Saturday, 24 December 2016

गरवारे कॉलेजच्या समोर असलेल्या  'बिपीन स्नॅक्स सेंटर ' वर जगातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट साबुदाणा खिचडी मिळते . त्याच्या बाजूलाच दोन टपऱ्या ओलांडून तिसरी टपरी म्हणजे 'प्रभाकर बेकरी '. एक छोटी टपरी , त्यात एका काचपेटीत काही पॅटिस  आणि काही बरण्यांमध्ये नानकटाई आणि बिस्कीट भरून ठेवलेली . हल्ली बेकरी म्हंटल की डोळ्यासमोर जी चकचकीत स्मार्ट इंटेरियर येतं त्यातलं काहीही 'प्रभाकर बेकरी ' मध्ये नव्हतं . तिथं गल्ल्यावर एक चष्मीश , पोट सुटलेला आणि डोळ्यांमध्ये आगाऊपणाची छटा असणारा एक मध्यमवयीन माणूस बसलेला असायचा . बेकरीचं नाव त्यानं मुलावरून ठेवलं होत की वडिलांच्या नावावरून ठेवलं होत देव जाणे . पण आम्ही त्यालाच प्रभाकर मामा असे संबोधून बोलायचो . विशेष म्हणजे मामाने पण त्याला कधी आक्षेप घेतला नाही . त्याने आम्हाला पण कधीच आमची नाव विचारली नाहीत हे खास . गरवारे हॉस्टेलला असताना आम्ही दिवसभर प्रभाकर बेकरी वर पडून असायचो . त्याच्या दुकानात एक छोटा पोर्टेबल टीव्ही होता . तिथे आम्ही भारत -झिम्बॉम्ब्वे कसोटी सामना सारखे महान खेळ तासंतास बघायचो . एक अंडाबन खाऊन तासनतास तिथे आम्ही बसू शकायचो मामाशी चकाट्या पिटत . कारण तिथं आम्ही सोडून दुसरं कुणी यायचंच नाही . अंडाबन हा पदार्थ खास मामाचं invention  आहे असं मामा अभिमानानं सांगायचं . अंडाबन म्हणजे पाव मध्यभागी चिरून त्यात उकडलेल्या अंड्याच्या चकत्या टाकायच्या आणि पावावर लोणी फासायचं . प्रभाकर मामा अतिशय आळशी आणि महत्वाकांक्षेचा अभाव असणारा इसम होता . वर्षानुवर्षे तो आम्हाला ,मी लवकरच चिकन पॅटिस ठेवणार आहे असं  सांगायचा . पण चिकन पॅटिस कधी त्याच्या बेकरीत आलेच नाहीत . त्याच्या बेकरीच्या बाजूलाच एक कंडोम व्हेंडिंग मशीन होत . तिथं येणाऱ्या लोकांकडे बघून अभद्र कॉमेंट्स मारणं हा मामाचा आवडता छंद होता . वर 'अरे तुम्ही कधी दिसणार रे त्या मशिनमधून कंडोम काढताना .' असे टोमणे मारून आमच्या तोंडातल्या नानकटाईची चव कडू करायचा ते वेगळंच . नंतर आमचे संबंध एवढे जिव्हाळ्याचे बनले की नेहमी फकाट  असणारे आम्ही त्याच्याकडूनच पैसे घेऊन बाहेर बारमधल्या पार्ट्या करू लागलो . आमचं नाव गाव काही माहित नसताना शांतपणे गल्ल्यात हात टाकून आम्ही मागू तेवढे पैसे तो आम्हाला द्यायचा . आम्हाला कॉलेजमधून प्रेझेंटी कमी का आली या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलेल्या अर्जावर सह्या पण द्यायचा . त्यामुळे आम्हाला त्याच्या बद्दल आपुलकीच आपुलकी होती . त्याला पण आमच्याबद्द्दल असावी . एके दिवशी अंडा बन खाऊन झाल्यावर पैसे घ्यायचं त्यानं नाकारलं . मुलाला मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्याची नौकरी मिळाली अशी खुशखबर त्याने दिली . मामाच्या वैयक्तिक आयुष्याशी आलेला हा आमचा पहिला आणि शेवटचा संबंध . मला खिशात चुरगळलेल्या नोटा ठेवायची सवय होती . त्यावरून मामा मला कायम झापायचा . 'अशा नोटा ठेवत जाऊ नकोस नाहीतर पैसा खिशात टिकणार नाही ' अशी वॉर्निंग द्यायचा . वॉर्निंग कसली , प्रॉफेसीच ती . नंतर हॉस्टेल मधून बाहेर पडल्यावर प्रभाकर बेकरीशी संबंध कमी कमी होत गेला . मध्ये काही काळ तर संपलाच . कर्वे रस्त्यावरून जाताना हटकून त्या बेकरीकडे नजर जायची . बहुतेक वेळा बंदच असायची . एकदा रोडवरून संध्याकाळी जात असताना बेकरी उघडी दिसली . बाईक थांबवली आणि बेकरीत गेलो . मामा आता म्हातारा झाल्यासारखा दिसत होता .मिणमिणत्या दिव्यात तो बराच थकल्यासारखा दिसला . मी काही ओळख दिली नाही . कशी देणार ? माझं नाव कधी त्याला माहित नव्हतंच . अंडा बन खात असताना मामा चष्म्यातून रोखून बघत होता . मी पैसे देण्यासाठी खिशात हात घातला आणि पैसे बाहेर काढले . "अजून पण चुरगळलेल्या नोटाच देतोस  का तू ?" मामाने विचारलं . आणि जाणवलं की आपण मामाला विसरलो असलो तरी मामा आपल्याला विसरला नाहीये . मग मामाशी बऱ्याच गप्पा मारल्या . आता रेग्युलर येत जाईल असं आश्वासन पण दिलं . पुढच्यावेळेस आलास की खास खिमा पॅटिस खिलवतो असं मामाने पण आश्वासन दिलं . मामा कधीच खिमा पॅटिस ठेवणार नाही हे मला माहित होत . मी रेग्युलर येणार नाही हे बहुदा मामाला माहित नसावं . कुठल्याच अपेक्षा नाहीत ,राग लोभ नाहीत असं एखाद नातं असू शकत हे प्रभाकर मामामुळे मला कळलं . अशा नात्यांची ओढ तेंव्हा पासूनचीच . आता बेकरी बंदच झाली आहे . मामाच्या तब्येतीबद्दल मध्यंतरी काही वावड्या कानावर पडल्या होत्या . आता त्या भागात क्वचितच जाण होत . बेकरी बंदच असते . एकमेकांबद्दल नाव -गाव काहीही माहित नसताना असं सुंदर नातं तयार होऊ शकत हे थोर आहे . 

No comments:

Post a Comment