आणि खिशात थोडे पैसे असणाऱ्यांसाठी थियेटरमध्ये मॉर्निंग शो ला असणारे इंग्रजी चित्रपट हे पण चोरून मारून बघणे हा एक पर्याय असायचा . २००० सालानंतर सर्वच बदलांचा वेग प्रचंड वाढला . तंत्रज्ञान पण बदलले . आता जमाना सीडी आणि फ्लॉपीचा होता . चोरून बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा पॉर्न सिनेमाच्या सीडी विकत घेणे आणि आपल्या कम्प्युटर वर बघणे ही गोष्ट त्या काळात सामान्य होती . अर्थशास्त्रात एक संरचनात्मक बेकारी नावाचा प्रकार आहे . तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला अर्थशास्त्रात संरचनात्मक बेकारी म्हणतात . तर तंत्रज्ञानात झालेल्या बदलाचा फटका या केसमध्ये बस स्थानकावर पिवळे साहित्य विकणारे विक्रेते आणि हिट आणि हॉट चित्रपटांच्या मॉर्निंग शो ला बसला . नंतर वाजपेयी सरकारच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट क्रांती होऊन या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या . अनेक देशी विदेशी पॉर्न साईट्स भारतात लोकांना उपलब्ध झाल्या . मात्र त्याचा फटका आता सीडी विक्रेत्यांना बसला . रस्त्यावर बसुन ढिगाने सीडी विकणारे विक्रेते गायब झाले . २०१० च्या सुमारास स्मार्ट फोन चा उदय झाला . वाय फायची सुविधा झाली . आता बी ग्रेड सेमी पॉर्न किंवा पॉर्न एका क्लिक वर मिळायला लागलं . टोरेन्ट वरून या फिल्म्स डाऊनलोड करण्याचा पर्याय पण आता उपलब्ध झाला . २०१४ च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने काळाची चक्र माग फिरवली . 'Moral Nanny' बनण्याचा प्रयत्न करत या सरकारने तब्बल ८५७ पॉर्न साईट्सवर बंदी आणली आहे .या निर्णयाविरुद्ध अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या . पण आपण पॉर्न पाहतो ही गोष्ट पण चारचौघात कबुल करण्याची हिंमत नसणाऱ्या समाजात याला फारसा उघड विरोध होईल असे वाटत नाही . आता बस स्थानकावर पिवळ साहित्य विकणारे विक्रेते पुन्हा अवतरतील. बेकायदेशीर सीडीचा व्यवसाय जोरात चालु होईल . कारण पॉर्न पाहणे ही अशी वृत्ती आहे जिला मोदीच काय पण अस्तित्वात असेल तर परमेश्वर पण थांबवु शकत नाही . हेच आपल्या समाजाच वास्तव आहे .

अंधकारमय भविष्यकाळ

पण, काळ बदलत आहे. चित्रपटसृष्टीची गणितं पण बदलत चालली आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीपाठोपाठ आलेल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीने सर्व समीकरणं बदलून टाकली आहेत. त्याचा फटका ‘बी ग्रेड’ फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे. कोट्यवधी रुपयांचं बजेट असणारे मल्टिप्लेक्स आणि हे जीर्णशीर्ण सिंगल स्क्रीन थिएटर्स हा लढाच खूप विषम शक्तींमधला लढा आहे. खूपसा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातला लढा. डिजिटल क्रांतीच्या या काळात बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला निभाव लागणं अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या दशकापर्यंत ही इंडस्ट्री व्यावसायिकदृष्टया नामशेषही झाली असेल. १९९२ पासून सुुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे देशावर अनेक चांगले आणि काही वाईट परिणाम झाले. परिणामापैकी एक म्हणजे, तंत्रज्ञानात भोवंडून टाकणाऱ्या गतीने होणारे बदल. दूरसंचार क्षेत्रात तर अभूतपूर्व बदल झाले. विशेषतः २००० सालानंतर या क्षेत्रात अनेक बदल होऊन हे क्षेत्र पीपल फ्रेंडली बनले. बहुतेक लोकांच्या हाती मोबाइल खेळू लागले. त्यामध्ये इंटरनेटची सोय होती. याचाही जीवघेणा फटका बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला बसला. यापूर्वी असे चित्रपट किंवा त्यातले विशिष्ट ‘प्रसंग’ बघायला लोकांना थिएटरमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ पार्लरकडे जावं लागत असे. आता हे सगळं मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बी ग्रेड फिल्म बघण्याचा प्रेक्षकांचा ओघ आटू लागला आहे.

या सगळ्याला भारतीय लोकांच्या वर्णगंडाचा एक पैलू आहे. भारतीय पुरुषाच्या मनाला असणार गोऱ्या कातडीचं आकर्षण हे आपल्या वर्णवादी समाजाचं एक उघड गुपित आहे. भारतात आता वेगवेळ्या पोर्न साइट्स उपलब्ध आहेत. गोरी कातडी आणि गोऱ्या स्त्रिया यांचं आकर्षण असणारा भारतीय पुरुष आता भारतीय बी ग्रेड चित्रपटातल्या भारतीय अभिनेत्रींना पाहण्यास फारसा उत्सुक नाही. सनी लियोनसारखी पोर्न चित्रपटात काम केलेली अभिनेत्री भारतात येते, आणि लगेच बॉलीवूडमध्ये जम बसवते ही एका रात्रीत घडणारी घटना नाही. त्या अगोदर झालेल्या मोबाइल क्रांतीने तिला अगोदरच घराघरात पोहोचवले होते. उडत्या पक्षाची पिसं मोजणाऱ्या बॉलीवूड निर्मात्यांनी तिच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवून गल्ला भरण्यासाठी फक्त तिला जमीन मिळवून दिली. २००० सालानंतर झालेल्या दूरसंपर्क क्रांतीला लागलेलं सनी लियोन हे एक फळ आहे.
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर’ उर्फ बोलट ही व्यक्तिरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत... ‘जनू ‘बोलट’ होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते, तो नट आणि बाकीचे ‘बोलट’, अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता, कोण जाणे, परंतु जनू हा त्या कोटीचा बळी होता...’ हे बी ग्रेड चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम त्यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी नोंद घेतली गेली नाही. खुद्द बॉलीवूडने यांच्याकडे एखादी सावत्र आई आपल्या मुलाकडे करेल, तसे दुर्लक्ष केले. मागच्याच वर्षी अशीम अहलुवालिया या दिग्दर्शकाने भारतीय बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीचे पडद्यामागचे भेदक वास्तव दाखवणारा ‘मिस लवली’ नावाचा नितांतसुंदर चित्रपट तयार केला. सुजाण प्रेक्षकांनी तो नक्की पाहावा. पण हा अपवाद म्हणजे, नियम सिद्ध करणारा अपवाद. बी ग्रेड चित्रपट हे माझ्यासारख्या छोट्या शहरातून आलेल्या लाखो लोकांच्या अनुभवविश्वाचा अविभाज्य हिस्सा. हा विषय तसा ‘टॅबू’ म्हणून गणला गेला असल्याने चार लोकांत या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही, म्हणून या विषयाचं गांभीर्य कमी होत नाही की वास्तव लपत नाही.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिल्या मानाच्या प्रभावळीत या चित्रपटांना जागा नसेल; पण सर्वात शेवटच्या रांगेत तरी हजारी मनसबदार म्हणून एक मानाचे पान त्याच्यासाठी नक्कीच राखून ठेवलेलं असेल.

No comments:

Post a Comment