Sunday, 31 January 2016

प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे


सध्या टेलीविजनवर साऊथ डब चित्रपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात . त्यातला एक चित्रपट पाहण्यात आला . एक स्थानिक 'तेलुगु ' डॉन (नागार्जुन ) एका पाकिस्तानी डॉनचे तिथे बस्तान मांडण्याचा बेत कसा उधळून लावतो अस काहिस कथानक होत . काही दिवसांनी मला त्या चित्रपटाची 'तेलुगु ' प्रत बघण्याची संधी मिळाली . मूळ 'तेलुगु ' सिनेमा बघितल्यावर मला धक्का बसला . कारण डब वर्जन मध्ये पाकिस्तानमधून आलेला खलनायक मूळ तेलुगु सिनेमात मुंबईवरून आलेला दाखवला होता . हे थोड धक्कादायक होत .


भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणाऱ्या अजस्त्र  देशात  एक भारतीय राष्ट्रवाद आहेच पण प्रत्येक राज्याचा एक प्रादेशिक राष्ट्रवाद पण अस्तित्वात आहे . जस की 'तमिळ राष्ट्रवाद ' , 'पंजाबी राष्ट्रवाद ', मराठी राष्ट्रवाद , काश्मिरी राष्ट्रवाद ई . द्रमुक -अण्णा द्रमुक , शिवसेना -मनसे , अकाली दल  हे आक्रमक पक्ष या प्रादेशिक राष्ट्रवादाच्या वृक्षाला लागलेलीच फळ आहेत . अनेकदा त्यांचा प्रादेशिक राष्ट्रवाद हा राजकीय अपरिहार्यतेमुळे भारतीय राष्ट्रवादाला वरचढ ठरतो . अनेकदा हे प्रादेशिक पक्ष केंद्रीय राष्ट्रीय धोरणांपासून फटकून वेगळ्या धोरणाला पाठींबा देताना दिसतात . सिनेमा हा मनोरंजनाच साधन तर आहेचं पण प्रपोगंडाच पण एक महत्वाचं साधन आहे त्यामुळे प्रादेशिक सिनेमामधून पण आक्रमक प्रादेशिक राष्ट्रवादाचा उघड पुरस्कार होताना दिसतो . 
स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपले वेगळेपण उर्वरित किंवा उत्तर भारतापासून वेगळे ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असो दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका ठेवली आहे. सिनेमा क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट 'मद्रास कॅफे ' च्या प्रदर्शनाला तामिळनाडू मध्ये जोरदार विरोध झाला होता . कारण त्यामध्ये प्रभाकरन या तमिळ ईलम साठी लढा देणाऱ्या नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होत . राजीव गांधी यांची निर्घुण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरन बद्दल देशात संतापाची भावना असली तरी तामिळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे हे एक उघड गुपित आहे . अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्ष पण प्रो -प्रभाकरन होता . मागच्याच वर्षी श्रीलंकन सेनेने निर्घुणपणे ज्याची हत्या केली होती त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामिळनाडूमध्ये चित्रपट आला होता . 2014 मध्ये पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांच उदात्तीकरण करणाऱ्या   'कौम दे हिरे ' या चित्रपटावरून मोठ वादळ उठल होत . भिंद्रनवाले आणि खलिस्तान चळवळीबद्दल ममत्व बाळगणारा एक मोठा वर्ग आजही पंजाबमध्ये आहे .कधी कधी हे प्रादेशिक राष्ट्रवाद एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकतात . महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बनलेल्या 'मराठा टायगर्स ' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून चालू असलेला वाद हे याचे उदाहरण . या सिनेमाच्या निमित्ताने कन्नड अस्मिता आणि मराठी अस्मिता यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे .

दाक्षिणात्य चित्रपटांचा बारकाईने अभ्यास केला तर काही तथ्य समोर येतात . एकूणच तेलुगु , तमिळ ,मल्याळम फिल्म्समध्ये सध्या उत्तर भारतीय आणि मराठी खलनायकांची चलती आहे . आशिष विद्यार्थी , महेश मांजरेकर , राहुल देव , मुकेश ऋषी , प्रदीप रावत , सोनु सूद अशी अशी ही ' खलनायकांची लांबलचक यादी आहे .या यादीत सर्वात नवीन नाव म्हणजे अक्षय कुमार. रजनीकांतच्या पुढच्या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका बजावणार आहे .  उंचीने कमी असणारा, फारसा शारीरिकदृष्ट्या  फिट नसणारा मिशाळ दाक्षिणात्य नायक जेंव्हा आपल्यापेक्षा धिप्पाड 'उपऱ्या ' खलनायकाला आपटून आपटून मारतो तेंव्हा दाक्षिणात्य प्रेक्षक जबरदस्त खुश होतो . बऱ्याचदा  राष्ट्रवादाचा मार्ग हा पुरुषी मनोवृत्तीतून जातो . दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सध्या उत्तर भारतीय आणि पंजाबी नायिकांचा बोलबाला आहे . राकुल प्रीत सिंग ,  तमन्ना , हंसिका मोटवानी , काजल अगरवाल या नट्या सध्या खुप लोकप्रिय आहेत . राकट रावडी दाक्षिणात्य नायक जेंव्हा हाय क्लास -इंग्रजी झाडणाऱ्या नायिकेला धडा शिकवून नायिकेला त्याच्या  प्रेमात पडायला मजबूर करतो तेंव्हा प्रादेशिक राष्ट्रवादाच्या पुरुषी अहमला सुखावण्याचा तो प्रकार असतो .

हाच कित्ता बॉलीवूड चित्रपटपण गिरवताना दिसतात . बॉलीवूड मुंबईमध्ये असलं तरी त्यांच्या सिनेमामधून मुख्यतः पंजाबी आणि हिंदी संस्कृतीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो . पंजाबी संस्कृतीचा बॉलीवूड सिनेमामधून अजीर्ण होईपर्यंत भडीमार केला जातो . पंजाबी ठेक्याची गाणी , पंजाबी शब्दरचना असणारी गाणी , भांगडा नृत्य , पंजाबी विवाह सोहळे यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव भारतीय समाज जीवनावर पडताना दिसतो . अगदी महाराष्ट्रात पण आपल्या आजूबाजूला होणारे विवाहसोहळे  पाहिले तरी याची चुणूक दिसेल . विख्यात पत्रकार आणि समीक्षिका अनुपमा चोप्राने याच  'बॉलीवूडचं पंजाबीकरण ' अस सार्थ नामकरण केल आहे . ह्या बॉलीवूड सिनेमांनी बिगर हिंदी लोकांची हास्यास्पद 'स्टेरियोटाइप्स ' तयार केली आहेत . यांच्या सिनेमामधली  दाक्षिणात्य पात्र लुंगी नेसणारी , केसाळ , ओंगळ आणि विचित्र हिंदी उच्चार असणारी असतात . ख्रिश्चन पात्र 'हे मॅन ' अस पालुपद प्रत्येक वाक्यमागे लावून बोलत असतात. गुजराती पात्र कंजूष दाखवलेली असतात . कामवाली बाई हमखास मराठी असते . शिवाय ज्याच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो अस एखाद देशभक्त मुस्लिम पात्र हटकून हजर असतच . थोडक्यात सांगायचं तर 'हिंदी बेल्ट ' मधून आलेले लेखक -दिग्दर्शक उर्वरित भारतीय लोकांकडे कसे पाहतात हे हिंदी चित्रपटामधून कळत .

मराठी सिनेमामधून पण आक्रमक 'मराठी राष्ट्रवादाचा ' पुरस्कार होताना दिसतो . 'मी शिवाजीराजे भोसले  बोलतोय '  या चित्रपटामध्ये मराठी भूमिपुत्राविरुद्ध गुजराती -मारवाडी बिल्डरकडून होणाऱ्या अन्याय दाखवण्यात आला होता . 'गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा ' ही फिलॉसोफी या चित्रपटात मांडली होती .'कॅरी ऑन मराठा ' या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या प्रेमकथेत मराठी नायक कन्नड नायिकेच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या प्रेमाला आडवे जाणाऱ्या सर्व कन्नड खलनायकांना ठोकून काढतो . अवधूत गुप्तेच्या 'जय महाराष्ट्र ढाबा ,भटिंडा ' चित्रपटात नायक पंजाबमध्ये मराठी ढाबा उघडतो आणि पंजाबी नायिकेच्या प्रेमात पण पडतो .

भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि अंगावर येणारी विविधता असणाऱ्या देशात कुठलाही माणूस अनेक 'आयडेनटिटिज ' घेऊन वावरत असतो . त्याची 'आयडेनटिटि' भारतीय म्हणून तर असतेच पण ती एखाद्या भाषासमुहाची , जातीची , धर्माची आणि राज्याची पण असते . अनेक देशाच्या लोकांना 'आयडेनटिटि क्रायसिस ' ची समस्या भेडसावत असताना आपल्याकडे मात्र इतक्या साऱ्या आयडेनटिटिज घेऊन भारतीय नागरिक लिलया वावरतो . समाजाचा आरसा म्हणून घेणाऱ्या चित्रपट माध्यमात याच प्रतिबिंब पडणे स्वाभाविकच आहे . त्यामुळे जोपर्यंत देशात हि विविधता आहे तोपर्यंत चित्रपटामधून पण प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे वाजत राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे . हे चांगल का वाईट हे ज्याचं त्यान ठरवावं .

Tuesday, 26 January 2016

बॉलीवूडचे ‘बोलट’

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल. असाच एक ‘तो', काही वर्षांपूर्वी मुंबईमधल्या आमदार निवासात मुक्काम ठोकायचा प्रसंग आलेला तेव्हा माझ्या बाजूला सतरंजीवर अंगाचं मुटकुळं करून झोपला होता. त्याने ‘सत्या'मध्ये होम मिनिस्टरचा रोल केला होता. मी त्याला ओळखलं आणि त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आपल्याला पण ओळखणारे लोक आहेत, हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं शिल्लक होतं. "एमएलए साबके पीए को कभी कभार शूटिंग दिखाने ले जाता हूँ, तो रात को सोने का प्रबंध हो जाता है।’ शुद्ध तुपातल्या हिंदीमध्ये त्याने मला सांगितलं होतं. ‘आगे क्या?’ या माझ्या प्रश्नावर स्वस्त सिगारेटचा झुरका घेत तो शून्यात बघत बसला होता...
एखाद-दुसऱ्या प्रसंगांपुरते हजेरी लावून जाणारे अभिनेते, हा बॉलीवूडमधला अतिशय दुर्लक्षित विषय आहे. व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असणाऱ्या देशात हे तसं स्वाभाविकच. हे लोक नव्वदच्या दशकातल्या सिनेमांमध्ये खूपदा दिसतात. या लोकांना आयुष्यात एकदाही मुख्य भूमिका मिळत नाही. हे लोक बहुधा मुख्य खलनायकाचे ‘साइड किक' असतात. काही बिनमहत्त्वाचे संवाद, जमलं तर बलात्काराचा एखादा प्रयत्न, तीन-चार विकट हास्य आणि यांचा पडद्यावरचा खेळ खतम!
अभिनयाला उपजीविका बनवण्याचा निर्णय घेताना यांच्या डोक्यात नेमकं काय होतं, याचं कुतूहल मला नेहमी वाटतं. लोक यांना फक्त चेहऱ्याने ओळखतात, नावाने नाही! एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असू शकते? खलनायक किंवा पडद्याला व्यापून दशांगुळे उरलेल्या नायकांच्या वटवृक्षात ही रोपटी कायमची खुरटून गेलेली असतात...
या संदर्भात, सर्वात प्रथम आठवतो तो महावीर शाह. काही लोकांच्या चेहऱ्यावरच खलनायक असं लिहिलेलं असतं. महावीर शाह त्यांच्यापैकी एक होता. त्याने चुकून एकदा सलमान खानच्या ‘जुडवा' चित्रपटामध्ये एका सज्जन पोलिस ऑफिसरची भूमिका केली होती, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत (म्हणजे पडद्यावर त्याची हत्या होईपर्यंत) हा कधी ‘कलटी' मारतो, याची भीती वाटत होती. मध्ये अझीझ मिर्झा आणि शाहरुख खानच्या चित्रपटांचं पेव फुटलं होतं, त्यात हा हमखास असायचा. हा २०००मध्ये एका अपघातात मेला. काही वर्तमानपत्रांनी चौथ्या-पाचव्या पानावर ही बातमी छापली. महावीर शाह या दुर्लक्षित अभिनेत्याची प्रसारमाध्यमांनी घेतलेली ही पहिली आणि शेवटची दखल.
शोले’मध्ये मॅकमोहनचा दुसरा संवाद कुठला, ते सांगा? असा क्रूर विनोद मध्यंतरी फिरत होता. क्रूर या अर्थाने की, आयुष्यातली चाळीस वर्षं फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवून पण या माणसाचा ‘शोले' तर जाऊच दे, इतर कुठल्याही चित्रपटामधला दुसरा संवाद पण कुणाला माहीत नाही. (खरं तर ‘शोले'मध्येच ‘चल बे जंगा, चीडी की रानी है’ असा संवाद इतर डाकूंसोबत पत्ते खेळताना तो बोलतो). आपला चित्रपटामधला रोल खूप लहान आहे, म्हणून स्वतः मॅकमोहनने आयुष्यात कधीच ‘शोले’ बघितला नाही. क्रिकेटर बनण्यासाठी मुंबईला आलेला मॅकमोहन कायम चित्रपटात दुय्यम-तिय्यम भूमिका बजावत राहिला. तो गेला तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला इनमिन दहा लोक होते...
या यादीत महिला कलाकार पण आहेत. सगळ्यात पहिलं आठवतं, ते नाव मनोरमाचं. हिचं खरं नाव एरिन इसाक डॅनियल. ही मूळची लाहोरची. हिरोइन बनण्यासाठी मुंबईला आली. हिचा अवतार बघून हिला कोण मुख्य अभिनेत्रीचं काम देणार? मग हिने मिळतील त्या फुटकळ भूमिका करायला सुरुवात केली. पण हिचा अभिनयाचा सेन्स उत्तम होता. ‘सीता और गीता’मधल्या हेमामालिनीच्या खाष्ट काकूच्या भूमिकेत हिने मस्त रंग भरले. ‘नया दिन, नयी रात’मधली हिची छोटी, पण छान भूमिका चित्रपट रसिक लक्षात ठेवतील. सुंदर आणि सडपातळ नसल्याचा फटका हिला बसला आणि आयुष्यभर ‘फुल फ्लेज’ म्हणावी, अशी एक पण भूमिका हिला मिळाली नाही.
रझ्झाक खान म्हटल्यावर प्रेक्षक "कोण हा?' असे विचारतील. दुर्दैवाने लोक याला ‘गुंडा’ चित्रपटातल्या त्याच्या ‘लकी चिकना’ या विचित्र नावाच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखतात. अक्षय कुमारच्या ‘मोहरा’मध्ये त्याने एका उपखलनायकाची आणि त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव सिरियस भूमिका केली होती. गोविंदाच्या नव्वदच्या दशकामधल्या चित्रपटात हा हमखास हजर असायचा. पण सध्या चित्रपटांमध्ये त्याच्यासारख्या अतरंगी नटाला स्पेसच राहिलेली नाही...
बॉब क्रिस्टो. ‘विदेशी स्मगलर’चा बॉलिवूडी चेहरा. पडद्यावर सगळ्यात जास्त मार खाणारा इसम म्हणून याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’मध्ये नोंद होऊ शकते. सिडनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असणारा हा उंचापुरा माणूस, झिनत अमानच्या प्रेमापोटी (अर्थातच एकतर्फी) मुंबईला आला आणि इथलाच झाला. ‘स्मगलर’च्या भूमिकेत टाईपकास्ट झाल्यामुळे याला ठरावीक लांबीच्या आणि वकुबाच्या भूमिका मिळत गेल्या. ‘मिस्टर इंडिया'मधली याची भूमिका त्यातल्या त्यात गाजली. मिस्टर इंडिया याला हनुमानाच्या मूर्तीने मारतो, तेव्हा त्यात आता ‘धार्मिक राष्ट्रवाद' शोधणारं पब्लिक टाळ्या पिटायचं.
कांती शाहचा ‘It's so bad, that it's good’ सिंड्रोममुळे प्रेक्षकप्रिय असलेला ‘गुंडा’ चित्रपट म्हणजे या ‘साइड किक’चे जागतिक संमेलन होते. लंबू आटाच्या भूमिकेमधला इशरत अली, इबु हटेलाच्या भूमिकेमधला हरीश पटेल, इन्स्पेक्टर काळेच्या भूमिकेमधला राणा जंग बहादूर, काला शेट्टीच्या भूमिकेमधला रामी रेड्डी, बचुभाई भिगोनाच्या भूमिकेतले दीपक शिर्के, लकी चिकनाच्या भूमिकेमधला रझ्झाक खान अशी उपखलनायकांची मांदियाळी या चित्रपटात उसळली होती.
अजूनही कित्येक नावं आहेत. तेज सप्रु, महेश आनंद, राणा जंगबहादूर, पिंचू कपूर, पद्मा खन्ना किती नावं घ्यावीत. हल्ली खलनायकाचे ‘साइड किक' ही गोष्ट आपल्या चित्रपटामधून नामशेष होत आहे. कारण मुळात ‘खलनायक’ ही संस्थाच नामशेष होत चालली आहे. ती का नामशेष होत आहे, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. मागच्या पाच वर्षांतला एक प्रभावी खलनायक सांगा म्हटलं तर कुठलं नाव आठवतं? एखादा प्रकाश राज सोडला तर दुसरं नावं आठवणार नाही. मग मुळात खलनायकच नसेल तर त्याचे ‘साइड किक' कुठून दिसणार?
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली'मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट ही एक व्यक्तिरेखा होती. पुलंच्या शब्दांत... जनू ‘बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे ‘बोलट', अशी एक विष्णूदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे; परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता... हे ‘साइड किक' अभिनेते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी धड नोंद पण घेतली गेली नाही. बॉलीवूड म्हणजे सुपरस्टार्स, हिरो-हिरोईनची लफडी, करोडोंची आकडेमोड नाही तर अनेक तुटलेल्या आणि कधीच पूर्ण न झालेल्या शेकडो स्वप्नांची कब्रस्तान पण आहे. आपल्या मर्यादित वकुबाने बॉलीवूडला पुरेपूर योगदान देणाऱ्या आणि कधीच श्रेय न मिळालेल्या अभिनेत्यांना एका चित्रपट चाहत्याचा मानाचा मुजरा.

Sunday, 3 January 2016

भारतीय सिनेमाचं 'दलित' ऑडिट

कलाकाराला जात , धर्म आणि देश नसावा आणि त्यांचे मूल्यमापन या निकषांच्या पलिकडे जाऊन त्याच्या कलाकृतीच्या आधाराने व्हावे असा एक संकेत आहे . गेल्या काही दिवसात आपण एक देश आणि समाज म्हणून हा संकेत वारंवार पायदळी तुडवत आहोत . आपण हे सिद्ध केले आहे की कलाकाराला जात
( कट्यार … फक्त पुणेकर आणि भावे आडनाव असणारे लोकच बनवू शकतात हे विधान), धर्म (मंगेशकर भगिनी आणि आमिर खान यांच्या एकाच अर्थाने केलेल्या विधानाला मिळालेला टोकाचा वेगवेगळा प्रतिसाद ) आणि देश (गुलाम अली प्रकरण ) पण असतो हे आपण एक समाज म्हणून सिद्ध केले आहे . जात हे भारताचे न बदलणारे वास्तव आहे ,हे गृहित धरून भारतीय सिनेमाचे सामाजीक विश्लेषण होण्याची नितांत गरज आहे . विशेषतः शतकानुशतक समानतेची संधी नाकारल्या गेलेल्या वर्गाचं भारतीय सिनेमाच्या प्रदीर्घ इतिहासात किती योगदान आहे ? स्वातंत्र्योत्तर भारतात दलित वर्गाला भारतीय सिनेमात आपलं कर्तुत्व दाखवण्याच्या समान संधी मिळाल्या का ? खान त्रयी ही भारताच्या 'सेक्युलर 'पणाचा पुरावा आहे अस आपण जेंव्हा म्हणतो तर आपल्याकडे आतापर्यंत किती दलित स्टार्स किंवा सुपरस्टार्स झाले ? दुर्दैवाने यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तर नकारात्मक आहेत .

खर तर भारतीय सिनेमासृष्टी (बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीज ) या अतिशय सेक्युलर मानल्या जातात . आपल्याकडे इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळणारे 'discrimination ' इथे बरेच कमी आहे . तुमच्या अंगात गुणवत्ता असेल तर तुम्हाला तुमचं नाण इथ खणखणीत वाजवून दाखवता येत . अर्थातच भरपुर संघर्ष केल्यावर . भारतात आढळणाऱ्या धार्मिक आणि जातीय विषमतेचा बॉलीवूडने अनेक सिनेमामधून भरपूर विरोध पण केला आहे . पण इतक्या उदारमतवादी मानल्या गेलेल्या फिल्मइंडस्ट्रीच्या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये किती दलित व्यक्तिरेखा मध्यमवर्ती पात्र होत्या याचा शोध घ्यायला गेलो तर पदरी निराशा पडते . प्रकाश झाच्या 'आरक्षण ' सिनेमामध्ये सैफ अली खानने साकारलेला दलित प्राध्यापक किंवा विधु विनोद चोप्राच्या 'एकलव्य ' सिनेमामध्ये संजय दत्तने साकारलेला दलित पोलिस अधिकारी किंवा देविका राणी आणि अशोक कुमारचा 'अछूत कन्या ' हा चित्रपट असे काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे अपवाद आहेत . विशाल भारद्वाजने 'ओंकारा ' मध्ये उत्तर भारतामधल्या जातींचे 'अंडरकरंट' प्रभावीपणे दाखवले होते . शेखर कपुरच्या अंगावर शहारे आणणाऱ्या 'बॅण्डिट क्वीन ' चा पण उल्लेख करावा लागेल . आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेस ' आणि 'लगान ' मध्ये दलित पात्र होती . अनुराग कश्यपच्या 'गुलाल ' आणि 'वासेपूर ' चित्रपटद्वयीत जातीचे संदर्भ परिणामकारकतेने येतात . भारतीय मेनस्ट्रीम सिनेमापेक्षा याबाबतीत भारतीय 'आर्टहाउस' सिनेमाची कामगिरी बरीच उजवी आहे . आपल्या चित्रपटामधून विविध सामाजीक विषय हाताळणाऱ्या श्याम बेनेगल आणि इतर मंडळीनी जात वास्तव दाखवणारे अनेक चित्रपट बनवले . पण या 'आर्टहाउस' सिनेमाला बऱ्याच आर्थिक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर मर्यादा (जसे की सिनेमाचे वितरण) आहेत .

हे झालं पडद्यावरच्या दलित पात्रांबद्दल . भारतीय सिनेमावर किती दलित कलाकारांनी छाप सोडली आहे याचा आढावा घ्यायला गेलो तरी हाच नकारात्मक सुर पुन्हा आढळतो . खर तर ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधला खराखुरा 'पहिला यशस्वी दिग्दर्शक ' मानलं जात असे कांजीभाई राठोड हे गृहस्थ दलित होते . एकोणीशे वीस आणि तीसच्या दशकात या दिग्दर्शकाने 'काला नाग ' (आपल्याकडचा पहिला क्राईम थ्रिलर ), 'भक्त विदुर ' असे यशस्वी चित्रपट दिले होते . पण पुढे मात्र यशस्वी दलित दिग्दर्शक फारसे दिसत नाही . कलाकारांच्या बाबतीत बघायला गेलं तर अकाली गेलेली आघाडीची अभिनेत्री दिव्या भारती , जॉनी लिवर , आपल्या मराठीमधली प्रतिभावान अभिनेत्री उषा जाधव , सीमा विश्वास, राखी सावंत असे काही कलाकार आहेत . अजय देवगण ज्या विश्वकर्मा जातीचा आहे ती काही राज्यांमध्ये SC तर काही राज्यांमध्ये OBC श्रेणीत येते . दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीत काही लोकप्रिय दलित कलाकार आहेत . पण हा सगळा नसला तरी इतर क्षेत्रात असलेल्या उपस्थितीचा अनुशेष चित्रपटसंगीत क्षेत्रात भरून निघताना दिसतो . यात सोनु निगम , इलया राजा , दलेर मेहेंदी , मिका , सुखविंदर सिंग , हंस राज हंस ,आपल्याकडचे आनंद शिंदे -मिलिंद शिंदे , कैलाश खेर असे अनेक गायक -संगीतकार दलित समाजामधून आलेले आहेत . यात अजून एक नाव आहे ते म्हणजे संवेदनशील कलाकार आणि एकाहून एक अप्रतिम गाणी लिहिणारा गीतलेखक शैलेंद्र . शैलेंद्रची ओळख फक्त अप्रतिम गीतकार एवढीच नाही . 'तिसरी कसम ' सारखा अतिशय सुंदर चित्रपट त्याने निर्माता म्हणून बनवला होता . शब्दात रमणाऱ्या या माणसाला निर्मितीची आणि किचकट चित्रपट वितरणाची आर्थिक गणित काही जमली नाहीत आणि त्याला दिवाळखोरीचा सामना करावा लागला . सिनेमा क्षेत्रात ठसा उमटवणारी ही गिनीचुनी नाव भारतीय सिनेमा हा सर्वसमावेशक आहे या गृहितकावर प्रश्नचिन्ह उमटवतात . अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामध्ये अनेक बाबतीत मुस्लिम समाज आणि दलित समाज यांच्यात साम्यस्थळ आढळतात . पण चित्रपटक्षेत्राचा विचार केला तर मुस्लिम समाज दलित समाजापेक्षा मैलोगणती पुढे असल्याचं आढळून येत .

भारतीय सिनेमामध्ये असणाऱ्या दलित अनुशेषाची कारणमीमांसा करायला गेलो तर काही ठळक कारण समोर येतात . भारतीय सिनेमा हा बऱ्याचदा नेहमी 'उत्सवी ' मोड मध्ये असतो . चोप्रा , जोहर , बडजात्या आणि या त्रिकुटाला आंधळेपणाने कॉपी करणारे इतर निर्माता -दिग्दर्शक हे त्यांच्या चित्रपटात ढीगभर सुख आणि चिमुटभर दुख दाखवत असतात . रखरखीत सामाजिक वास्तवाला भिडण्याची त्यांची एकतर बौद्धिक कुवत नाही किंवा हिम्मत नाही . दुर्दैवाने 'सेफ बेट ' खेळणाऱ्या या निर्माता -दिग्दर्शकांच्या फिल्म्स आपल्याकडे जास्त चालतात . दलित पात्र किंवा समस्या या त्यांच्या परीघावर पण नाहीत . अजून एक कारण सांगायचे तर सुरुवातीच्या काळात बनणारे बहुतेक चित्रपट हे पौराणिक विषयांवरील चित्रपट होते . आपल्याकडच्या पौराणिक कथांमध्ये दलित पात्र आढळत नाहीत . आढळली तर ती पण राक्षस वैगेरेच्या रुपात . त्यामुळे सुरुवातीच्या काळातच दलित पात्र डावलली गेली . सिनेमा उत्क्रांतीच्या या महत्वाच्या टप्प्यात डावलल्या गेल्याने पुढे त्यांना पुनरागमन करायला जमले नसावे . अजून एक म्हणजे आपल्याकडच्या पुर्वीच्या आणि आताच्या आघाडीच्या निर्माता दिग्दर्शकांच्या यादीवर एक नजर फिरवली लगेच त्यावर असणारा मराठी ,पंजाबी आणि उत्तर भारतीय उच्चवर्णीय पगडा लगेच लक्षात येतो . पैसा भगवान है असे मानणाऱ्या आणि सर्वाधिक ताकत बाळगून असणाऱ्या या निर्माता दिग्दर्शकांना दलित आणि त्यांच्या समस्यांशी देणेघेणे नसणे हे त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आहे .

भारतात दलित सुपरस्टार का तयार होत नाहीत हा प्रश्न मात्र चक्रावून टाकणारा आहे . या प्रश्नाचा एकूणच खोलात जाऊन अभ्यास होण्याची गरज आहे . 'कोलावरी डी' गाण्यामुळे आणि 'रांझना ' सारख्या लोकप्रिय चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धनुष हा अभिनेता दलित आहे . रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानने झोकात चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते . कंगना राणावत सारखी तोलामोलाची अभिनेत्री त्याची पहिल्या चित्रपटात सहकलाकार होती . पण तो चित्रपट चालला नाही . वडिल एवढे मोठे राजकारणी असून पण चिरागला दुसरा चित्रपट कधीच मिळाला नाही . आता तर तो पुर्ण वेळ राजकारणीच झाला आहे . पासवान यांना मोदींच्या कंपूत आणण्यामागे त्याचा मोठा हातभार होता असे म्हणतात .मराठी पुरत बोल्याच झाल तर राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या उषा जाधव यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीला त्यांच्या वकुबाच्या किती भुमिका मिळाल्या ? हा प्रश्न आहे . तिच्या पण जेंव्हा इतर प्रतिभावान दलित अभिनेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर नाव पण सापडत नाहीत . दलित समाजामधून आलेले संघर्षरत अभिनेते नंतर कुठे गायब होतात यावर संशोधन होण्याची गरज आहे .

महात्मा गांधीसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर एक अतिशय बिग बजेट सिनेमा बनला . देशी विदेशी प्रेक्षकांनी त्या सिनेमाला डोक्यावर उचलून धरले . ऑस्करसकट अनेक ठिकाणी त्या चित्रपटाला नामांकन मिळाली . काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्वावर चित्रपट बनला . तुलनेने अतिशय कमी बजेटमध्ये . ह्या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसी ने केली . तिथल्या लाल फितीच्या कारभारामुळे आणि बाबुशाहीमुळे चित्रपटाच्या वितरणामध्ये अक्षम्य चुका झाल्या आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अनियमितता आली . दलित जनतेची तिकीट खिडकीवर झुंबड उडाली . परभणीला मी स्वतः ती गर्दी बघितली आहे . पण बाकी लोकांना हा चित्रपट कधी आला व कधी गेला हे कळल पण नाही . ज्यांना कळल त्यांनी एक कंटाळवाणा अनुत्साही प्रतिसाद दिला . या उदाहरणामध्ये मला वाटत वर उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची अलिखित उत्तर मिळून जातील . चित्रपट हा आपल्या समाजाचा आरसा असेल तर आपला आरसा अनेक ठिकाणी तडे गेलेला आहे इतकंच .

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-amol-udgirkar-rasik-article-in-marathi-5212258-NOR.html