Tuesday, 26 January 2016

बॉलीवूडचे ‘बोलट’

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल. असाच एक ‘तो', काही वर्षांपूर्वी मुंबईमधल्या आमदार निवासात मुक्काम ठोकायचा प्रसंग आलेला तेव्हा माझ्या बाजूला सतरंजीवर अंगाचं मुटकुळं करून झोपला होता. त्याने ‘सत्या'मध्ये होम मिनिस्टरचा रोल केला होता. मी त्याला ओळखलं आणि त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आपल्याला पण ओळखणारे लोक आहेत, हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं शिल्लक होतं. "एमएलए साबके पीए को कभी कभार शूटिंग दिखाने ले जाता हूँ, तो रात को सोने का प्रबंध हो जाता है।’ शुद्ध तुपातल्या हिंदीमध्ये त्याने मला सांगितलं होतं. ‘आगे क्या?’ या माझ्या प्रश्नावर स्वस्त सिगारेटचा झुरका घेत तो शून्यात बघत बसला होता...
एखाद-दुसऱ्या प्रसंगांपुरते हजेरी लावून जाणारे अभिनेते, हा बॉलीवूडमधला अतिशय दुर्लक्षित विषय आहे. व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असणाऱ्या देशात हे तसं स्वाभाविकच. हे लोक नव्वदच्या दशकातल्या सिनेमांमध्ये खूपदा दिसतात. या लोकांना आयुष्यात एकदाही मुख्य भूमिका मिळत नाही. हे लोक बहुधा मुख्य खलनायकाचे ‘साइड किक' असतात. काही बिनमहत्त्वाचे संवाद, जमलं तर बलात्काराचा एखादा प्रयत्न, तीन-चार विकट हास्य आणि यांचा पडद्यावरचा खेळ खतम!
अभिनयाला उपजीविका बनवण्याचा निर्णय घेताना यांच्या डोक्यात नेमकं काय होतं, याचं कुतूहल मला नेहमी वाटतं. लोक यांना फक्त चेहऱ्याने ओळखतात, नावाने नाही! एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असू शकते? खलनायक किंवा पडद्याला व्यापून दशांगुळे उरलेल्या नायकांच्या वटवृक्षात ही रोपटी कायमची खुरटून गेलेली असतात...
या संदर्भात, सर्वात प्रथम आठवतो तो महावीर शाह. काही लोकांच्या चेहऱ्यावरच खलनायक असं लिहिलेलं असतं. महावीर शाह त्यांच्यापैकी एक होता. त्याने चुकून एकदा सलमान खानच्या ‘जुडवा' चित्रपटामध्ये एका सज्जन पोलिस ऑफिसरची भूमिका केली होती, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत (म्हणजे पडद्यावर त्याची हत्या होईपर्यंत) हा कधी ‘कलटी' मारतो, याची भीती वाटत होती. मध्ये अझीझ मिर्झा आणि शाहरुख खानच्या चित्रपटांचं पेव फुटलं होतं, त्यात हा हमखास असायचा. हा २०००मध्ये एका अपघातात मेला. काही वर्तमानपत्रांनी चौथ्या-पाचव्या पानावर ही बातमी छापली. महावीर शाह या दुर्लक्षित अभिनेत्याची प्रसारमाध्यमांनी घेतलेली ही पहिली आणि शेवटची दखल.
शोले’मध्ये मॅकमोहनचा दुसरा संवाद कुठला, ते सांगा? असा क्रूर विनोद मध्यंतरी फिरत होता. क्रूर या अर्थाने की, आयुष्यातली चाळीस वर्षं फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवून पण या माणसाचा ‘शोले' तर जाऊच दे, इतर कुठल्याही चित्रपटामधला दुसरा संवाद पण कुणाला माहीत नाही. (खरं तर ‘शोले'मध्येच ‘चल बे जंगा, चीडी की रानी है’ असा संवाद इतर डाकूंसोबत पत्ते खेळताना तो बोलतो). आपला चित्रपटामधला रोल खूप लहान आहे, म्हणून स्वतः मॅकमोहनने आयुष्यात कधीच ‘शोले’ बघितला नाही. क्रिकेटर बनण्यासाठी मुंबईला आलेला मॅकमोहन कायम चित्रपटात दुय्यम-तिय्यम भूमिका बजावत राहिला. तो गेला तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला इनमिन दहा लोक होते...
या यादीत महिला कलाकार पण आहेत. सगळ्यात पहिलं आठवतं, ते नाव मनोरमाचं. हिचं खरं नाव एरिन इसाक डॅनियल. ही मूळची लाहोरची. हिरोइन बनण्यासाठी मुंबईला आली. हिचा अवतार बघून हिला कोण मुख्य अभिनेत्रीचं काम देणार? मग हिने मिळतील त्या फुटकळ भूमिका करायला सुरुवात केली. पण हिचा अभिनयाचा सेन्स उत्तम होता. ‘सीता और गीता’मधल्या हेमामालिनीच्या खाष्ट काकूच्या भूमिकेत हिने मस्त रंग भरले. ‘नया दिन, नयी रात’मधली हिची छोटी, पण छान भूमिका चित्रपट रसिक लक्षात ठेवतील. सुंदर आणि सडपातळ नसल्याचा फटका हिला बसला आणि आयुष्यभर ‘फुल फ्लेज’ म्हणावी, अशी एक पण भूमिका हिला मिळाली नाही.
रझ्झाक खान म्हटल्यावर प्रेक्षक "कोण हा?' असे विचारतील. दुर्दैवाने लोक याला ‘गुंडा’ चित्रपटातल्या त्याच्या ‘लकी चिकना’ या विचित्र नावाच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखतात. अक्षय कुमारच्या ‘मोहरा’मध्ये त्याने एका उपखलनायकाची आणि त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव सिरियस भूमिका केली होती. गोविंदाच्या नव्वदच्या दशकामधल्या चित्रपटात हा हमखास हजर असायचा. पण सध्या चित्रपटांमध्ये त्याच्यासारख्या अतरंगी नटाला स्पेसच राहिलेली नाही...
बॉब क्रिस्टो. ‘विदेशी स्मगलर’चा बॉलिवूडी चेहरा. पडद्यावर सगळ्यात जास्त मार खाणारा इसम म्हणून याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’मध्ये नोंद होऊ शकते. सिडनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असणारा हा उंचापुरा माणूस, झिनत अमानच्या प्रेमापोटी (अर्थातच एकतर्फी) मुंबईला आला आणि इथलाच झाला. ‘स्मगलर’च्या भूमिकेत टाईपकास्ट झाल्यामुळे याला ठरावीक लांबीच्या आणि वकुबाच्या भूमिका मिळत गेल्या. ‘मिस्टर इंडिया'मधली याची भूमिका त्यातल्या त्यात गाजली. मिस्टर इंडिया याला हनुमानाच्या मूर्तीने मारतो, तेव्हा त्यात आता ‘धार्मिक राष्ट्रवाद' शोधणारं पब्लिक टाळ्या पिटायचं.
कांती शाहचा ‘It's so bad, that it's good’ सिंड्रोममुळे प्रेक्षकप्रिय असलेला ‘गुंडा’ चित्रपट म्हणजे या ‘साइड किक’चे जागतिक संमेलन होते. लंबू आटाच्या भूमिकेमधला इशरत अली, इबु हटेलाच्या भूमिकेमधला हरीश पटेल, इन्स्पेक्टर काळेच्या भूमिकेमधला राणा जंग बहादूर, काला शेट्टीच्या भूमिकेमधला रामी रेड्डी, बचुभाई भिगोनाच्या भूमिकेतले दीपक शिर्के, लकी चिकनाच्या भूमिकेमधला रझ्झाक खान अशी उपखलनायकांची मांदियाळी या चित्रपटात उसळली होती.
अजूनही कित्येक नावं आहेत. तेज सप्रु, महेश आनंद, राणा जंगबहादूर, पिंचू कपूर, पद्मा खन्ना किती नावं घ्यावीत. हल्ली खलनायकाचे ‘साइड किक' ही गोष्ट आपल्या चित्रपटामधून नामशेष होत आहे. कारण मुळात ‘खलनायक’ ही संस्थाच नामशेष होत चालली आहे. ती का नामशेष होत आहे, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. मागच्या पाच वर्षांतला एक प्रभावी खलनायक सांगा म्हटलं तर कुठलं नाव आठवतं? एखादा प्रकाश राज सोडला तर दुसरं नावं आठवणार नाही. मग मुळात खलनायकच नसेल तर त्याचे ‘साइड किक' कुठून दिसणार?
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली'मधील ‘जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट ही एक व्यक्तिरेखा होती. पुलंच्या शब्दांत... जनू ‘बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नावाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे ‘बोलट', अशी एक विष्णूदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे; परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता... हे ‘साइड किक' अभिनेते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे बोलटच. यांचं कधी नाव झालं नाही. समीक्षकांनी कायम यांना अनुल्लेखाने मारले. त्यांची कधी धड नोंद पण घेतली गेली नाही. बॉलीवूड म्हणजे सुपरस्टार्स, हिरो-हिरोईनची लफडी, करोडोंची आकडेमोड नाही तर अनेक तुटलेल्या आणि कधीच पूर्ण न झालेल्या शेकडो स्वप्नांची कब्रस्तान पण आहे. आपल्या मर्यादित वकुबाने बॉलीवूडला पुरेपूर योगदान देणाऱ्या आणि कधीच श्रेय न मिळालेल्या अभिनेत्यांना एका चित्रपट चाहत्याचा मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment